व्यापाऱ्यांच्या मुजोरीला शेतकऱ्यांचे चोख उत्तर

‘जशास तसे’च्या धर्तीवर उत्तर देत शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांची मुजोरी मोडीत काढली. व्यापाऱ्यांनी तयार केलेली नियमावली अमान्य करीत अंजनगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपल्या अटींवर संत्रा विकणार असल्याचे ठणकावले.
nagpur-orange
nagpur-orange

अमरावती : ‘जशास तसे’च्या धर्तीवर उत्तर देत शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांची मुजोरी मोडीत काढली. व्यापाऱ्यांनी तयार केलेली नियमावली अमान्य करीत अंजनगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपल्या अटींवर संत्रा विकणार असल्याचे ठणकावले.

अंजनगाव सुर्जी तालुक्यातील चौसाळा, निमखेड, चिंचोळा, भंडारज, खिराडा या भागांत सर्वाधिक संत्रा लागवड क्षेत्र आहे. एकट्या चौसाळा शिवारात संत्र्याची ३२५ हेक्टरवर लागवड आहे. हंगामात देशाच्या विविध भागांतील व्यापारी येथे येत संत्रा खरेदी करतात. स्पर्धेतून या भागातील शेतकऱ्यांना चांगले पैसेदेखील मिळतात. स्थानिक व्यापाऱ्यांच्या हाती अनेकदा एक किंटल संत्रादेखील लागत नाही. त्यामुळे हताश व्यापाऱ्यांनी संत्रा खरेदीसाठी निकष निश्‍चित केले. त्यासोबतच इतर राज्यामतील व्यापाऱ्यांच्या या भागात येऊन संत्रा खरेदीत आडकाठी आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. 

जालना जिल्ह्यातील एका व्यापाऱ्याने या भागात येऊन मंगळवारी (ता. २०)  संत्रा खरेदी केली. या व्यापाऱ्याला यापुढे गावात येऊन खरेदी न करण्याविषयी धमकावण्यात आले. त्यासोबत अकरा हजार रुपये घेत यापुढे गावात येऊन खरेदी केल्यास ५१ हजार रुपये दंड घेऊ अशा शब्दांत दम भरला. व्यापाऱ्यांची मुजोरी एवढ्यावरच थांबली नाही, तर एखाद्या स्थानिक व्यापाऱ्याने एखाद्या शेतकऱ्याच्या बागेचा व्यवहार केल्यानंतर अन्य कोणताही व्यापारी त्या बागेचा सौदा करणार नाही. त्यामुळे व्यापारी ठरवेल त्या दरात संत्रा विकण्यास शेतकऱ्यांना भाग पडणार होते. 

शेतकऱ्यांना याची माहिती होताच त्यांच्यामध्ये असंतोष निर्माण झाला. याचा गावातील युवा शेतकऱ्यांनी एकत्रित येत विरोध करण्याचा निर्णय घेतला. त्याकरिता गावातील शेतकऱ्यांची बैठक पार पडली. 

याच वेळी संत्रा उत्पादक संघ चौसाळाची कार्यकारिणी स्थापन करण्यात आली. त्यामध्ये विलास ढोरे, किशोर आनंद काळमेघ, नंदू काळमेघ, किशोर महादेव काळमेघ, बाळासाहेब काळमेघ, गजानन मेमनकर, साहेबराव मुर्हेकर, राजेंद्र हरणे, पुरुषोत्तम ढोकणे, वासुदेव पवार, धनराज घटाळे, विजय काळमेघ, किशोर आंबदास काळमेघ अशा १३ जणांचा समावेश करण्यात आला आहे. 

संत्रा उत्पादक इतर गावांमध्ये देखील अशा प्रकारची कार्यकारिणी स्थापन करून त्याची नोंदणी केली जाणार आहे. या माध्यमातून व्यापाऱ्यांची मुजोरी मोडीत काढण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला आहे. शेतकरी सुरक्षा समितीदेखील चौसाळा येथे स्थापन करण्यात आली असून, शेतकऱ्यांच्या हिताचे संरक्षण या माध्यमातून केले जाणार आहे. 

व्यापाऱ्यांच्या मनमानी अटी  यापूर्वी २० किलो क्षमतेच्या टोमॅटो क्रेटमध्ये संत्रा फळांची विक्री होत होती. त्याऐवजी २९ ते ३० किलो क्षमतेचे डबा क्रेट वापरणे, क्रेटनुसार संत्र्याला दर देणे, १०० क्रेटवर पाच क्रेट सूट म्हणून मोफत द्यायचे, असे निकष व्यापाऱ्यांनी निश्‍चित केले होते. 

शेतकऱ्यांनी घेतलेले निर्णय

  •  प्रत्येक गावात संत्रा उत्पादक संघाची बांधणी करणे.
  •  जिल्हा निबंधकांकडे या संघाची नोंदणी करणे.
  •  दलालांना दोन ऐवजी एक टक्का कमिशन देणे.
  •  २० किलो वजनाच्या टोमॅटो क्रेटनेच संत्रा विक्री करणे.
  •  क्रेटने संत्रा न घेतल्यास टन किंवा हुंडीचा पर्याय.
  •  संत्रा तोडणीच्या तारखेत तीन ते चार दिवसांची सूट.
  •  संत्रा खरेदीची पावती रेव्हेन्यू स्टॅम्पवरच करणे.
  • प्रतिक्रिया राज्याच्या इतर भागांतील एका व्यापाऱ्याने विलास ढोरे यांच्या बागेतील संत्रा खरेदी केली होती. त्या वेळी स्थानिक व्यापाऱ्यांनी जिंतुरे नामक या व्यापाऱ्याकडून अकरा हजार रुपये दंड वसूल केला. यापुढे या भागातून खरेदी केल्यास ५१ हजार रुपये दंड घेण्याची धमकी दिली. तसेच इतरही काही अटी आपल्या मर्जीने निश्‍चित केल्या. त्याला जशास तसे उत्तर देत आम्ही एकत्रितपणे शेतकरी सुरक्षा समिती आणि संत्रा उत्पादक संघ स्थापन करीत याला विरोध करण्याचा निर्णय घेतला. आता आम्ही आमच्या निकषांवर संत्रा विक्री करू.  - हर्षद काळमेघ, ८२७५३ ९५५७७  सदस्य, शेतकरी सुरक्षा समिती, चौसाळा, जि. अमरावती.  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com