उसनवारी करून दिवाळी सण साजरा करण्याची शेतकऱ्यांवर वेळ

गेल्या वर्षी आमच्या भागात कमी पाऊस झाल्याने काहीच हाती लागलं नव्हतं. यंदा पीक काढणीच्या वेळी आलेल्या पावसानं सहा एकरांवरील सोयाबीनचे नुकसान झाले. कापसाला मोड फुटले. तूर उंबळून गेली. पावसाने तोंडाचा घास काढून घेतला.गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही दिवाळीसाठी सावकारांकडे जावे लागणार आहे. - अरुण जाधव, कुडली, ता. देगलूर, जि. नांदेड
दिवाळीसाठी खरेदीकरिता यंदा दुकानांमध्ये फारशी गर्दी नाही
दिवाळीसाठी खरेदीकरिता यंदा दुकानांमध्ये फारशी गर्दी नाही

नांदेड  ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत यंदा सुरवातीच्या काळात जेमतेम पाऊस होऊनही पीक स्थिती समाधानकारक होती. त्यामुळे यंदा तरी दिवाळी सण आनंदाने साजरा करता येईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. परंतु, सोयाबीन काढणी आणि कापूस वेचणी सुरू असताना झालेल्या जोरदार पावसामुळे पिकांचे नुकसान झाले. हाती आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला.

गतवर्षीच्या कोरड्या दुष्काळप्रमाणेच यंदाही अतिवृष्टीमुळे काढणीस आलेल्या पिकांचे नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या हाती पैसा नाही. पीक उत्पादनाची खात्री नसल्याने आडते उचल देत नाहीत. दिवाळी सण खासगी कर्ज काढून, उसनवारी करून साजरा करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

यंदाच्या पावसाळ्यात नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात सुरवातीच्या काळात पिकांच्या वाढीयोग्य पाऊस झाला. परंतु, पीक परिक्वतेच्या अवस्थेत खंड पडल्यामुळे मूग, उडदाचे उत्पादन घटले. कोरडवाहू बहुल असलेल्या या भागातील सर्व शेतकऱ्यांची मदार सोयाबीन, कपाशी पिकांवर असते. दोन्ही पिकांचे दिवाळीच्या कालावधीत उत्पादन मिळते. सोयाबीनची काढणी, कापसाची वेचणी सुरू असताना आडत्याकडून उचल दिले जाते. परंतु, यंदा गेल्या आठ ते दहा दिवसांपासून सततच्या पावसात भिजल्याने सोयाबीन, कपाशी या प्रमुख पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे दिवाळी सणासाठी पैशाची तजवीज करण्यासाठी कोणताही शेतीमाल शेतकऱ्यांकडे नाही.

बाजारात शेतामालाची आवकेची खात्री नसल्याने अडते उचल देण्यास तयार नाहीत. शेतीमालाची आवक नसल्यामुळे दिवाळी सणानिमित्त किराणा, कापड खरेदीसाठी बाजारात शेतकऱ्यांची फारशी गर्दी नाही. गतवर्षीप्रमाणेच यंदाही उधार, उसनवारीच दिवाळी साजरी करावी लागत आहे.    प्रतिक्रिया

आमच्या भागात सोयाबीन हे प्रमुख नगदी पीक आहे. दरवर्षी दिवाळीत सोयाबीन बाजारात येते. आडते, व्यापारी उचल देतात.परंतु, यंदा आमच्या भागातील शेतातील उभे पीक वाया गेल्यामुळे आडते उचल देण्यास तयार नाहीत. - पशुपतीनाथ शेवटे, सिरपूर, ता. पालम, जि. परभणी

पंधरा एकरवरील सोयाबीन भिजून खराब झाले. काही वाहून गेले. त्यामुळे यंदा दिवाळी सणाचा अजिबात आनंद नाही. - काशिनाथ सांगळे, केळी, ता. औंढानागनाथ, जि. हिंगोली

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com