नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रतीक्षा कांदा अनुदानाची 

कांदा अनुदानाचा प्रस्ताव तयार करून तो पणन महासंचालकांकडे पाठविण्यात आलेला आहे. अनुदान प्राप्त होताच ते शेतकऱ्यांच्या खात्यांवर जमा केले जाईल. - दिग्विजय आहेर, जिल्हा उपनिबंधक
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नगर  ः दरात घसरण झाल्यामुळे राज्य सरकारने कांद्याला २०० रुपये प्रतिक्विंटल अनुदान देण्याची घोषणा केली. पहिल्या टप्प्यात दीड महिन्याचे अनुदान देण्यात आले. मात्र, दुसऱ्या टप्प्यातील अडीच महिन्यांच्या अनुदानाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे. जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने दाखल अर्जांची छाननी करून ६७ कोटी रुपयांचा अनुदान मागणीचा प्रस्ताव सादर केला आहे. मात्र, त्यावर अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही. 

कांद्याच्या दरात घसरण झाल्याने शेतकऱ्यांसह शेतकरी संघटना, राजकीय पक्षांनी आंदोलने केली. त्याची दखल घेऊन सरकारने कांद्याला प्रतिक्विंटल २०० रुपये अनुदान देण्याची घोषणा केली. त्यानुसार एक नोव्हेंबर ते १५ डिसेंबर २०१८ दरम्यान दीड महिन्यासाठी सुमारे ४८ हजार शेतकऱ्यांना ३० कोटी ५० लाख ४८ हजार रुपयांचे अनुदान देण्यात आले. त्यानंतरही कांद्याच्या भावात सुधारणा झाली नाही. त्यामुळे १६ डिसेंबर २०१८ ते २८ फेब्रुवारी २०१९ दरम्यान कांदाविक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान देण्याची घोषणा सरकारने केली. त्यानुसार जिल्ह्यातील १४ बाजार समित्या व प्रसन्न कृषी मार्केट, पाडळी आळे (ता. पारनेर) अशा एकूण १५ ठिकाणी शेतकऱ्यांकडून अर्ज भरून घेतले.

जिल्ह्यातील ८४ हजार ७२५ शेतकऱ्यांनी ३३ लाख ५१ हजार ८७९ क्विंटल कांद्याची विक्री केली आहे. या सर्व शेतकऱ्यांना ६७ कोटी ३७ लाख पाच हजार ८१५ रुपयांचे अनुदान मिळणार आहे; परंतु शेतकऱ्यांनी दाखल केलेल्या अर्जांच्या छाननीला निवडणूक व चारा छावण्यांच्या तपासणीमुळे उशीर झाला. सर्व अडचणी पार करून हा प्रस्ताव सरकारकडे सादर करण्यात आलेला आहे. मात्र, त्यावर सरकारकडून अद्याप कोणतीच कार्यवाही करण्यात आलेली नाही. 

शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव मिळावा, यासाठी आम्ही लढा देत आहोत. सरकारने कांद्याला अनुदान जाहीर केलेले आहे. ते त्वरित शेतकऱ्यांच्या खात्यांवर जमा करणे महत्त्वाचे आहे, असे शेतकरी संघटनेचे पश्‍चिम महाराष्ट्र अध्यक्ष बाळासाहेब पटारे यांनी सांगितले. 

कांदा अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांना मिळालेली नाही. ती सरकारने लवकर देणे गरजेचे आहे. या अनुदानाच्या रकमेतून शेतकऱ्यांना बियाणे किंवा त्यांच्या मुलांचे शैक्षणिक शुल्क भरण्यास मदत होईल, असे राहुरी बाजारसमितीचे सभापती अरुण तनपुरे यांनी सांगितले.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com