नगर जिल्ह्यात सहाशेहून अधिक गावांना चारा छावण्यांची प्रतीक्षा

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

  नगर ः दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या नगर जिल्ह्यामधील ४६० गावांत आतापर्यंत जनावरांच्या छावण्या सुरू झालेल्या आहेत. मात्र, सुमारे बाराशे गावांत टंचाईची स्थिती गंभीर आहे. शासनाने अतितीव्र दुष्काळी तालुके म्हणून घोषित केलेल्या सुमारे सहाशेहून अधिक गावांत अजूनही जनावरांच्या छावण्याची प्रतीक्षा आहे. पूर्णतः चारा संपला असल्याचा प्रशासनाचा अहवाल असलेल्या काही तालुक्यांतही जनावरांच्या छावण्या सुरू झालेल्या नाहीत. 

नगर जिल्ह्यामध्ये यंदा दुष्काळाची तीव्रता अधिक आहे. गतवर्षी पावसाळ्यात पुरेसा पाऊस नसल्याने खरीप, रब्बीची पिके आली नाहीत. त्यामुळे सर्वाधिक गंभीर प्रश्न चाऱ्याचा आहे. शासनाने दुष्काळ जाहीर केला. त्यामुळे दुष्काळी भागातील जनावरे जगविण्यासाठी जनावरांच्या छावण्या सुरू केल्या आहेत. आतापर्यंत ४९० छावण्यांना मंजुरी मिळालेली असून ४६० छावण्या प्रत्यक्षात सुरू झालेल्या आहेत. साधारण पाचशे जनावरे असलेली एक छावणी याप्रमाणे छावण्या सुरू आहेत. मात्र, दुष्काळाची तीव्रता पाहता अजूनही जिल्हाभरातील सुमारे सहाशेपेक्षा अधिक गावांना छावण्यांची प्रतीक्षा आहे. 

नगर जिल्ह्यामध्ये ११ तालुक्यांत प्रशासनाने तीव्र दुष्काळ जाहीर केलेला आहे. शिवाय अकोले, श्रीरामपूर, कोपरगाव तालुक्यांतील काही गावांत दुष्काळ जाहीर केलेला आहे. या तालुक्याला भंडारदरा, निळवंडेचे पाणी मिळते. यंदा मात्र धरणातच पुरेसे पाणी नसल्याने दुष्काळ जाहीर झालेला नसला तरी हा भागही दुष्काळाची तीव्रता सहन करीत आहे. पाणी उपलब्ध असलेल्या भागांत जिल्हा नियोजन समिती व कृषी विभागाच्या पुढाकाराने चारा पेरणी झाली होती. तो चारा आता उपलब्ध झालेला आहे.

मात्र नगर, पारनेर, पाथर्डी, श्रीगोंदा, कर्जत, जामखेड, शेवगाव या तालुक्यांत दुष्काळाची तीव्रता अधिक असून या तालुक्यांतील सर्व चारा संपलेला आहे. त्यामुळे या तालुक्यांतील प्रत्येक गावांत जनावरांसाठी छावण्यांची गरज असताना अजूनही या तालुक्यांतील सुमारे सहाशेपेक्षा जास्त गावांना छावण्यांची प्रतीक्षा आहे.    

जिल्ह्यामधील स्थिती 

  • एकूण जनावरे (लहान-मोठे) ः १६ लाख ४८ हजार ५८४
  • इतर (शेळ्या, मेंढ्या व अन्य) ः ११ लाख ७२ हजार ९९५
  • दर दिवसाला लागणारा चारा ः ८३३८.५७ मेट्रीक टन  
  • सध्या उपलब्ध असलेला चारा ः ४ लाख ४० हजार मेट्रीक टन 
  • सध्या सुरू असलेल्या छावण्या ः ४६०
  • छावण्यातील जनावरे ः २ लाख ८५ हजार 
  • पाचशेपेक्षा जास्त जनावरे असलेली गावे ः १०३० 
  • एक हजारापेक्षा जास्त जनावरे असलेली गावे ः ५११ 
  • दोन हजारांपेक्षा जास्त जनावरे असलेली गावे ः १२८ 
  • जनावरे असलेल्या गावांची स्थिती 

    तालुका ५०० पेक्षा जास्ती जनावरे एक हजारपेक्षा जास्ती जनावरे दोन हजारापेक्षा अधिक जनावरे  
    नगर १०१  ५० १८
    राहुरी  ८७  ४९    १५
    श्रीरामपूर  १३  ११ ०७
    पारनेर १००  ५३ ११
    राहाता  ५४   ३२ १२
    कोपरगाव १०
    अकोले ५८   १३   १
    श्रीगोंदा  १०१ ६६   १५
    कर्जत   ९७   ४५ 
    जामखेड  ६४  २८
    पाथर्डी १००   ४६ 
    शेवगाव ८६  ३४  
    नेवासा  ९१  ५५  १४
    संगमनेर  ६८  २५   ५

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com