दूध वाहतुकीसाठी रेड्याचा वापर ! शेतरस्त्यांअभावी रिसोड तालुक्यात शेतकऱ्यांचे हाल

एकलासपूर येथील शेतकऱ्यांना रस्त्या अभावी रेड्यावर दुधाची कॅन ठेवून रस्ता कापावा लागतो. विदर्भ-मराठवाड्याच्या सीमेवर असलेल्या रिसोड तालुक्यात शेतरस्त्यांची अत्यंत बिकट स्थिती
दूध वाहतुकीसाठी रेड्याचा वापर ! शेतरस्त्यांअभावी रिसोड तालुक्यात शेतकऱ्यांचे हाल
दूध वाहतुकीसाठी रेड्याचा वापर ! शेतरस्त्यांअभावी रिसोड तालुक्यात शेतकऱ्यांचे हाल

वाशीम: काळ बदलला...सोयी सुविधा निर्माण झाल्या...दळणवळणाची साधने वाढली. हे सारे खरे असले तरी शेतीतील हालअपेष्टा आजही कमी झालेल्या नाहीत. एकलासपूर येथील शेतकऱ्यांना रस्त्या अभावी रेड्यावर दुधाची कॅन ठेवून रस्ता कापावा लागतो. विदर्भ-मराठवाड्याच्या सीमेवर असलेल्या रिसोड तालुक्यात शेतरस्त्यांची अत्यंत बिकट स्थिती असल्याने अनेकांना शेतमाल घरी आणताना त्रास सहन करावा लागत आहे.

जुन्या काळात शेतीतील कामांसाठी रेड्याचा वापर केला जात होता. परंतु आजही या तालुक्यात काही शेतकऱ्यांना रेड्याचा वापर करण्याची दुर्दैवी वेळ कायम आहे. एकलासपूर (ता. रिसोड) येथे तलावात शेतरस्ता गेल्याने नवीन रस्त्याची गरज आहे. हा रस्ता करण्यासाठी काहींनी आडकाठी आणलेली आहे. या गावातील जगदीश अडळकर यांची १८ एकर शेती व दुधाचा व्यवसाय आहे. हा व्यवसाय त्यांना वाढवायचा आहे. परंतु केवळ दळणवळणाचे साधन शेतापर्यंत बारा महिने पोचत नसल्याने ते करता येत नाही. अडळकर यांची पाचंबा शिवारात शेती आहे. तेथे जाण्यासाठी पक्का रस्ता नाही. मुख्य रस्त्यापासून सातशे ते आठशे फूट शेत आत आहे. दररोज या शेतात चिखलामधून जावे लागते. गायी- म्हशीचे दूध सकाळ व संध्याकाळ रेड्याच्या पाठीवर बांधून पक्क्या रस्त्यावर आणून मोटर सायकलने रिसोडला पोचवावे लागते.

रिसोड तालुक्यात अनेक वर्षांपासून पाणंद रस्त्याची कामे बंद आहेत. आधी झालेली कामेही निकृष्ट दर्जाची झाल्यामुळे हे शेतरस्ते पूर्णपणे चिखलमय झाले आहेत. यंदा सतत पडलेल्या पावसामुळे रस्त्यांची अवस्था अतिशय खराब झाली आहे. शेतात तयार झालेला माल घरापर्यंत कसा आणावा असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. शेतकऱ्यांना मनुष्यबळ उपलब्ध होत नसल्यामुळे यांत्रिकीकरणाचा वापर करणे अपरिहार्य बाब झाली आहे. शेतीमधील कामांसाठी ही साधने नेणे कठीण होते. मशागत, कापणी यंत्र, मळणी यंत्र शेतापर्यंत पोचू शकत नाही.

प्रतिक्रीया.. तालुक्यात उद्योगधंदे नसल्याने रोजगार कमी आहे. परिणामी तरुण मुंबई, पुणे, औरंगाबादला रोजगारासाठी जातात. काही तरुण दुग्ध व्यवसायात आले आहे. परंतु रस्त्यासारखी पायाभूत सुविधाही नसल्याने त्यांचाही अपेक्षाभंग होत आहे. काही जण वर्ष-दोन वर्षे संघर्ष करतात व दूग्ध व्यवसाय बंद करतात. -मनोज जाधव, दूध व्यावसायिक, रिसोड

रस्त्यापुढे हरलो.. पाचंबा शिवारात आमचे शेत येते. आमचा जुना रस्ता तलावात गेला. नवीन रस्ता करण्यासाठी काहींची आडकाठी आहे. त्यामुळे शेतात जाणेही कठीण झालेले आहे. मी गेल्या १५ वर्षांपासून दूग्ध व्यवसाय व शेती करतो. दररोज एकावेळी ६० लिटर दूध निघते. हे दूध रेड्यावर दोन्ही बाजूंनी कॅन ठेवून रस्त्यापर्यंत न्यावे लागते. चिखलात भरलेल्या पायांनी तसेच पुढे रिसोडला जावे लागले. माझ्याप्रमाणेच अनेकांना अशा समस्या झेलाव्या लागत आहेत. दूग्ध व्यवसाय वाढवायचा आहे. पण रस्त्यापुढे हरलो. - जगदीश अडळकर , शेतकरी, एकलासपूर ता. रिसोड जि. वाशीम  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com