केंद्रीय पथकाच्या अकोला दौऱ्याची आशा मावळली

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

अकोला   ः जिल्ह्यात अकोट तालुक्यातील आसेगाव बाजार महसूल मंडळात शासनाने दुष्काळ घोषित केला अाहे. महसूल व वनविभागाच्या शासन निर्णयानुसार या महसूल मंडळात आठ सवलती लागू करण्यात आल्या आहेत. दुसरीकडे अकोला जिल्ह्यात केंद्रीय पथक पाहणी दौरा कधी करणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले अाहे. मात्र अाता हा दौरा होण्याची शक्यता मावळल्याची चर्चासुद्धा सुरू झाली अाहे.

यापूर्वी अकोला जिल्ह्यातील अकोला, बार्शिटाकळी, तेल्हारा, बाळापूर आणि मूर्तिजापूर या पाच तालुक्यांमध्ये २०१८ या वर्षातील खरीप हंगामात मध्यम स्वरूपाचा दुष्काळ घोषित करण्यात आला अाहे. या तालुक्यातील सर्व गावांत शासन निर्णयानुसार आठ सवलती लागू करण्यात आल्या आहेत. अकोट तालुक्यातील आसेगाव बाजार या महसूल मंडळातही कमी प्रमाणात पाऊस पडलेला असल्याने दुष्काळी परिस्थिती होती.

परिणामी दुष्काळ जाहीर करून सवलती लागू करण्याची मागणी शेतकऱ्यांमधून केली जात होती. अखेरीस याची दखल घेत शासनाने दुष्काळ जाहीर केला. यामुळे अाता अासेगाव मंडळातील शेतकऱ्यांना जमीन महसुलात सूट, सहकारी कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती, कृषिपंपाच्या चालू वीजबिलात ३३ टक्के सूट, शालेय/महाविद्यालयीन विदयार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी, रोजगार हमी योजनेअंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता, आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टँकर्सचा वापर, टंचाई जाहीर केलेल्या गावात शेतकऱ्यांच्या शेतीच्या पंपाची वीज जोडणी खंडित न करणे या सवलती लागू करण्यात आल्या आहेत.   केंद्रीय पथकाच्या दौऱ्याबाबत संभ्रम मराठवाडा तसेच विदर्भातील बुलडाणा जिल्ह्यातील दुष्काळी स्थितीची केंद्रीय पथकाने नुकतीच पाहणी केली. अकोला जिल्ह्यात ७१२ गावे यापूर्वीच दुष्काळी जाहीर झालेली असून त्यात अाता अासेगाव महसूल मंडळाची भर पडली अाहे. जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा दुष्काळ यापूर्वी जाहीर झालेला अाहे. या दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक येईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. शेजारच्या बुलडाणा जिल्ह्यात दौरा करून पथक परतले अाहे. त्यामुळे अाता जिल्ह्यात पथक येईल किंवा नाही याबाबत संभ्रमवस्था अाहे. जिल्हा प्रशासनाकडे कुठलाही संदेश अालेला नसल्याचे सूत्रांकडून स्पष्ट करण्यात अाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com