अमरावती : पोलिस अधिकाऱ्याच्या निवासस्थानी बहरली शेती

भारतीय पोलिस सेवेत असलेल्या एका युवा अधिकाऱ्याने शेतीमातीशी असलेली आपली नाळ कायम ठेवत स्वतःच्या घरापुरता सेंद्रिय भाजीपाला पिकविण्यावर भर दिला आहे. शासकीय बंगल्याच्या परिसरात असलेल्या परसबागेचे व्यवस्थापन पोलिस उपायुक्‍त विक्रम साळी, त्यांच्या पत्नी ऐश्‍वर्या आणि वडील महादेव साळी करतात.
Farming flourishes at the residence of a police officer
Farming flourishes at the residence of a police officer

अमरावती ः भारतीय पोलिस सेवेत असलेल्या एका युवा अधिकाऱ्याने शेतीमातीशी असलेली आपली नाळ कायम ठेवत स्वतःच्या घरापुरता सेंद्रिय भाजीपाला पिकविण्यावर भर दिला आहे. शासकीय बंगल्याच्या परिसरात असलेल्या परसबागेचे व्यवस्थापन पोलिस उपायुक्‍त विक्रम साळी, त्यांच्या पत्नी ऐश्‍वर्या आणि वडील महादेव साळी करतात. शेती व्यवस्थापनाचा हा पर्याय दैनंदिन कामाचा ताण घालविण्यासाठी सक्षम पर्याय ठरत असल्याचे या युवा अधिकाऱ्याने सांगितले.  सातारा जिल्ह्यातील रेठारे (बु.) येथील मुळचे असलेल्या विक्रम साळी यांनी कृषी अभियांत्रिकी विषयात आपले शिक्षण पूर्ण केले आहे. त्यांचे वडील महादेव साळी हे सातारा येथील कृष्णा सहकारी साखर कारखान्यात व्यवस्थापक होते, तर आई शोभा यादेखील एएनएम म्हणून होत्या. कुटुंबाच्या शेतीत सारे कुटुंब राबत असल्याने विक्रम यांनादेखील शेतीचा लळा लागला होता. त्यातूनच त्यांनी अकोला येथील पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातून पदवी व नंतर पदव्युत्तर कृषी अभियांत्रिकीची पदवी घेतली. सिंचन हा त्यांचा अभ्यासाचा विषय होता. त्यानंतर इतरांप्रमाणे नोकरीचा शोध सुरू असताना त्यांना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून वर्धा येथे उपविभागीय कृषी अधिकारी नियुक्‍ती मिळाली. परंतु त्यातही मन न रमल्याने त्यांनी पुन्हा परीक्षा दिली. त्याआधारे त्यांची सहायक वनसंरक्षकपदी नेमणूक झाली. परंतु तेथेही न रुळलेल्या विक्रम साळी यांनी पुन्हा प्रयत्न केला. यावेळीदेखील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा ते पास झाले. त्यातून त्यांना पोलिस उपअधीक्षकपदी नेमणूक मिळाली. सद्यःस्थितीत पदोन्नतीने ते अमरावती पोलिस उपायुक्‍त आहेत. शासकीय बंगल्याच्या परिसरात त्यांच्या पत्नी ऐश्‍वर्या यांनी विविध शोभीवंत फुलझाडांची लागवड करून परिसराला नयनरम्य लुक दिला आहे. पक्ष्यांकरीता कृत्रिम घरटीदेखील झाडावर लावलेली आहेत. ऐश्‍वर्या यांचे शिक्षण एम.एस.सी. पर्यंत झाले असून सध्या त्या पीएचडीची तयारी करीत आहेत. विक्रम साळी यांना शेतीची आवड असल्याने परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतावर जात त्या ठिकाणी नांगरटी, पेरणीची कामेही ते आवडीने करतात. अंजनगावबारी येथील रवींद्र मेटकर यांच्या पोल्ट्रीला त्यांनी आपल्या कुटुंबीयांसह अनेकदा भेट दिली. विशेष म्हणजे शेतीशी नाळ कायम ठेवणाऱ्या विक्रम यांचे बंधू डॉ.विक्रांत हे महाबळेश्‍वरला कृषी शास्त्रज्ञ म्हणून सेवा देत आहेत. 

शासकीय बंगल्यात बहरली शेती  पोलिस उपायुक्‍त विक्रम साळी यांनी घरी वांगी, टोमॅटो, दोडका, मिरची, कोबी, घेवडा, लसूण, मका, पपई, केळी यासह तब्बल १७ प्रकारचा भाजीपाला लावला आहे. सेंद्रिय पद्धतीने या परसबागेचे व्यवस्थापन ते करतात. याच बागेतील भाजीपाला रोजच्या स्वयंपाकात असतो, असेही विक्रम साळी यांनी आत्मविश्‍वासाने सांगितले. बंगल्याच्या परिसरात बांबूचे छोटेसे वनदेखील असून त्या ठिकाणी पूर्वी मोठ्या प्रमाणावर कचरा होतो. तो भाग देखील त्यांनी स्वच्छ करीत त्याचाही वनपर्यटनासारखा उपयोग केला आहे. याच परसबागेच्या परिसरात फिरण्याकरीता शेण, मातीने सारविलेला अनोखा ट्रॅकही तयार केला आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com