शेतकऱ्यांनी वापरले ६५० कोटींचे घरचे बियाणे 

राज्यात यंदा सोयाबीनच्या पेऱ्यात मोठी वाढ होत असून शेतकऱ्यांनी अंदाजे ६५० कोटी रुपये किमतीचे घरचे बियाणे वापरल्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे.
soybean
soybean

पुणेः राज्यात यंदा सोयाबीनच्या पेऱ्यात मोठी वाढ होत असून शेतकऱ्यांनी अंदाजे ६५० कोटी रुपये किमतीचे घरचे बियाणे वापरल्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे महाबीज व खासगी कंपन्यांकडून बियाणे पुरवठा कमी होतो. मात्र, ग्रामबिजोत्पादनामुळे शेतकऱ्यांनी घरचे बियाणे मुबलक वापरत टंचाईवर मात केली आहे. 

सोयाबीन ग्रामबिजोत्पादनासाठी गेल्या खरीप व उन्हाळी हंगामात राबविलेली मोहीम घेण्यात आली होती. त्यातून साडेसहाशे कोटी रुपये किमतीचे अंदाजे ३१ लाख क्विंटल बियाणे तयार झाले. राज्यात सोयाबीनचे सरासरी क्षेत्र ३९ लाख हेक्टर आहे. मात्र, यंदा पेरा ४३ लाख ५० हजार हेक्टर राहील, असा प्राथमिक अंदाज होता. त्यासाठी बियाणे बदलाचा दर ३५ टक्के राहावा, असे लक्षांक ठेवले गेले होते. लक्षांकानुसार शेतकऱ्यांनी हेक्टरी ७५ किलो बियाणे वापरतील, असेही गृहीत धरण्यात आले. 

पेरा व बियाणे बदलाचा दर याचा हिशेब मांडल्यास राज्याच्या बियाणे बाजारात यंदा ११ लाख ४१ हजार क्विंटल सोयाबीन बियाण्यांची गरज होती. ही गरज पाहून महाबीजने २.१० लाख क्विंटल, राष्ट्रीय बियाणे महामंडळाने ८ हजार क्विंटल आणि खासगी बियाणे कंपन्यांनी ९ लाख ६५ हजार क्विंटल बियाणे पुरवावे, असे नियोजन ठरले होते. 

“अपेक्षेप्रमाणे खासगी बाजारात बियाण्यांचा पुरवठा मर्यादित स्वरूपाचा होता. दुसरीकडे पेराही वाढत होता. मात्र, शेतकऱ्यांनी घरचे ३१ लाख क्विंटल बियाणे वापरले. त्यामुळे यंदा सोयाबीनचा बंपर पेरा होऊनसुद्धा बियाणे टंचाई जाणवली नाही,” असे कृषी आयुक्तालयातील सूत्रांनी स्पष्ट केले. 

कंपन्यांकडून १२ लाख क्विंटल पुरवठा  यंदा सोयाबीनचा पेरा ५० लाख हेक्टरपर्यंत होण्याची शक्यता गृहीत धरल्यास त्यासाठी बियाणे ३७ लाख ५० हजार क्विंटल वापरले जाईल. त्यात बियाणे बदलाचा दर बघता शेतकऱ्यांना ११.५५ लाख क्विंटल बियाणे बाजारातून लागू शकते. सुदैवाने जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत राज्यात कंपन्यांनी १२ लाख क्विंटलच्या आसपास सोयाबीनचा पुरवठा केलेला होता, असेही आयुक्तालयाचे म्हणणे आहे. 

प्रतिक्रिया  शेतकऱ्यांनी यंदा घरचे बियाणे भरपूर वापरले आहे. बाजारातून शेतकऱ्यांनी किमान साडेसहा लाख क्विंटल बियाणे विकत घेतलेले नाही, असे गृहीत धरल्यास साडेसहाशे कोटी रुपये वाचले आहेत.मुळ पीक हाती येण्यापूर्वीच ही बचत झाली आहे. कृषी खात्याने विस्तार कामात बिजोत्पादनासाठी राबविलेल्या अभियानाचे हे यश आहे.  - दिलीप झेंडे, कृषी संचालक, निविष्ठा व गुणनियंत्रण विभाग   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com