उताऱ्यावरील बोजा कमी केला नाही : शेतकऱ्याची आत्महत्या

उताऱ्यावरील बोजा कमी केला नाही : शेतकऱ्याची आत्महत्या
उताऱ्यावरील बोजा कमी केला नाही : शेतकऱ्याची आत्महत्या

सोलापूर ः सातबारा उताऱ्यावरील सिंचन थकबाकी असणारा बोजा कमी करून त्यावर नाव लावण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करूनही दखल घेतली गेली नसल्याने मुस्ती (ता. दक्षिण सोलापूर) येथील सिद्धाराम महादप्पा विभुते (वय ६५) यांनी बुधवारी (ता. २७) शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली.  याबाबत मिळालेली माहिती अशी, की मुस्ती येथील विभुते यांच्या गट क्रमांक ४४३ या शेतीवर १९८४ मध्ये सिंचन विभागाची थकबाकी लावण्यात आली आहे. ही थकबाकी न भरल्याने त्यांच्या उतऱ्यावर सरकारचे नाव लागले. २०१२ मध्ये विभुते यांनी १२०७ रुपये एवढी थकबाकी त्यांच्या उताऱ्यावर दाखवत असल्याने त्याच वेळी शाखा अभियंता, जलसिंचन शाखा, हरणी यांच्याकडे हे पैसे जमा केले. त्यानंतर या कार्यालयाने २०१५ मध्ये तहसील कार्यालयाला सरकारच्या नावाने लागलेला बोजा कमी झाल्याने मूळ मालकाचे नाव लावण्यास हरकत नाही, असे पत्र पाठवले. त्यानतंर सलग तीन वर्षांपासून विभुते यासंबंधी सातत्याने पाठपुरावा करत होते. दस्तुरखुद्द तहसीलदारांपर्यंत भेट घेऊन यासंबंधीची कैफियत त्यांनी मांडली. पण केवळ चालढकल केली जात असल्याने उद्विग्न झालेल्या सिद्धाराम यांनी अखेरीस आत्महत्येचा मार्ग स्वीकारला. शेतकऱ्याचा जीव गेला, आता चौकशी करणार गेल्या अनेक महिन्यांपासून वयोवृद्ध विभुते हे तहसील कार्यालयाचे हेलपाटे घालत होते, पण एकाही अधिकारी, कर्मचाऱ्यांनी त्यांची दाद घेतली नाही. पण बुधवारी त्यांनी गळफास घेतल्यानंतर त्यांचे नातेवाईक आक्रमक झाले. आत्महत्या झाल्यानंतर त्यांचा मृतदेह शवविच्छेदनसाठी सिव्हिल हॅास्पिटलमध्ये आणला, तेव्हा जोपर्यंत यातील दोषींवर कारवाई होत नाही, तोवर त्यांनी मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला. त्यानंतर मात्र प्रशासन खडबडून जागे झाले. येत्या दोन दिवसांत यासंबंधीची चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन निवासी उपजिल्हाधिकीर अजित देशमुख यांनी दिल्यानंतर हा तणाव निवळला. पण यंत्रणेच्या गलथान आणि बेफिकिरीच्या कारभारात शेतकऱ्याचा जीव मात्र नाहक गेला, त्याचे काय, हा प्रश्न मात्र अनुत्तरित राहिला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com