शेतकरी आठवडे बाजारांना गुंडगिरीचे ग्रहण

शेतकरी आठवडे बाजारांना गुंडगिरीचे ग्रहण
शेतकरी आठवडे बाजारांना गुंडगिरीचे ग्रहण

पुणे ः शेतीमाल विक्री व्यवस्थेतील लांबच लांब साखळी कमी करीत, शेतकरी ते थेट ग्राहक विक्री योजनेंतर्गत सुरू केलेल्या शेतकरी आठवडे बाजाराला गुंडगिरी आणि पालिकेच्या अनास्थेमुळे ग्रहण लागले आहे. पणन मंडळाची मान्यता असलेल्या आणि स्थिरस्थावर झालेल्या आठवडे बाजाराच्या ठिकाणी स्थानिक गुंडांकडून धमकावणे, मारहाण करणे, खंडणी मागणी, अशा घटना पुणे, मुंबईमध्ये घडल्या असून, शेतकऱ्यांनी थेट शेतीमाल विक्री करणे बंद केल्याचे वास्तव आहे. 

शेतीमाल विक्री व्यवस्थेतील साखळीमुळे ग्राहकांना पाच ते सहा पटीपेक्षा जास्तीच्या दराने शेतीमाल विक्री होत आहे. तर, शेतकऱ्यांना त्या तुलनेत अत्यल्प बाजारभाव मिळत असल्याने, सरकारने शेतकरी ते ग्राहक थेट शेतीमाल विक्री योजना सुरू केली. या योजनेचे नंतर नामांतर संत शिरोमणी शेतकरी आठवडे बाजार केले. यासाठी राज्य कृषी पणन मंडळाची नोडल एजन्सी म्हणून नियुक्ती करण्यात आली. गेल्या काही वर्षांत पणन मंडळ आणि पुणे महानगरपालिकेच्या समन्वयातून शहरात ६० शेतकरी आठवडे बाजार सुरू करण्याचे प्रस्तावित करण्यात आले. यानंतर सुमारे १० बाजार सुरू झाले. यामध्ये गांधीभवन, कात्रज, बाणेर, सह इतर १० बाजार सुरळीत सुरू आहेत. मात्र, सध्या या बाजारांना स्थानिक गुंडप्रवृत्तीच्या आणि नगरसेवकांनी पोसलेल्या गावगुंडाचा त्रास होऊ लागला आहे. 

नुकताच बाणेर येथे जुना शेतकरी आठवडे बाजार चालविणारे शेतकरी आणि नंतर नव्याने बेकायदा पद्धतीने सुरू करणारे यांच्यात संघर्ष होऊन, मारहाणीचे प्रकार झाले. हे प्रकरण पोलिस ठाण्यापर्यंत गेले.  तर, भोसरीमध्ये काही दिवसांपूर्वी टोमॅटोचे दर कोसळल्यानंतर आंबेगाव, नारायणगाव येथील काही शेतकऱ्यांनी थेट टोमॅटो विक्रीचा प्रयत्न केला होता. मात्र, स्थानिक विक्रेत्यांनी बळाचा वापर करून, शेतकऱ्यांना धमकावत हुसकवून लावले होते. तर, मुंबईच्या उपनगरांमध्ये काही राजकीय पक्षांनी खंडणी मागितल्याच्या घटनांमुळे शेतकऱ्यांनी शेतीमाल थेट विक्री करण्याचे थांबवले. 

अशा घटनांमुळे शेतीमालाची थेट विक्री आणि शेतकरी आठवडे बाजाराला ग्रहण लागले आहे. यासाठी शासनाने पणन मंडळ, महानगरपालिका आणि पोलिसांनी समन्वय साधत मार्ग काढावा, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत.

शेतकरी आठवडे बाजार उभारताना पणन मंडळ आणि महानगरपालिकांनी कायदेशीर भूमिका घ्यावी. तर काही नगरसेवक राजकीय स्वार्थासाठी गुंडप्रवृत्तीच्या कार्यकर्त्यांना आठवडे बाजाराच्या नावाखाली भाजीपाल्याचे दुकान थाटण्यासाठी सांगतात. हे पूर्णतः बेकायदेशीर आहे. मूळ शेतकरी आणि राजकीय आशीर्वादाने उभे राहिलेले कार्यकर्ते यांच्यात संघर्ष होत आहे, हे टाळले पाहिजे. - नरेंद्र पवार, शेतकरी आठवडे बाजाराचे प्रणेते आणि स्वामी समर्थ शेतकरी उत्पादक कंपनीचे संचालक

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com