खर्चाचा इचार करता यंदा शेती घाट्यातच

एक पाऊस पडला त्यावर पेरणी केली, त्यानंतर कधी मधी जी भूरभर आली. त्यावर पिकं थोडीबहूत तगली. ओढ्याच्या काठी शेती पण ओढ्याला पाणी गेलंच नाही. सहा एकरांत बारा क्‍विंटल सोयाबीन झालं. काही शेतकऱ्यांनी रब्बीची पेरणी केली. काहींचं उगवलं काहींच उगवलच नाही. - नंदकुमार कुलकर्णी, लिंबाळा, ता. औसा, जि. लातूर.
लातूर दुष्काळ
लातूर दुष्काळ

काय बी अपेक्षा पूर्ण झाली नाय. सहा एकर सोयाबीन व्हतं, इस कट्टे झाले. उघाडीनं पिकांनी मार खाल्लां. पहिलं पाणी पडलं अन्‌ बंधारे भरले पुन्हा पाणीच न्हाई. पंचमी गेली, पोळा गेला, दसरा गेला दिवाळी आली, पण पाऊस न्हाई. पैसा हातात येणारी पिकं झालीच नाही. एवढच सोयाबीन काय ते. खर्चाचा इचार करात यंदा शेती घाट्यातच, असे लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्‍यातील कबनसावंगीचे मधुकर नीला म्हणाले. ते आणि त्यांच्या पत्नी संगीताताईंनी दुष्काळाने शेतीची केलेली दैना मांडली.  पावसाचा टक्‍का वार्षिक सरासरीच्या व इतर जिल्ह्यांच्या तुलनेत बरा दिसत असला तरी गाव, शेतनिहाय आपलं पावसाचं वेगळ रूप लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पाहायला मिळालं. त्याचा भूजलातील पाणीपातळीवर परिणाम झाला. त्यामुळं जमीनीतील ओल झपाट्यानं तुटली. यंदा रब्बी करणे शक्‍य नाहीचं. रेणापूर तालुक्‍यात काही गावांत झालेल्या गारपिटीनं शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला.  शिरूर अनंतपाळ तालुक्‍यातील कळमगावच्या गंगूबाई धोंडिबा काळे म्हणाल्या, मालक आजारी, मी आजारी, पाच एकरात चार पाच कट्टं सोयाबीन झालं तेवढं. शिरूर अनंतपाळ तालुक्‍यातीलचं पांढरवाडीचे शिवप्रसाद तांबोळकर म्हणाले, एकत्र कुटुंबात जवळपास ३५ एकर शेती. जवळपास इस एकरांत सोयाबीन व्हतं. दरवर्षी दोनशे अडीचशे कट्टं व्हायंचं यंदा निम्म्यापेक्षाही कमी झालं. आता रब्बीची ज्वारी पेरतोयं. पणं ती येईलच म्हणून नाही. पणं जनावरासाठी वैरण व्हईल म्हणून पेरणी करतोय. पिकलेल्या मालाला पणं भावं नायं. खताचं डीएपीचं पोतं बाराशे साडेबाराशेला, सोयाबीनची बॅग दोन हजाराला, तणनाशक एकरी सहाशे, कीटकनाशक हजार बाराशे एकरी, सोयाबीन काढणीला तीन हजार, रास करायला शंभर रुपये कट्टा, यंदा हाती काहीच उरलं नाही. बराबरी म्हणावं त ती बी नाय.  अॅग्रोवनची 'अॉन द स्पॉट' मालिका : जिल्हा लातूर (video)

उदगीर तालुक्‍यातील डिग्रसचे गोरख कोपले म्हणाले, सात एकर शेती, त्यात सात कट्टे सोयाबीन झालं. पंचमीच्या आधी पाऊस पडला व्हतां तवापासून पाणी नायं. जवळपास बारा जनावरं, चार म्हशी दुभत्या, पाच सात पोते सोयाबीनची गुळी, जेवढे दिवस पुरलं तेवढी. थोडं थोडं घातलं त महिनाभरं पुरलं. चारां कुठून मिळलं असं वाटत नाही. शासनानं निदान चाऱ्याची सोय करावी. उदगीर तालुक्‍यातील डिग्रसच्याच शेवंताबाई गायकवाड म्हणाल्या, सरकारचं देणं म्हणजी वरवाचं. निसर्गान दिलं ते मायनं लेकराला दिल्यासारखं. सोयाबीन तुरं, पाचं एकरांत सात कट्टं सोयाबीन झालं. त्यापासून असलेली गुळी मुलांकडं असलेल्या जनावरांना पुरवावी लागेल. आमच्यासारख्या वृद्धाच्या चरितार्थाचं, त्यांच्यांसाठीच्या योजनाचं सरकारनं पाहावं.  पाण्याच्या मोजमापावर प्रश्‍नचिन्ह  शेतकऱ्यांच्या सांगण्यावरून लातूर जिल्ह्यात जो पाऊस दिसतो तो सुरवातीला पडलेला पाऊस. शिवाय एकदा पाऊस पडून त्यानंतर आजपर्यंत पाऊस नाही. पाऊस मोजणारी मोजमाप आहेत कुठं. ज्या ठिकाणी मोजमाप केलं तिथं पाऊस झालां म्हणजे प्रत्येक गावात झालां असं नसतं. येरोळ, धामनगावचे मोहनराव भोसले म्हणाले, जूनला जो पाऊस पडला त्यामुळे मी पाच एकर शेती पेरू शकलो नाही. घरणी प्रकल्प एकाच पावसाने ९५ टक्‍के भरला. त्यानंतर पाऊसचं नाही. म्हणजे पाऊस झाला का. जुलैनंतर पाऊस झालाचं नाही, त्यामुळे पहिल्या पावसावर जे सोयाबीन पिकलं त्याचा दाना बारीक झाला. पाच दहा टक्‍के सोयाबीन वाढत्या उन्हाने फुटले. येरोळचे गोविंदराव जाधव गुरुजी, मुजेवार मैनोद्दीन आजमशा यांचही म्हणनं असचं होतं. 

भूजलपातळीतही घटच  पावसाच्या अवकृपेमुळे यंदा लातूर जिल्ह्यातील भूजलपातळीत सप्टेंबरअखेर १.१५ मीटरची घट नोंदल्या गेली आहे. सर्वाधिक १.९९ मीटरची घट औसा तालुक्‍यातील भूजलपातळीत तर त्यापाठोपाठ रेणापूर तालुक्‍यातील भूजलपातळीत १.९७ मीटर, शिरूर अनंतपाळ तालुक्‍यात १.९१ मीटर, लातूर तालुक्‍यात १.७६ मीटर, उदगीर तालुक्‍यात १.३६ मीटरपर्यंत घट नोंदल्या गेली आहे. 

उत्पादकताही घटलेलीच  लातूर जिल्ह्याची सोयाबीनची सरासरी उत्पादकता हेक्‍टरी ११ क्‍विंटल ७९ किलोची. परंतु यंदा मात्र केवळ ९ क्‍विंटल २५ किलो हेक्‍टरी उत्पादन झाले. उडदाची हेक्‍टरी उत्पादकता ५ क्‍विंटल ९५ किलो असताना यंदा केवळ ४ क्‍विंटल ८५ किलो हेक्‍टरी उत्पादन झाले. मुगाचे सरासरी हेक्‍टरी उत्पादन ५ क्‍विंटल ४० किलो असताना यंदा केवळ ४ क्‍विंटल ३९ किलो हेक्‍टरी उत्पादन झाल्याचे आकडे सांगतात. जिथं मोजमाप झाले तिथल्यानुसार हे उत्पादन आले असेलही, प्रत्यक्षात अनेक शेतकऱ्यांना उत्पादनात मोठा फटका बसला आहे त्याचं कुणी मोजमाप खरच करतं का, असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. सिंचनाची सोय नसल्यानं रब्बीची आशा नाहीचं शिवाय खरीप हातचा गेल्याचे शेतकऱ्यांनी सांगितलं.  

११ टक्‍केच रब्बीची पेरणी  लातूर जिल्ह्यात रब्बीसाठी यंदाचे सर्वसाधारण क्षेत्र १ लाख ९५ हजार हेक्‍टरचे. त्यापैकी केवळ २३ हजार २२९ हेक्‍टरवरचं रब्बीची पेरणी झाली. जळकोट, अहमदपूर, चाकूर तालुक्‍यांत रब्बीची पेरणी झाली नाही. चार ते पाच दिवसांपूर्वी पडलेल्या पावसामुळे औसा तालुक्‍यातील काही भागात पेरणी दिसते. जी पेरणी झाली त्या पिकांचा पिकांना पुढे टिकाव लागेल की नाही ते शेतकरी सांगू शकत नाहीत. त्यामुळे लातूर जिल्ह्यातीर खरीप संपल्यात जमा असताना रब्बीवरही संकटाचे ढग गडद झाले आहेत.  नऊ मंडळांत पावसाची अवकृपाच  लातूर जिल्ह्यातील ५३ महसूल मंडळांपैकी ९ मंडळांत वार्षिक सर्वसाधार पावसाच्या तुलनेत ५० टक्‍केही पाऊस झाला नाही. दहा मंडळांत ५० ते ६० टक्‍के, १५ मंडळात ६० ते ७० टक्‍के पाऊस झाला. औसा तालुक्‍यातील बेलकुंड मंडळात तर सर्वसाधारण पावसाच्या तुलनेत केवळ ३५ टक्‍के, नागलगाव मंडळात ३९ टक्‍केच पाऊस झाला. ७३४ मिलिमीटर पावसाची सरासरी असलेल्या लातूर जिल्ह्यात यंदा सप्टेबरअखेरपर्यंत ४८७.९५ मिलिमीटर पाऊस झाला. २४६ मिलिमीटरची तूट आलेल्या पावसाचे प्रमाण ६६ टक्‍के, तर अपेक्षेच्या तुलनेत तूट ३३ टक्‍के नोंदली गेली.  प्रतिक्रिया साडेतीन एकरात सोळा कट्टे सोयाबीन झालं. परिस्थीत भयंकर आहे. ग्राउंड लेवलवर येऊन कुणी मोजला नाही. इथून पुढं वर्ष जगणं अन्‌ मुलांचं शिक्षण करणं कठीण आहे. शासनानं शेतकऱ्यांच्या व्यथा जाणायला हव्या. शेतात घरून पाणी प्यायला आणावं लागतं.  - धनराज शिंदे,  कळमगाव, ता. शिरूर अनंतपाळ, जि. लातूर. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com