पाण्याअभावी शेती अडचणीत आलीय

एक ते दोन महिन्यांपासून पिण्याच्या पाण्याची अडचण आहे. शेतीची स्थिती तर बिकट आहे. कमी दाबाने वीजपुरवठा होत असल्याने पिण्याचे पाणी उपलब्ध होण्यात अडचणी आहेत. गावात टॅंकरही येत नाही. जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न आहे. आता जून महिना सुरू झाला आहे. खरिपाची तयारी सुरू आहे. पहिलंच कर्ज आहे. आता पुन्हा भातपिकासाठी सोसायटीकडून कर्ज घ्यावे लागणार आहे. - रोहिदास लखिमले, शेतकरी, भोयरे, ता. मावळ.
दुष्काळामुळे पिकांचे नुकसान झाले आहे
दुष्काळामुळे पिकांचे नुकसान झाले आहे

पुणे ः वाढत्या उष्म्यामुळे भूजल पातळी खालावली आहे, शेती ओसाड पडू लागली आहे. ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्यासाठी भटंकती सुरू आहे. पिण्याच्या पाण्यासाठी टॅंकरने पाणीपुरवठा सुरू असून दिवसातून एक ते दोन वेळा टॅंकरचे पाणी येते. हे पाणी मिळवण्यासाठी टॅंकरजवळ झुंबड उडते. अनेक ठिकाणी टॅंकरचेही पाणी मिळेनासे झाल्याने शेतकऱ्यांनी पाण्याच्या सुविधा असलेल्या ठिकाणी स्थलांतर सुरू केले आहे. त्यामुळे गावं ओस पडू लागली आहेत. गतहंगामात पिकांची स्थितीही चांगली नव्हती. पावसाअभावी शेती अडचणीत आली, अशी व्यथा पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मांडली.

जिल्ह्यातील पुरंदर, बारामती, इंदापूर, दौंड, शिरूर, खेड या तालुक्यांमध्ये पाणीटंचाईने उग्र रूप धारण केले आहे. उजनी धरण पावसाळ्यात शंभर टक्के भरले होते. मात्र, त्यानंतर पावसाने ओढ दिल्याने शेतकऱ्यांनी मोटारी टाकून या धरणातील पाण्याचा उपसा सुरू केला. त्यामुळे सध्या या धरणानेही तळ गाठल्याचे दिसून येते. परिणामी, दौंड तालुक्यातही टॅंकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे. यापेक्षाही बिकट स्थिती बारामती, पुरंदर, शिरूर, खेड या तालुक्यांमध्ये आहे.  

खरीप, रब्बी हंगाम वाया गेला  गेल्या वर्षी शेतकऱ्यांना चांगल्या पावसाची अपेक्षा होती. मात्र, सुरवातीपासून जिल्ह्याच्या पूर्व भागात पावसाचे प्रमाण कमी राहिले. पावसाळ्याचे चारही महिने मिळून शिरूरमध्ये १६६.३, बारामतीत २२३.८, इंदापूरमध्ये २३१, दौंडमध्ये १५२.५, पुरंदर ३३७.६ मध्ये मिलिमीटर पाऊस झाला. पावसाअभावी खरीप हंगाम तर वाया गेलाच, शिवाय रब्बी हंगामावर परिणाम झाला. पीक उत्पादनात घट झाल्याने शेतकऱ्यांपुढे घरखर्चासाठी लागणारा पैसा कसा उभा करायचा, असा प्रश्न आहे. मुलांचे शिक्षण, लग्न, कुटुंबाचा खर्च यावरही मर्यादा आल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत.

दुष्काळात कुटुंबाच्या खर्चासाठी पैसा उभा करण्यासाठी सांगवी (बारामती) येथील अमित तावरे यांनी नुकतेच दुधापासून प्रक्रिया केलेल्या पदार्थ विक्रीसाठी दुकान सुरू केले. याबाबत ते म्हणाले, की आमच्याकडे २५ एकर शेती आहे. गेल्या वर्षी पाऊस झाला नाही. शेतात एक विहीर आहे. पण ती कोरडी पडली आहे. जवळ कालवा आहे. पावसाअभावी कालव्याद्वारे पाणी मिळण्याची आशा धूसर झाली आहे. पूर्वी ऊस, मका अशी पिके घेत होतो. मात्र, यंदा पाऊस न झाल्याने शेती अडचणीत आली. चारापिके घेण्यासाठीही पाणी नाही. परिणामी दोन महिन्यांपूर्वी तीन जनावरे विकून टाकली. 

विहिरी पडल्या कोरड्या कमी पाऊस आणि मे महिन्यातील तीव्र उन्हाच्या झळांमुळे पाण्याची मागणी वाढत गेली. परिणामी अधिक उपसा केल्यामुळे विहिरींमधील पाणीपातळी झपाट्याने खालावली आहे. सध्या पुरंदर, बारामती, शिरूर, दौंड, इंदापूर, खेड यासह अन्य तालुक्यांमधील बहुतांशी विहिरींनी तळ गाठला आहे. परिणामी पाणीटंचाई तीव्र झाली असून टँकर सुरू करण्याची मागणी होऊ लागली आहे.   कमी पावसामुळे पुरेशा प्रमाणात चारापिकांची लागवड होऊ शकली नाही. यामुळे चारा उत्पादनात घट झाली. परिणामी शेतकऱ्यांपुढे चाऱ्याचा मोठा प्रश्न आहे. एप्रिलअखेरपर्यंत साखर कारखान्यांचे गाळप सुरू होते. त्यामुळे काही प्रमाणात चारा म्हणून उसाच्या वाड्याचा वापर शेतकरी करत होते. परंतु एप्रिलनंतर साखर कारखाने बंद झाल्याने बारामती, पुरंदर, शिरूर, इंदापूर, दौंड, खेड या तालुक्यांत हा चारा मिळेनासा झाला आहे. त्यातच वाळलेला चाराही दुरापास्त झाला आहे. यामुळे शेतकरी जनावरांची विक्री करू लागले आहेत.   

फळबागांचे झाले सरपण चार ते पाच वर्षांपूर्वी दुष्काळात होरपळलेल्या पूर्व भागातील शेतकऱ्यांनी आर्थिक परिस्थिती नसतानाही कृषी विभागाच्या माध्यमातून हजारो हेक्टरवर फळबाग लागवडी केल्या. त्यातून दरवर्षी एकरी खर्च वजा जाऊन दोन ते चार लाख रुपयांचे उत्पन्न मिळत होते. चालू वर्षी पाणीटंचाईमुळे इंदापूर, बारामती, पुरंदर, खेड, शिरूर या तालुक्यांतील शेकडो हेक्टरवरील फळबागा डोळ्यादेखत जळून गेल्याने शेतात नुसते सरपण उभे असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. परिणामी फलोत्पादक शेतकरी चांगलेच अडचणी आले असून, भविष्यात पुन्हा फळबाग लागवड करायच्या झाल्यास पैसा कोठून आणायचा, हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे.

ढाकाळे (बारामती) येथील उदयसिंग महादेव जगताप म्हणाले, की माझ्याकडे एकूण तीन एकर शेती आहे. २००९-१० मध्ये सर्व क्षेत्रावर डाळिंबाची लागवड केली होती. दरवर्षी सुमारे पाच ते सहा लाखांचे उत्पन्न मिळत होते. यंदा पाणी नसल्याने उत्पादन मिळाले नाही. आता तर संपूर्ण बागच जळून गेली. कृषी विभागाने पंचनामे केले असून, तातडीने नुकसानभरपाई दिली पाहिजे. गावात पणदरे ग्रामपंचायतीने पिण्याच्या पाण्याची सोय केली आहे. मात्र, कालव्याला पाणी नसेल तर पिण्यासाठी पाणी मिळत नाही. टॅंकरही येत नाही. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी वणवण फिरावे लागते. 

चारापिकांच्या उत्पादनात घट  जिल्ह्याच्या पूर्व भागात जानेवारी-फेब्रुवारीपासून चाराटंचाई भेडसावण्यास सुरूरवात झाली. मात्र, शासनाने जाणूनबुजून याकडे दुर्लक्ष केल्याने एप्रिल, मे महिन्यात चाराटंचाई अधिक तीव्र झाली. सध्या जिल्ह्यात उशिराने का होईना पण सुमारे तेरा चारा छावण्या सुरू केल्या आहेत. मात्र छावण्यांबाबत शासनाची उदासीनता दिसून येते. कारण चारा छावण्या सुरू करण्यासाठी शासनाने घातलेल्या जाचक अटी चारा छावणीच्या मालकांसाठी अडचणीच्या आहेत. तरीही दूध संस्थांनी पुढाकार घेऊन सामाजिक उपक्रम म्हणून चारा छावण्या सुरू केल्याचे चारा छावणी मालकांनी सांगितले. 

जनावरांसाठी नुसता उसाचा चारा  जनावरांच्या चारा, पाण्याची सोय व्हावी म्हणून शासनाने चारा छावण्या सुरू केल्या आहेत. त्यामुळे गावागावांमधील शेतकरी छावण्यांमध्ये जनावरे घेऊन येत आहेत. परिणामी छावण्यांमधील जनावरांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. लोणी भापकर येथील महिला शेतकरी विद्या सुभाष गोलांडे म्हणाल्या, की माझ्याकडील तीन जनावरे पंधरा दिवसांपूर्वी चारा छावणीत दाखल केली. छावणीत जनावरांना रोज विविध प्रकारचे खाद्य मिळेल, अशी आशा होती. मात्र, रोज जनावरांना उसाची कुट्टी चारा म्हणून दिला जात आहे. जनावरांनीही ऊस खाण्याचे सोडून दिले आहे. शासनाने किमान हिरवा चारा आणि वाळलेला चारा द्यावा. अशी अपेक्षा आहे. घरी एक एकर शेती आहे. पण पाणी नसल्याने शेती पडीक आहे. पाण्याअभावी खरीप, रब्बी असे दोन्ही हंगाम वाया गेले. चारापिकेही घेता आली नाही. त्यामुळे मोठ्या अडचणी उभ्या राहिल्या आहेत.  दुष्काळात कामपण मिळत नाही. घरखर्च कसा भागवायचा, हा प्रश्नच आहे.  

शेळ्या, मेंढ्यांसाठी छावण्या सुरू करा  दोन ते तीन महिन्यांपासून पाणी, चाराटंचाई जाणवत असल्याने शेळ्या, मेंढ्यांसाठी चारा, पाण्याचा प्रश्न आहे. याबाबत मुंडाळे (ता. बारामती) येथील संपत लक्ष्मण टेंगळे म्हणाले, की ५० मेंढ्या आहेत. मेंढ्यांसाठी चारा नाही. त्यामुळे मेंढ्या घेऊन चारा, पाणी असलेल्या ठिकाणी जात आहे. मात्र, सगळीकडेच पाणीटंचाई असल्याने मेंढ्या जगविण्याचे मोठे आव्हान समोर आहे. लवकर पाऊस झाल्यास चारा होईल. पण सध्या चारा नसल्याने शेळ्या, मेंढ्यांसाठी छावण्या तरी सुरू कराव्यात. ते म्हणाले, की माझ्याकडे एक एकर शेती आहे. पावसाअभावी गेल्या वर्षी खरीप वाया गेला. त्यानंतर रब्बीही तसाच गेल्याने धान्याची अडचण तयार झाली. आता शेत नांगरायलाही पैसे नाहीत. पाऊस पडल्यास कर्ज काढून शेतीचे नियोजन करावे लागेल.     

बारामतीतील पळशी येथे बारामती दूध संघामार्फत चारा छावणी सुरू करण्यात आली आहे. परिसरातील ७००-८०० जनावरे या चारा छावणीत आहेत. यात माझी तीन जनावरे आहेत. मी येथे चार दिवसांपूर्वी जनावरे आणली. येथे दूध संघाच्या चार व्यक्ती असतात. दर रविवारी सुटी असल्याने येथे कोणीच येत नाही. जनावरांनापण चारा नाही. शनिवारी एकाचवेळी दोन दिवसांचा चारा दिला जातो. मोठ्या जनावरासाठी १८ किलो, तर लहान जनावरांसाठी ९ किलो उसाच्या कुट्टीचा चारा देतात. मात्र पेंड अजूनही दिलेली नाही, अशी माहिती मोराळवाडी येथील हनुमंत दामू माघाडे यांनी दिली.

जिल्ह्यातील बहुतांशी भागात पाणीटंचाई वाढली आहे. विहिरी कोरड्या पडल्या असून धरणांनीही तळ गाठला असल्याने नागरिकांची भिस्त टॅंकरच्या पाण्यावर आहे. एक ते दोन दिवसांतून टॅंकर येत असल्याने पुरेसे पाणी मिळण्याची आशा कमी आहे. पाण्याच्या शोधात गावातील कुटुंबे शहरांची वाट धरू लागली आहेत. त्यामुळे गावं ओस पडू लागल्याचे ग्रामस्थ सांगतात.

प्रतिक्रिया माझ्याकडे पाच जनावरे आहेत. सहा दिवस झाले जनावरे छावणीत दाखल केली आहेत. रोज जनावरांना उसाचा चारा दिला जातोय. तोही वाळलेला आहे. पेंड दिवसांतून अर्धा किलो दिली जाते. येथे पुरेशी सावलीची सोय नाही. जी सुविधा आहे, ती तकलादू आहे. छावणीचालकांनी जनावरांसाठी किमान चांगल्या सोयीसुविधा तरी द्याव्यात. - दत्तात्रय भापकर, शेतकरी, पळशी, ता. बारामती.

माझी आठ जनावरे छावणीत आहेत. शनिवारी जनावरांसाठी चारा दिला जातो. रविवारची सुटी असल्याने चारा दिला जात नाही. छावणीचालकांनी हे आधी सांगितलं असतं तर चाऱ्याची सोय करता आली असती. याकडे शासनाचंही लक्ष नाही.  - शिवाजी लोणकर, शेतकरी, लोणी पाटी, ता. बारामती.

माझ्याकडे नऊ एकर शेती आहे. दीड एकरावर अंजीर बाग, अर्धा एकरावर चारापिके आहेत. पाण्यासाठी दोन बोअरवेल आहे. या दोन्ही बोअरवेलला थोडं पाणी आहे. ते पाणी शेततळ्यात टाकून पिकांना ठिबकद्वारे दिले जाते. आता जून महिना सुरू झाला आहे. या काळात पावसाने अजून ओढ दिली तर अंजीर बागांचे भवितव्य धोक्यात येईल. पिण्याच्या पाण्याचीही स्थिती गंभीर आहे. - तुकाराम कोकडे, शेतकरी, न्हावरे, ता. शिरूर.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com