मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे लक्ष शासनाच्या आधाराकडे

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

औरंगाबाद : खरीप वाया गेला, जमिनीत पुरेशी ओल नसल्याने रब्बीची आशा धूसर आहेत. अशा स्थितीत किरकोळ स्वरूपात आधार मिळत असल्याचे दाखविण्यापुरत्या दुष्काळी उपाययोजना असू नयेत, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. त्यामुळे सातत्याने असलेल्या दुष्काळाच्या संकटात आता आधार देऊ म्हणणारे शासन काय मदत देते याकडे मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

मराठवाड्यात यंदा खरिपात सर्वसाधारण ४९ लाख १० हजार हेक्‍टर क्षेत्रापैकी ४६ लाख १८ हजार हेक्‍टरवर पेरणी झाली होती. कपाशीवरील बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीनला पसंती दिली खरी, मात्र ही पसंती वरुणराजाला रुचली नाही. सुरवात चांगली केल्यानंतर प्रदीर्घ खंड देणाऱ्या पावसामुळे सोयाबीन उत्पादनात मोठी घट आली. कपाशीही संकटग्रस्तच राहिल्याने तिच्याही उत्पादनात मोठा फटका बसला. मूग, उडीद, बाजरी, मका आदी पिकांतूनही फारसे हाती काही आले नाही. शिवाय परतीच्या पावसानेही दगा दिला. परिणामी जमिनीत ओलही न राहिल्याने रब्बीचीही आशा मावळली. आटलेले पाणीसाठे, खालावलेली भूजलपातळी, दिवसागणिक वाढणारे टॅंकर, रोजगारासाठी मोठ्या प्रमाणात होणारे स्थलांतर मराठवाड्यात जाणवू पाहत असलेल्या भीषण दुष्काळाची साक्ष देत आहेत.

कापूस उत्पादनात मोठा फटका मराठवाड्यात कपाशीचे सर्वसाधारण क्षेत्र १७ लाख ७६ हजार हेक्‍टर आहे. यंदा १५ लाख ८१  हजार हेक्‍टरवर कपाशीची लागवड झाली. बोंड अळीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले असले, तरी अपुऱ्या पावसाने औरंगाबाद जिल्ह्यात कपाशी उत्पादनात ५० ते ६० टक्‍क्‍यांपर्यंत घट झाली आहे. पावसाअभावी जिल्ह्यातील चार तालुक्‍यांतील २३ हजार ५९९ हेक्‍टरवरील कपाशीचे पीक बाधित झाले आहे. बीड जिल्ह्यात बागायती कपाशीचे हेक्‍टरी २ क्‍विंटल ९ किलो, तर जिरायतीचे १ क्‍विंटल ५१ किलो उत्पादन झाले. नांदेड जिल्ह्यात ३० ते ४०, हिंगोलीत ५० ते ६० टक्‍के उत्पादनात फटका बसला असून, कपाशीचे तुरळक क्षेत्र असलेल्या लातूर, उस्मानाबादमध्येही पावसाच्या खंडाने या पिकाचे मोठे नुकसान झाले.

सोयाबीनच्या उत्पादनात ८० टक्‍क्‍यांपर्यंत घट मराठवाड्यात यंदा सर्वसाधारण १२ लाख ३५ हजार हेक्‍टरच्या तुलनेत १९ लाख ३३ हजार   हेक्‍टरवर सोयाबीनची पेरणी झाली होती. परंतु पावसाच्या तीन वेळा पडलेल्या प्रदीर्घ खंडामुळे सोयाबीन उत्पादनात ३० ते ८० टक्‍क्‍यांपर्यंत घट नोंदली गेली आहे. बीड जिल्ह्यात सर्वांत कमी हेक्‍टरी २ क्‍विंटल ५६ किलोच सोयाबीन उत्पादन झाले   आहे.  

औरंगाबादपासून दौऱ्यास प्रारंभ मराठवाड्यात केंद्रीय पथकाचा दुष्काळ पाहणी दौरा बुधवारपासून (ता. ५) सुरु होत आहे. विभागीय आयुक्‍तालयात सकाळी ९ वाजता होणाऱ्या आढावा बैठकीने दौरा सुरु होणार आहे. त्यानंतर पथक औरंगाबाद व जळगाव जिल्ह्यातील दुष्काळी भागाची पाहणी करणार आहे. केंद्रीय पथकासोबतच राज्यातील सुमारे आठ अधिकारी असतील. मराठवाड्यात दाखल होणाऱ्या क्रमांक एकच्या केंद्रीय पथकात सहसचिव श्रीमती छावी झा यांच्यासह भोपाळच्या कडधान्य केंद्राचे संचालक ए. के. तिवारी, एमएनसीएफसीच्या डॉ. शालिनी सक्‍सेना, कृषी सचिव एकनाथ डवले, कृषी आयुक्‍त सच्चिंद्र प्रताप सिंह, नाशिकचे विभागीय आयुक्‍त, पुणे विभागीय आयुक्‍त, मदत पुनर्वसन विभागाचे उपसचिव सुभाष उमराणीकर, नाशिकचे विभागीय उपायुक्‍त, पुण्याचे विभागीय उपायुक्‍त तसेच एमआरएसएसीचे श्री. राजनकर सहभागी असतील.

अशी आहे स्थिती

  • मराठवाड्याचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान ७७९ मिमी.
  • ऑक्‍टोबरअखेर केवळ सरासरी ५०१ मिमी पाऊस झाला.
  • वार्षिक पर्जन्यमानाच्या ६४ टक्‍केच पाऊस
  • १ लाख ६५ हजार हेक्‍टरवरील मुगाच्या उत्पादनात ४० ते ६० टक्‍के घट
  • १ लाख ५४ हजार हेक्‍टरवरील उडदाच्या उत्पादनात ४० ते ६० टक्‍के घट
  • १ लाख ३ हजार हेक्‍टरवरील बाजरी उत्पादनात ७० टक्‍क्‍यांपर्यंत घट
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com