नगर जिल्ह्यात पाण्याअभावी १९ हजारांवर शेततळी कोरडी

यंदा पाऊसच झाला नाही. त्यामुळे शेततळे भरायलाही पाणी उपलब्ध झाले नाही. विहिरीत पाणी नाही, शेततळी कोरडे आहेत. विकत घ्यायचे म्हटले तरी पाणी सहजपणे उपलब्ध होत नाही. त्यामुळे फळबागा जगवणे अवघड झाले असून बागा जागेवर करपून जावू लागल्या आहेत. दहा वर्षांपासून सांभाळलेल्या बागेला आताच फळे यायला लागले होते. आता मात्र बागा जळू लागली असून त्याचा मोठा फटका सोसावा लागणार आहे. शासनाने याबाबत गांभिर्याने विचार करून शेतकऱ्यांना आधार देण्याची गरज आहे. - मीना नवनाथ आव्हाड, शेतकरी, तनपुरवाडी, ता. पाथर्डी, जि. नगर
पावसाअभावी शेततळी कोरडी
पावसाअभावी शेततळी कोरडी

नगर : दुष्काळी स्थिती असताना फळबागा जगविण्यासाठी शेततळ्यांचा आधार शेतकऱ्यांना मिळत होता. यंदा मात्र परिस्थिती अधिक गंभीर आहे. पुरेसा पाऊस झाला नसल्याने शेततळे भरण्यासाठी पाणीच उपलब्ध झाले नाही. त्यामुळे जिल्ह्यामध्ये यंदा साधारण २४ हजार शेततळ्यांपैकी ८० टक्के म्हणजे सुमारे १९ हजारांवर शेततळे कोरडे असल्याचे सांगितले जात आहे. दुष्काळाच्या झळा तीव्र असलेल्या शेवगाव, पाथर्डी, कर्जत, पारनेर या तालुक्‍यांत ही संख्या अधिक आहे. त्याचा फटका आता फळबागांना अधिक बसत आहे. पाण्याअभावी शेततळे कोरडे राहण्याची आतापर्यंतची ही पहिलीच वेळ आहे. 

टंचाईच्या काळात अल्प पाण्यावर पिके घेण्यासाठी शेततळे करण्याची संकल्पना पुढे आली. शेतकऱ्यांची मागणी, शेततळ्यांमुळे होणारे फायदे आणि कमी पाणी घेतले जात असलेले यशस्वी उत्पादन याचा विचार करून शासनेही शेततळे करण्यासाठी शेतकऱ्यांना सातत्याने प्रोत्साहन दिले. सुरवातीला राष्ट्रीय फलोत्पादन अभियान व राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून शेततळे केली जात. नंतर मजुरांना रोजगार मिळावा यासाठी रोजगार हमी योजनेतून कामे होऊ लागली. आता तीन वर्षांपासून मागेल त्याला शेततळे या योजनेतून लाभ दिला जात आहे. कोरडवाहू शेती अभियानातूनही काही शेततळे झालेली आहेत. जिल्ह्यात मागेल त्याला शेततळे योजनेला मोठा प्रतिसाद मिळाला असून आतापर्यंत १० हजार २७३ शेततळे झाली आहेत. तर आधीची साडेतेरा हजार शेततळे आहेत. 

जिल्ह्यामध्ये फळबागांचे क्षेत्र अधिक आहे. त्यामुळे शेततळे घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल आहे. मागील दहा वर्षांत किमान पाच ते सहा वेळा दुष्काळाशी सामना करावा लागला आहे. अशा वेळी शेततळ्यातील संरक्षित पाण्याचा मोठा आधार शेतकऱ्यांना मिळाला होता. ठिबक सिंचनचा वापरही शेततळ्यांमुळेच वाढला असून फळबागा जगविण्यासह अन्य पिकेही शेततळ्यातील पाण्यावर घेतलेली आहेत. आतापर्यंत दुष्काळाशी सामना करताना शेततळ्यांमुळे फळबागा वाचवता आल्या होत्या. यंदा मात्र पहिल्यांदाच अत्यंत गंभीर परिस्थिती झाली आहे. 

दरवर्षी जुन ते ऑगस्ट या काळात शेतकरी शेततळी भरून घेतात. यंदा पावसाळ्याच्या पूर्ण काळात शेततळी भरता येतील असा पाऊस झालाच नाही. शिवाय परतीचा पाऊसही आला नाही. त्यामुळे यंदा शेततळे भरता आले नाही. त्याचे परिणाम आता जानेवारीतच दिसून येऊ लागले आहेत. पाथर्डी, शेवगाव, कर्जत, पारनेर, श्रीगोंदा, संगमनेर, नगर तालुक्‍यांच्या काही भागांत याचा मोठा फटका बसत असून यंदा फळबागा वाचवायला शेततळ्यांचेही पाणी नाही असे शेतकरी बोलून दाखवत आहेत. यंदा नगर जिल्ह्यामध्ये ८० टक्के शेततळे कोरडेच आहेत.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com