शेतकऱ्यांना मिळणार पिकांचे नवे १६ वाण

राज्यातील चारही कृषी विद्यापीठांनी शेतकऱ्यांना आतापर्यंत विविध पिकांसाठी ६८५ वाण उपलब्ध करून दिले आहेत. यंदा अजून १६ नवीन वाण तयार करण्यात यश आले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
agri
agri

पुणे: राज्यातील चारही कृषी विद्यापीठांनी शेतकऱ्यांना आतापर्यंत विविध पिकांसाठी ६८५ वाण उपलब्ध करून दिले आहेत. यंदा अजून १६ नवीन वाण तयार करण्यात यश आले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.  कृषी शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, ‘‘१९७३ पासून विद्यापीठांकडून संशोधन सुरू आहे. या संशोधनातून विविध पीक वाण, कृषी यंत्रे, शेती अवजारे तसेच कृषी तंत्रज्ञानाच्या शिफारशी हाती आल्या. संशोधन खुले केल्यामुळे शेतकऱ्यांच्या उन्नतीमध्ये मोठा हातभार लावला गेला आहे. आतापर्यंत चारही विद्यापीठांनी एकूण पाच हजार ८०३ बाबी शोधल्या अथवा विकसित केल्या आहेत. यात ६८५ वाण, ४९८६ शिफारसी आणि १३२ यंत्रे-अवजारांचा समावेश आहे.’’  ‘‘विद्यापीठाने नवे वाण तयार केले किंवा यंत्राचा शोध लावल्यास त्याचा प्रसार मात्र परस्पर केला जात नाही. त्यासाठी विद्यापीठाला ‘संयुक्त कृषी संशोधन व विकास समिती’ची ‘जॉईंट अॅग्रेस्को’ची मान्यता घ्यावी लागते. यंदा समितीसमोर विद्यापीठांकडून २०८ नव्या शिफारशी मांडल्या जात आहेत. चारही विद्यापीठांनी शोधलेल्या नव्या १६ पीक वाणांची शास्त्रीय माहिती समितीला दिली जाणार आहे. समितीने शिक्कामोर्तब केल्यास या संशोधनाची उपलब्धता शेतकऱ्यांसाठी होईल. अर्थात, मान्यतेनंतर शेतकऱ्यांच्या हातात संशोधन जाण्यास अजून वेळ जाणार आहे.  राज्यातील विद्यापीठांच्या इतिहासात राहुरीमधील विद्यापीठ ब्रिटिश काळापासून संशोधनाचा वारसा चालवत आहे. त्यामुळे संशोधन व प्रसारित होणाऱ्या वाणांची संख्या यात राहुरी विद्यापीठ आघाडीवर आहे. दरम्यान, राज्याच्या कृषी क्षेत्रात ''विकेल ते पिकेल'' असे धोरण राबविण्याचा प्रयत्न महाआघाडी सरकारकडून धरला आहे. त्यामुळे या धोरणाला पूरक ठरणारे संशोधन पुढे यावे, असाही आग्रह सरकारी यंत्रणेकडून होत आहे. त्यामुळे विद्यापीठांमधील संशोधनाला संबंधित कुलगुरू वेगळी दिशा देतात की संशोधनाची पारंपरिक चौकट टिकवून ठेवतात, याकडे शास्त्रज्ञांचे लक्ष लागून आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com