शेतकरी संघटनांची रणनितीवर चर्चा; शीख धर्मगुरू बाबा रामसिंग यांच्या आत्महत्येने खळबळ

शेतकरी आंदोलनाच्या २१ व्या दिवशी बुधवारी (ता.१७)शीख धर्मगुरू बाबा रामसिंग यांनी आत्महत्या केल्याने खळबळ उडाली. पंजाब-हरियानातील आंदोलकांनी नोएडाकडून येणारी चिल्ला तसेच टिकरी-धनसा सीमा रोखून धरल्या.
शेतकरी संघटनांची रणनितीवर चर्चा; शीख धर्मगुरू बाबा रामसिंग यांच्या आत्महत्येने खळबळ
शेतकरी संघटनांची रणनितीवर चर्चा; शीख धर्मगुरू बाबा रामसिंग यांच्या आत्महत्येने खळबळ

नवी दिल्ली : शेतकरी आंदोलनाच्या २१ व्या दिवशी बुधवारी (ता.१७)शीख धर्मगुरू बाबा रामसिंग यांनी आत्महत्या केल्याने खळबळ उडाली. पंजाब-हरियानातील आंदोलकांनी नोएडाकडून येणारी चिल्ला तसेच टिकरी-धनसा सीमा रोखून धरल्या. सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीनंतर शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी आपत्कालीन बैठक घेऊन पुढील रणनीतीवर चर्चा केली. प्रसंगी न्यायालयातही जाऊन शेतकऱ्यांची बाजू मांडण्याची तयारी आंदोलक संघटनांनी केली आहे. सध्याची कोंडी फोडण्यासाठी आता न्यायपालिकेलाच वार्ताकार (इंटर लॉक्‍यूटर्स) पाठवून शेतकऱ्यांशी चर्चा करण्यासाठी पुढाकार घ्यावा लागणार अशी चिन्हे आहेत.  कृषी कायदे रद्द करण्यासाठी सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात कुंडली सीमेवर सहभागी झालेले ६५ वर्षीय शीख धर्मगुरू बाबा रामसिंग यांनी बुधवारी (ता.१७) सायंकाळी रिव्हॉल्व्हरमधून स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. 'शेतकरी त्यांच्या हक्कांसाठी लढाई लढत असल्याचे तीव्र दु:ख मलाही आहे. सरकार त्यांना न्याय देत नसल्याचे दु:ख मी जाणतो. अन्याय करणे हे पाप आहे, परंतु अन्याय सहन करणे देखील पाप आहे. शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी काहींनी आपले पुरस्कार सरकारला परत केले आहेत. मी स्वत:चा त्याग करण्याचा निर्णय घेतला आहे,' अशा आशयाची चिठ्ठी त्यांनी आत्महत्येपूर्वी लिहिली. सिंधू सीमेपासून दोन किलोमीटर अंतरावर दिल्ली-सोनीपत मार्गानजीक कुंडली येथे ही दुर्घटना घडली. बाबा रामसिंग यांच्या आत्महत्येनंतर सर्व आंदोलकांत अस्वस्थता पसरली. उद्या (शुक्रवारी) कर्नाल येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. दरम्यान, शेतकऱ्यांच्या आपत्कालीन बैठकीनंतर आंदोलन चालू ठेवण्यावर एकमत झाल्याचे नेत्यांनी सांगितले. न्यायालयाने या प्रश्‍नावर तोडगा काढण्यासाठी प्रस्तावित केलेल्या समितीत राकेश टिकैत यांच्या भारतीय किसान युनियनसह ज्या ८ संघटनांना पक्षकार करून घेण्याची सूचना न्यायालयाने केली त्या ८ संघटनांचे नेते तसेच अन्य नेत्यांनीही आपत्कालीन बैठकीत सहभाग घेतला. ज्यांना सरकारशी समजोता करायचा असेल त्यांनी आंदोलन सोडून निघून जावे असा इशारा टिकैत यांनी दिला. प्रस्तावित समितीतही एकमत झाले नाही तर न्यायपालिकेला (शाहीन बाग आंदोलनाप्रमाणे) शेतकरी आंदोलकांशी चर्चा करण्यास वार्ताकार पाठविण्याचा उपाय करावा लागण्याची चिन्हे आहेत. 

चर्चा करण्यावरून मतप्रवाह  सरकारने आडमुठेपणा न सोडल्यास आगामी दिवसांत टीकरी, सिंघू, गाझीपूर व बदरपूरसह दिल्लीच्या बहुतांश सीमा बेमुदत रोखून धरण्याचा इशारा शेतकरी संघटनांनी दिला आहे. आंदोलक संघटनांपैकी काही संघटना सरकारशी पुन्हा चर्चा करून पहाण्यास काय हरकत आहेत, या मताच्या आहेत. मात्र पंजाबच्या संघटना आंदोलन चालूच ठेवणे व ते आणखी तीव्र करणे यावर अजूनही ठाम आहेत. उत्तर प्रदेशातील अनेक संघटनांनी आंदोलन मागे घेण्याची घोषणा केली आहे. हे आंदोलन फक्त पंजाबमध्ये आहे व उर्वरीत देशभरातील शेतकरी कायद्यांबाबत समाधानी आहेत, असे चित्र उभे करण्याचे जे प्रयत्न सरकारकडून सुरू असल्यानेही शेतकरी संघटनांचे नेते संतप्त आहेत. 

सरकारचे म्हणणे कायम  सरकारने ‘चर्चेस तयार मात्र कायदा दुरूस्त्यांवरच' ही भूमिका कायम ठेवली आहे. शेतकरी मेळाव्यासाठी आपले गृहराज्य मध्य प्रदेशात पोचलेले कृषीमंत्री नरेंद्र तोमर यांनी, सरकार खुल्या मनाने शेतकरी नेत्यांशी चर्चेला व चर्चेद्वारे तोडगा काढायला तयार आहे, असे पुन्हा सांगितले. 

चिल्ला-धानसा सीमा ठप्प  चिल्ला सीमेवरील आंदोलकांनी आज आपापले ट्रॅक्‍टर - ट्रॉली दिल्लीकडे येणाऱ्या रस्त्यांच्या दोन्ही भागांमध्ये लावले. टीकरी धानसा सीमाही बंद राहिली. त्यामुळे हा चौपदरी रस्ता ठप्प झाला व नोएडा व दिल्लीला जोडणारा डीएनडी उड्डाणपूल, अक्षरधाम रस्ता, राष्ट्रीय महामार्ग २४ व सराय काले खॉं भागात प्रचंड वाहतूक कोंडी झाली. चिल्ला सीमेवरील आंदोलकांनी धारदार नांगरधारी ट्रॅक्‍टर डांबरी रस्त्यांवरून फिरवून सरकारचा निषेध केला. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com