स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ऊस परिषदेकडे शेतकऱ्यांचे लक्ष

माजी खासदार राजू शेट्टी
माजी खासदार राजू शेट्टी

कोल्हापूर  : यंदाच्या प्रतिकूल परिस्थितीच्या पार्श्‍वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ऊस परिषदेकडे ऊस उत्पादकांचे लक्ष लागले आहे. शनिवारी (ता. २३) होणाऱ्या ऊस परिषदेत ‘स्वाभिमानी’ यंदाच्या ऊस हंगामाबाबत कोणती भूमिका घेणार, याबाबत शेतकऱ्यांमध्ये उत्सुकता आहे.

गेल्या वर्षीचीच एफआरपी केंद्राने यंदाही कायम ठेवली आहे. यामुळे संघटना कारखानदारांकडे उसाचा पहिला हप्ता किती मागते, यावर यंदाचा हंगाम वेळेत सुरू होणार की नाही, याचे चित्र अवलंबून असेल. प्रत्येक वर्षी ऑक्‍टोबरमध्ये होणारी ऊस परिषद यंदा नोव्हेंबरपर्यंत लांबली आहे. महापूर व अतिवृष्टीमुळे यंदा ऊस उत्पादनात मोठी घट अपेक्षित आहे. या परिस्थितीमुळे संघटना योग्य दर मिळविण्यासाठी ऊस तोड बंद ठेवेल ही शक्‍यता सध्या तरी धूसर आहे. विशेष करुन दक्षिण महाराष्ट्रात उसाची अवस्था दयनीय आहे. यामुळे उत्पादक तातडीने ऊस कारखान्याला देण्यासाठी धडपडत आहेत.

शेतकऱ्यांची ही धडपडत बघता उसाच्या दरासाठी संघटना ऊस तोड बंद ठेवेल का याची उत्तरे परिषदेतच मिळणार आहेत. दुसरीकडे गेल्या वर्षभरात संघटनेचे मनोधैर्य सलग दोन पराभवांमुळे खचले आहे. राजू शेट्टी यांच्या पाठोपाठ विधासभा निवडणुकीतही जिल्ह्यात ‘स्वाभिमानी’चा पराभव झाला. यामुळे जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचे मनोबल खचले आहे. या परिषदेच्या निमित्ताने कार्यकर्त्यांना पुन्हा प्रेरित निर्माण करण्याचे काम संघटनेला करावे लागणार आहे.

आंदोलनाची घोषणा केली तरी कार्यकर्त्यांना आंदोलनासाठी प्रेरित करण्याचे मोठे आव्हान यंदाच्या ऊस परिषदेसमोर आहे. संघटनेकडे मातब्बर नेते नसल्याने पुन्हा एकदा राजू शेट्टी यांच्यावरच मोठी जबाबदारी आली आहे. सध्या तरी संघटनेच्या ऊस परिषदेच्या तयारीबाबत बैठका सुरू असल्या तरी ठोस भूमिका मात्र अद्याप गुलदस्ताच आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com