सातारा जिल्ह्यातील पूरग्रस्त शेतकरी नुकसानभरपाईच्या प्रतीक्षेत

शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पिकांसह केळी, उसासारख्या नगदी पिकांची लागवड केली होती. मात्र, महापुराने त्यावर पाणी फिरवले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. माझ्या शेतातील नुकसानग्रस्त केळी, सोयाबीन, भात पीक शेताबाहेर काढण्यासाठीही पैसे नव्हते. उसने पैसे घेऊन मी पिके बाहेर काढत आहे. याचा विचार करून शासनाने शेतकऱ्यांना तातडीने भरपाई म्हणून काही रक्कम देणे आवश्यक होते. महापुराच्या घटनेला दीड महिना होत आला तरी, आम्हाला अजूनही भरपाई मिळालेली नाही. आम्ही मदतीची प्रतीक्षा करत आहोत. - दत्तात्रेय जांभळे, शेतकरी, सुपने, जि. सातारा.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

कऱ्हाड, जि.सातारा ः शेतकऱ्यांनी कर्ज काढून, उसनवारी करून फुलवलेली पिके महापुरात जमीनदोस्त झाली. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले. महापुरामुळे झालेल्या पीक नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश सरकारकडून देण्यात आले. त्यानुसार शासकीय यंत्रणेकडून त्याचे पंचनामे करण्यात आले. त्यानंतर लवकरच भरपाई मिळेल अशी आशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना होती. मात्र महापुराच्या घटनेला दीड महिने उलटत आले तरीही शेतकऱ्यांना आत्तापर्यंत एक रुपयाचीही मदत मिळालेली नाही. महापुरात चिखलाने माखलेली पिके जनावरेही खात नाही, अशी स्थिती आहे. तसेच ही पिके शेतातून काढून टाकण्यासाठीही शेतकऱ्यांकडे पैसे नाहीत. अतिवृष्टी ही नैसर्गिक आपत्ती असल्याने त्याच्या मदतीला आचारसंहितेचा अडसर येत नाही. मात्र तरीही जिल्ह्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून अद्यापही भरपाई मिळालेली नाही. 

सातारा जिल्हा खरिपाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यातील शेतकरी उसनवारी करून, कर्ज काढून मोठ्या जिद्दीने पिके घेतात. यंदा तर हवामान विभागाने पुरेसा पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त केला होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी खरीप हंगामात विविध पिकांची लागवड केली होती. अतिवृष्टी होण्यापूर्वी एक आठवडा अगोदर कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार सोयाबीनची ५९ हजार १९६, भुईमुगाची ३३ हजार २३०, भाताची ४१ हजार २६५, ज्वारीची १६ हजार ८७९, मक्याची ११ हजार ७८१, तृणधान्याची १ लाख ३२ हजार ३४७, कडधान्यांची ५४ हजार १७५, तीळ, सोयाबीन, कारळा, भुईमूग या गळीत धान्याची ९३ हजार २५६, उसाची २ लाख ९० हजार ४३२ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती.

पेरणी झाल्यानंतर काही दिवसांतच सुरू झालेल्या मुसळधार पावसाने शेतकरी हतबल झाले. मुसळधार पाऊस आणि कोयना धरणातून पाणी सोडण्यात आल्याने महापूर आला. त्यात शेतकऱ्यांच्या डोळ्यांदेखत पिके वाया गेली. दहा दिवसांहून अधिक काळ पिके पाण्याखाली राहिली. त्यामुळे पेरणीसाठी खते, बियाणे खरेदीसह मशागतीसाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड कशी करायची, या चिंतेत शेतकरी आहेत. जिल्ह्यात कृषी विभागाच्या नजर अंदाजाने खरिपातील ऊस, आले, हळद, केळी, भात, सोयाबीन, भुईमूग, कडधान्य, तृणधान्य व अन्य पिकांचे ३८ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. या नुकसानीचे पंचनामे शासकीय यंत्रणेकडून करण्यात आले. मात्र त्याला दीड महिन्याचा काळ उलटला तरी शेतकऱ्यांना अजूनही शासनाकडून मदत मिळालेली नाही.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com