वऱ्हाडातील शेतकरी पीककर्जाविनाच

वऱ्हाडातील शेतकरी पीककर्जाविनाच
वऱ्हाडातील शेतकरी पीककर्जाविनाच

अकोला ः ऑगस्ट महिन्याच्या मध्यानांतही पीक कर्जवाटपाने गती घेतलेली नाही. वऱ्हाडात अकोला जिल्ह्याने २५ टक्के पीक कर्जवाटप केले. मात्र, बुलडाणा जिल्ह्यात जेमतेम १४ टक्के तर वाशीममध्ये २१ टक्क्यांपर्यंत पीक कर्जवाटप पोचले आहे.  खरीप हंगामाचे अडीच महिने होत आले आहेत. परंतु, अद्यापही बॅंकांनी शेतकऱ्यांना पीककर्जाचे वाटप केलेले नाही. त्यामुळे बॅंकांमध्ये शेतकऱ्यांची गर्दी बघायलाच मिळत आहे. शेतकरी वारंवार बॅंकांच्या पायऱ्या झिजवत असताना शेतकऱ्यांच्या खात्यात पीककर्जाची रक्कम मात्र पडत नाही.  वऱ्हाडातील शेतकऱ्यांना पीक कर्जवाटपाचा आढावा घेतला असता धक्कादायक माहिती समोर आली. अकोला जिल्ह्याला १३९८ कोटींचा लक्ष्यांक देण्यात आला होता. आत्तापर्यंत सर्व बँकांमिळून ३६२.३५ कोटींचे वाटप झाले. २५.९१ टक्के पीक कर्जवाटप झाले. वाशीम जिल्ह्यात १५३० कोटींचा लक्ष्यांक असून येथे ३०९.६० कोटी म्हणजेच २०.२४ टक्के वाटप झाले. सर्वाधिक बिकट अवस्था बुलडाणा जिल्ह्यात आहे. येथे १७७३ कोटी ७७ लाख रुपयांचे उद्दिष्ट बॅंकांना देण्यात आलेली आहे. आत्तापर्यंत जेमतेम २३३ कोटी १९ लाखांचे पीक   कर्जवाटप झाले. १३.१५ टक्के पीक कर्जवाटप होऊ शकलेले आहे.  सलग तीन वर्षांपासून पीक कर्जवाटपाची टक्केवारी घसरलेली आहे. एकाही हंगामात ५० टक्क्यांपर्यंतही पीक कर्जवाटप पोचलेले नाही. अकोला, वाशीम जिल्ह्यांत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने पीक कर्जवाटप करण्यात आघाडी घेतल्याने तेथील टक्केवारी अधिक दिसते. मात्र बुलडाण्यात जिल्हा बॅंकेची आर्थिक स्थिती तितकी चांगली नसल्याने या बॅंकेला जेमतेम कर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिले होते.  पीक कर्जवाटप वाढले पाहिजे यासाठी सर्वच मंत्र्यांनी आढावा बैठका घेतल्या. जिल्हाधिकारी, जिल्हा उपनिबंधकांनी वेळोवेळी बॅंकांना पीककर्ज वाढविण्याबाबत सूचना केल्या. इशारे देण्यात आले. मात्र, पीककर्जाची गती वाढलेली नाही. खरिपासाठी सप्टेंबरपर्यंत पीक कर्जवाटप केले जाते. एप्रिलपासून पीक कर्जवाटपाला सुरवात केली जाते. आत्तापर्यंत साडेचार महिन्यांचा कालावधी लोटला आहे.

जिल्हा लक्ष्यांक वाटप टक्केवारी
अकोला १३९८ ३६२ २५.९१
वाशीम १५३० ३०९ २०.२४
बुलडाणा १७७३ २३३ १३.१५

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com