वऱ्हाडातील शेतकऱ्यांवर इंधन दरवाढीचा थेट परिणाम

मूग, उडदाचे एकरी दोन ते तीन क्विंटल उत्पादन होत आहे. दरवर्षीपेक्षा यावर्षी डिझेल दरवाढीमुळे आम्हा शेतकऱ्यांना धान्य तयार करण्याकरिता क्विंटलमागे ४०० ते ५०० रुपये खर्च येत आहे. दुसरीकडे बाजारात धान्याला भाव नाहीत. हा ५०० रुपये खर्च फक्त थ्रेशरचा आहे. अन्य खर्च वेगळा लागत आहे. शेतकऱ्यांनी कसे जगावे हाच प्रश्न आहे. - प्रभाकर मते, शेतकरी, देगाव ता. बाळापूर जि. अकोला.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

अकोला : वर्षभरात डिझेलचे दर सुमारे १५ रुपयांनी वाढल्याने त्याचा वऱ्हाडातील शेतकऱ्यांवर थेट परिणाम होत आहे. शेतीत वापरल्या जाणाऱ्या प्रत्येक यंत्राचा खर्च वाढला आहे. त्यातुलनेत एकाही शेतीमालाचा दर वाढलेला नसून गेल्या काळात मिळणारे भावसुद्धा सध्या नसल्याने परिस्थिती बिकट बनली आहे.

डिझेल दरवाढीमुळे शेतीत वापरले जाणारे ट्रॅक्टर, सिंचनासाठीचे डिझेल इंजिन, वाहतुकीचा खर्च वाढला आहे. ट्रॅक्टरचलीत मशागतीचा खर्च सरासरी एकरी १०० ते ३०० रुपयांदरम्यान वाढला आहे. थ्रेशरच्या साह्याने मळणी केली तर मागील हंगामापेक्षा किमान ५० ते १०० रुपये प्रतिक्विंटलमागे फटका सहन करावा लागतो. धान्य वाहतुकीसाठी वाहनचालकांनी अंतरानुसार सव्वा ते दीडपट दर वाढवले आहेत. भाजीपाल्याचीही वाहतूक करताना आधी एक क्रेट नेण्याचे दर १५ ते २५ रुपये होते. आता हाच दर २० ते ३५ रुपयांदरम्यान आकारला जात आहे. यामागे वाहनधारक डिझेल दरवाढीचे कारण देत आहेत.

शेतीची मशागत ट्रॅक्टरने करताना पंजी, वखरणी करण्यासाठी एक तासाला चार लिटर डिझेल लागते. रोटाव्हेटरसाठी ५ लिटर डिझेल लागते. सध्या डिझेल घरी आणेपर्यंत ते ८० रुपये प्रतिलिटर पडते. त्यामुळे ट्रॅक्टरवर प्रतितास १०० रुपये खर्च शिल्लक लागतो. वखरणीसाठी ६०० व रोटाव्हेटर १००० रुपये दर आहेत. शेतकऱ्यांना प्रतितास १५० ते २०० रुपये अधिक खर्च सहन करावा लागणार आहे. ओलितासाठी इंजिन वापरणाऱ्या शेतकऱ्यांना सहा तास इंजिन चालवण्यासाठी आता १२० रुपये अतिरिक्त लागतात, असे खुदनापूर (ता. मेहकर, जि. बुलडाणा) येथील  निंबाजी लखाडे पाटील यांनी सांगितले.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com