इंधनदराच्या भडक्यात होरपळतेय शेती

पूर्वी ट्रॅक्टरद्वारे नांगरट करण्यासाठी एकरी एक हजार ते बाराशे रुपये घेत होते. पेट्रोल, डिझेलचे दर वाढल्यामुळे चौदाशे ते पंधराशे रुपये एकरी खर्च येत आहे. शेतीमाल वाहतुकीच्या दरातही वाढ झाली आहे. - गोरख रसाळ, बोरीबेल, ता. दौड, जि. पुणे.
तेल किंमत
तेल किंमत

पुणे ः पेट्रोल आणि डिझेलच्या दिवसागणिक वाढणाऱ्या दरामुळे शेतीकामासाठी वापरले जाणारे ट्रॅक्टर, सिंचनासाठीचे डिझेल इंजिन, वाहतूक, मळणीचा खर्च वाढला आहे. अनेक भागात ट्रॅक्टरने मशागतीसाठी एकरी १०० ते ३०० रुपयांपर्यंत वाढ झाली. यांत्रिक मळणीचे दर क्विंटलमागे ५० ते १०० रुपयांपर्यंत वाढले. धान्य वाहतुकीचे दर अंतरानुसार सव्वा ते दीडपट झाले. भाजीपाल्याची वाहतूकही क्रेटमागे १५ ते २५ रुपयांवरून २० ते ३५ रुपयांवर गेली. उत्पादन खर्च वाढत असताना शेतमालाच्या दरात मात्र वाढ झाली नाही. यात केवळ शेती आणि शेतकरी होरपळत आहेत.  

राज्यातील शेतकऱ्यांनी सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद देत शेतीत मोठ्या प्रमाणात यांत्रिकीकरण केले. यांत्रिकीकरणामुळे शेतकऱ्यांचा वेळ आणि पैशांची बचत होऊन कामे लवकर होतात. यंदा राज्यात अनेक भागांत पावसाच्या दडीने पिके सुकत आहेत. मूग आणि उडदाचे पीक जेमतेमच आले. त्यालाही बाजारात हमीभावापेक्षा एक ते दोन हजार कमी दर मिळत आहेत. यामुळे शेतकरी अडचणीत आला असतानाच आता इंधनाचे दर दिवसागणिक वाढत जाऊन उत्पादन खर्च वाढला. डिझेलचे दर गेल्या वर्षभरात जवळपास १५ रुपयांनी वाढले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे अर्थकारण कोलमडले आहे. बियाणे, खते, शेतमजूर यांचा खर्च भागविताना आधीच मेटाकुटीला आलेल्या शेतकऱ्यांच्या माथी पुन्हा इंधन दरवाढीचा बोजा पडला आहे. ज्याप्रमाणात उत्पादन खर्च वाढत आहे. त्या तुलनेत उत्पन्न मात्र मिळत नाही. केंद्र सरकारनेही हमीभाव जाहीर केला असला तरी बाजारात शेतीमालाची विक्री हमीभावापेक्षा खूपच कमी दराने होत असल्याचे दिसून येते. सिंचनाचा खर्च वाढला पावसाचा खंड आहे. त्यात कृषिपंपाना योग्य दाबाने, अखंडीत वीजपुरवठा होत नसल्यामुळे डिझेल पंपाद्वारे पिकांना पाणी द्यावे लागत आहे. तासाला अडिच लिटर डिझेल लागते. दिवसाचे दहा तास इंजन चालले तर पूर्वी १ हजार ६२५ रुपये ते १ हजार ७५० रुपये खर्च लागत असे दरवाढीनंतर १ हजार ९५० ते २ हजार रुपये लागत आहेत. दररोज २५० ते ३५० रुपये खर्च वाढला आहे, असे माटेगांव (ता. वसमत, जि. हिंगोली) येथील शेतकरी संजय पिसोरे यांनी सांगतिले. 

केळी वाहतूक महागली केळी वाहतुकीसंबंधीचे दरही वाढले असून, रावेर येथून छत्तीसगड, राजस्थान, ठाणे, कल्याण, पुणे येथे केळी वाहतुकीसाठी १६ टनांसाठी ८०० ते १००० रुपये दरवाढ झाली आहे. तर सात ते आठ टन केळी वाहतुकीसाठी ५०० ते ६०० रुपये अधिकचे आकारले जात आहेत. रावेर, यावल, मुक्ताईनगर येथून छत्तीसगड, राजस्थान, ठाणे, कल्याण, पुणे येथे केळी वाहतुकीसाठी एकसारखेच दर घेतले जातात. हे दर शेतकऱ्यांना द्यावे लागत नाहीत, वाहतूक दर केळी खरेदीदार मालवाहू चालकांना देतात.   

संत्रा वाहतूक महागली सद्या संत्र्याचा आंबीया बहारातील फळे तोडणीस आली आहे. बाग खरेदी करणारे व्यापारी संत्रा वाहतूक खर्चही शेतकऱ्यांकडूनच वसूल करतात. सुरवातीला ४५ ते ५० हजार रुपये टनाचा दर होता; डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने व्यापाऱ्यांनी हे दर निम्म्यावर आणले आहेत. आता आंबीया बहारातील संत्र्याचे व्यवहार २५ ते ३० हजार रुपये टनाप्रमाणे होत आहेत, अशी माहिती काटोल (जि. नागपूर) येथील संत्रा उत्पादक मनोज जवंजाळ यांनी दिली. इंधनदरवाढीचा शेतीवरील परिणाम 

  • वाढलेल्या खर्चामुळे शेतकऱ्यांचे अर्थकारण कोलमडले
  • दुष्काळ, पिकाच्या कमी दरामुळे अडचणीत शेतकऱ्यासमोर नवे संकट
  • ट्रॅक्टरने मशागतीच्या खर्चात ३०० रुपयांपर्यंत वाढ
  • मळणीचे दर क्विंटलमागे १०० रुपयांपर्यंत वाढले
  • धान्य, भाजीपाला वाहतूक खर्चात दीडपट वाढ
  •  डिझेल इंजिनने सिंचनाचा खर्च ३५० रुपयांनी वाढला
  • दरवाढीमुळे संत्रा,केळी, डाळिंब वाहतूक महागली
  • खर्च वाढला, शेतीमालाचे दर मात्र घसरले
  • प्रतिक्रिया निविष्ठांचा खर्च ज्या प्रमाणात वाढतो त्या तुलनेत शेतमालाचे भाव वाढत नाहीत. अाता शेतमालाची मळणी करण्यासाठी वापरले जाणाऱ्या यंत्राचा दर प्रतिक्विंटल वाढू शकतो. ही झळ शेतकऱ्यालाचा सोसावी लागेल. शेतमालाचे भाव वाढले की मीडिया, समाज मोठी अोरड करतो. परंतु, शेतकऱ्याला जेव्हा तोटा होत राहतो त्या वेळी माध्यमे, ओरड करणारा समाज शांत असतो हे शेतकऱ्याचे दुर्दैव आहे. - गणेशराव नानोटे , प्रगतशिल शेतकरी निंभारा, जि. अकोला.

    पेट्रोलवाला पेट्रोल वाढलेल्या भावात विकतो, वाहनवाला वाहनाचे भाडे वाढवून आपलं भागवतो, पण याचा सगळा भार शेवटी शेतकऱ्यांवर येऊन पडतो. त्याबाबत सरकार विचार करणार आहे की नाही? या सगळ्यात शेतकऱ्यांनी शेती करावी की नाही, हा प्रश्‍न आहे. इंधनाच्या या दरवाढीवर तातडीने मार्ग काढला पाहिजे. अन्यथा शेतकरी आणखी अडचणीत येईल. - रवि पाचपुंड, शेतकरी, अनगर, ता. मोहोळ, जि. सोलापूर यंदा मळणीयंत्रातून मूग काढणीसाठी प्रतिक्‍विंटल ६ किलो मूग व उडीद काढणीसाठी सात किलो उडीद मोजावे लागले. आधी हाच दर ३ ते ५ किलो प्रतिक्‍विंटल असायचा. - रामेश्वर दौंड, पारूंडी, जि. औरंगाबाद.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com