सरकारी मदतीबरोबरच विमा भरपाईही मिळणार

राज्यात पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसान भरपाईचा अंतिम आकडा अद्यापही शासनाच्या हाती आलेला नाही.
crop damage
crop damage

पुणे: राज्यात पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसान भरपाईचा अंतिम आकडा अद्यापही शासनाच्या हाती आलेला नाही. मात्र, नैसर्गिक आपत्तीची सरकारी मदत मिळाली तरी शेतकऱ्याला विमा भरपाई देखील मिळणार आहे, असा निर्वाळा सूत्रांनी दिला.   परतीच्या पावसामुळे राज्यात पिकांची अतोनात हानी झाली आहे. ही हानी ४० ते ५० लाख हेक्टरच्या आसपास असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, पिकांचे पंचनामे अद्याप पुर्ण झालेले नाहीत. 

पंचनामे सुरू असतानाच पाऊस होत असल्याने क्षेत्रिय पाहणीत अडथळे येत असल्याचे कर्मचारी सांगतात. त्यामुळे नेमके किती हेक्टरचे नुकसान झाले आहे, याची अंतिम माहिती अद्यापही राज्याच्या मदत व पुनर्वसन विभागाकडे आलेली नाही. मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव किशोरराजे निंबाळकर, कृषी सचिव एकनाथ डवले तसेच कृषी आयुक्त धीरज कुमार हे तिघेही सध्या अंतिम अहवालाच्या प्रतीक्षेत आहेत. ‘‘राज्यभर पीक पंचनामे सुरूच आहेत. पुढील आठवडा देखील पंचनाम्याचा अंतिम अहवाल मिळण्याची शक्यता कमी आहे. मुख्यमंत्र्यांनी पंचनाम्याच्या अंतिम अहवालाची वाट न बघता पीक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी दहा हजाराची व फळपिकांसाठी २५ हजाराची मदत जाहीर केली आहे. ही मदत कमाल दोन हेक्टरपर्यंत असेल. ही मदत संबंधित जिल्ह्यांना राज्य शासनाच्या अकस्मिक निधीतून पाठवली जाणार आहे. केंद्राच्या निधीची वाट न बघता मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या मदतीच्या रकमा वाटण्यासाठी लागणारा निधी मंत्रालयातून थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. पंचनामे पूर्ण झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात जिल्हाधिकाऱ्यांकडून हा जमा केला जाईल,’’ अशी माहिती सूत्रांनी दिली.  दरम्यान, नैसर्गिक आपत्ती निधीतून मदत मिळालेल्या शेतकऱ्यांना पात्र असल्यास पुन्हा पंतप्रधान पीक विमा योजनेतून देखील भरपाई मिळणार आहे. त्यामुळे ‘मदत’ व ‘विमा’ अशा दोन्ही रकमा लवकरात लवकर देत शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न शासनाचा आहे. अर्थात नैसर्गिक मदतीसाठी आवश्यक असलेले ‘पंचनामे’ पुर्ण झालेले नाहीत आणि विम्यासाठी अत्यावश्यक ठरणारे ‘सर्वेक्षण’ देखील अपूर्ण आहे, असा निर्वाळा महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिला.  लवकरच मिळणार ४९४ कोटी रुपये  राज्य शासनाकडून विमा कंपन्यांना विमा हप्त्याचा निधी दोन टप्प्यात दिला जातो. पहिला टप्पा मिळाला असल्यास स्थानिक नैसर्गिक आपत्तीमधील नुकसान भरपाईचे वाटप विमा कंपन्यांना करावी लागते. तशी अट या कंपन्यांच्या करारात आहे. त्यामुळे या कंपन्यांना ४९४ कोटी रुपयांचा पहिला टप्पा लवकरच मिळणार आहे. मात्र, ‘काढणी पश्चात नुकसानी’ची विमा भरपाई संपूर्ण सर्वेक्षण व अहवाल प्राप्त झाल्यानंतर शेतकऱ्यांना मिळणार आहे, असे सूत्रांनी स्पष्ट केले.  

प्रतिक्रिया पंतप्रधान पीक विमा योजनेत सहभागी होवून विमा हप्ता भरलेल्या शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले असल्यास किंवा त्यांच्या मंडळात कमी उत्पादन आले असल्यास अटीत बसणारे शेतकरी विमा भरपाईला पात्र ठरतील. दुसरे असे की, शासन किंवा स्थानिक प्रशासकडून या शेतकऱ्यांना राष्ट्रीय आपत्ती निवारण निधी किंवा राज्य आपत्ती निवारण निधीतून मदत मिळाली असली तरी निकषात बसलेल्या शेतकऱ्यांना विमा भरपाई मिळणार आहे. - धीरज कुमार, कृषी आयुक्त  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com