वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नजरा तूर खरेदी केंद्रांकडे

वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नजरा तूर खरेदी केंद्रांकडे
वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नजरा तूर खरेदी केंद्रांकडे

वर्धा : या हंगामातील नवीन तूर मळणीला सुरवात झाली आहे. अनेक शेतकऱ्यांच्या घरी तूर आली आहे. मात्र, अद्यापही शासनाने राज्यात नाफेडअंतर्गत तुरीची ऑनलाइन नोंदणीही सुरू केली नाही. परिणामी, आर्थिक अडचणीमुळे शेतकऱ्यांना खासगी व्यापाऱ्यांना तूर विकावी लागत आहे. ते नवीन तूर प्रतिक्‍विंटल चार हजार ४०० रुपयांनी खरेदी करीत आहेत. त्यामुळे नुकसान होत असल्याने शेतकऱ्यांच्या नजरा खरेदी केंद्रांकडे आहेत.

शेतकऱ्यांच्या मालाला रास्त भाव मिळावा, त्यांची खासगी व्यापाऱ्यांकडून आर्थिक लूट होऊ नये, यासाठी शासनाने शेतमालाचे हमीभाव जाहीर केले. यंदा तुरीचा हमीभाव पाच हजार ६७५ रुपये प्रतिक्‍विंटल आहे. यंदा अल्प पाण्याअभावी व मध्यंतरी धुके पडल्याने तुरीचे पीक करपले. मागील वर्षी जानेवारी महिन्यात ऑनलाइन तूर नोंदणीस सुरवात झाली होती; परंतु, यंदा शासनाने तूर खरेदीचे आदेशच दिले नाहीत. परिणामी, शेतकरी कोंडीत सापडले आहेत. 

यंदा सोयाबीन व कपाशीच्या उत्पादनातही घट झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतमाल निघाल्याबरोबर विकण्याशिवाय पर्यायच नाही. याच संधीचा फायदा खासगी व्यापारी घेत आहेत. शेतकऱ्यांना प्रतिक्‍विंटल १२०० ते १३०० रुपये तोटा सहन करून तूर विकावी लागत आहे. शासकीय तूर खरेदी केंद्र तत्काळ सुरू करावे, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.  

मागील हंगामात ऑनलाइन नोंदणी केलेल्या काही शेतकऱ्यांची तूर खरेदी केली नव्हती. अशा शेतकऱ्यांना प्रतिक्‍विंटल एक हजार रुपये अग्रीम बोनस देण्याचे जाहीर केले. परंतु, वर्ष लोटूनही जिल्ह्यातील ६०० ते ७०० शेतकऱ्यांच्या खात्यात अद्यापही पैसे जमाच झाले नाहीत. मागील वर्षी जिल्ह्यात सात केंद्रांवर तूर खरेदी करण्यात आली. यंदाही तूर खरेदी केंद्र सुरू करण्यात यावे, यासाठी अर्ज पाठविले आहेत. शासनाकडून मंजुरी मिळताच तूर खरेदी केंद्र सुरू होतील, अशी माहिती जिल्हा मार्केटिंग अधिकारी आबदेव यांनी दिली.   

खरेदी-विक्री संघाची नाराजी जिल्ह्यातील खरेदी-विक्री संघामार्फत नाफेडद्वारे तूर खरेदी केली जाते. यंदा जिल्ह्यातील एकाही खरेदी-विक्री संघाने नवीन तूर खरेदी करण्यासाठी प्रास्तवच सादर केले नाहीत. मागील वर्षी समुद्रपूर केंद्रावर खरेदी केलेली तूर चार ते पाच महिने पडून होती. खरेदी-विक्री संघालाही नाममात्र पैसे दिले जातात. त्यामुळे त्यांच्यात तूर खरेदी केंद्र देण्याबाबत उदासीनता आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com