कोल्हापूर जिल्ह्यात पावसाअभावी शेतकऱ्यांचा जीव टांगणीला

कोल्हापूर जिल्ह्यात पावसाअभावी शेतकऱ्यांचा जीव टांगणीला
कोल्हापूर जिल्ह्यात पावसाअभावी शेतकऱ्यांचा जीव टांगणीला

कोल्हापूर  : अनेक ठिकाणी पेरण्या झाल्या आहेत. मात्र गेल्या दोन दिवसांपासून पावसाने पुन्हा विश्रांती घेतली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली असून, त्यांचा जीव टांगणीला लागला आहे. गेल्या दोन दिवसांपासून बहुतांशी ठिकाणी लख्ख ऊन पडत आहे. परिणामी, आता सर्वांच्या नजरा पुन्हा आकाशाकडे लागल्या आहेत. 

जूनच्या पहिल्या आठवड्यात येणाऱ्या मॉन्सूनचा अजूनही पत्ता नाही. आधीच लांबलेल्या पेरणीसाठी आणखी किती दिवस वाट पाहावी लागणार, या चिंतेत शेतकरी होते. दरम्यान ‘वायू’ वादळामुळे वातावरण ढगाळ होऊ लागले. यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या. दोन दिवस पाऊस झाल्याने शेतकऱ्यांमध्ये पेरण्या उरकण्यासाठी धांदल उडाली. दोन ते तीन दिवसांतच भाताच्या पन्नास टक्के पेरण्या उरकून घेतल्या. सोयाबीनची पेरणी मात्र शेतकऱ्यांनी थोडी दबकतच केली. यामुळे अवघ्या ४० टक्‍क्‍यांपर्यंत या पेरण्या झाल्याचे कृषी विभागाने सांगितले. 

आर्थिक नुकसान होण्याच्या भीतीने शेतकऱ्यांनी थोडे थांबूनच सोयाबीन पेरणी करण्याचा निर्णय घेतला आहे. भुईमुगाची पेरणीही अपेक्षित झाली नाही. माळरानावर काही ठराविक शेतकऱ्यांनी ज्वारीची पेरणी केली आहे. 

पावसाळ्याच्या वातावरणामुळे अधिकाधिक शेतकऱ्यांनी भाताची पेरणी उरकली आहे. आता दोन दिवसांपासून पुन्हा ऊन पडत आहे. पावसाचे जराही वातावरण नाही. अधूनमधून ढगाळ वातावरण होत आहे. मात्र पावसाचा पत्ता नाही. दोन-तीन दिवस झालेल्या पावसाची ओल आठवडाभर कायम राहील. त्यानंतरही पाऊस झाला नाही, तर पेरणी धोक्‍यात येण्याची चिन्हे आहेत. 

हवामान खात्याने या आठवड्यात मॉन्सून जिल्ह्यात दाखल होईल, अशी शक्‍यता व्यक्त केली आहे. परंतु कडक ऊन पडत असल्याने शेतकरी चिंतेत आहेत. याचा परिणाम पेरणीच्या नियोजनावर होत असल्याची स्थिती आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com