`पुरंदर तालुक्यात ढगफुटीनं शेती होत्याची नव्हती झाली`

आधीच दुष्काळाने होरपळून निघालो होतो. कर्ज काढून थोड्या फार प्रमाणात पिके घेतली होती. आता पिके काढणीला आली होती. जवळपास २० ते २५ पोते धान्य होईल असं वाटलं होतं. पण ओढ्याला आलेल्या पुरामुळे चार एकरातील भात, भुईमूग, घेवडा ही पिके वाहून गेली. त्यामुळे मोठं नुकसान झाले. - कमल अरुण झेंडे, महिला शेतकरी, भिवडी, ता. पुरंदर.
ढगफुटीमुळे झालेले नुकसान
ढगफुटीमुळे झालेले नुकसान

पुणे ः शेतकरी दुष्काळातून सावरण्याचा प्रयत्न करीत असताना खरीप हंगामात पावसाने उशिरा हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांचे खरीप हंगामाचे नियोजन कोलमडले. उशिरा पाऊस झाला असला तरी हाती काहीतरी येईल म्हणून शेतकऱ्यांनी पिकांच्या पेरण्या व भातलागवडी केल्या. त्यानंतर पिकेही चांगली आली होती. या पिकांतून चांगले उत्पादन मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र अवघ्या एक ते दोन तासांत झालेल्या ढगफुटीमुळे पिके होत्याची नव्हती झाली. दुष्काळातून सावरत असताना पुन्हा आमच्या स्वप्नांवर अस्मानी संकट कोसळले, अशी भावना पुरंदर (जि. पुणे) तालुक्यातील नारायणपूर, भिवडी, सासवड या भागातील नागरिकांनी व्यक्त केली.  

बुधवारी (ता.२५) सायंकाळी नऊच्या सुमारास पुरंदर तालुक्यातील दक्षिण भागात ढगफुटी झाली. नारायणपूर, भिवडी येथे कोरडे असलेले ओढे, नाले पावसाच्या पाण्याने भरून वाहू लागले. ओढे, नाल्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाल्याने सासवडमध्ये कऱ्हा नदीला पूर आला आणि अनेकांची पिके पाण्याखाली गेली. भिवडी, नारायणपूर येथे भातखाचरात पाणी घुसले. अनेक ठिकाणी बांधबंदिस्ती केलेल्या ताली फुटल्याने शेतातील पिकांसह शेतजमिनी खरडून गेल्या. तसेच भात, भुईमूग, बाजरी, मूग, वाटाणा, उडीद, सोयाबीन, ऊस आणि फळझाडे पिकांचे मोठे नुकसान झाले. अनेक ठिकाणी विजेचे खांबही पडले. काही नागरिकांच्या घरांत पाणी शिरल्याने संसार उपयोगी वस्तूंचे नुकसान झाले. यामुळे या भागातील शेतकरी चांगलेच खचले आहेत. आता पुन्हा सावरण्याची ताकद नसल्याने सरकारने किमान आधार तरी द्यावा, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.

फुटलेल्या बांधामुळे सगळं भातपीक वाहून गेल्याने पंचनामे करण्यासाठी एखादा शासकीय अधिकारी गावात येतो का, याचा शोध घेण्यासाठी गावात भिवडी (ता. पुरंदर) येथील लालसिंग गायकवाड हे सकाळीच दाखल झाले होते. मात्र, गावात शासकीय अधिकारी फिरकलेच नसल्याने गावातील नागरिकांना मनातील भावना बोलून दाखवत होते. उन्हाळ्यात पाणीटंचाईने त्रस्त केल्यानंतर खरिपात चांगला पाऊस होईल अशी अपेक्षा होती. पावसाला उशिरा सुरवात होऊनही काही प्रमाणात दिलासा मिळाला. त्यामुळे आम्ही उभारी घेत वेळेवर भात लागवडी व मूग, घेवडा, उडीद पिकांच्या पेरण्या केल्या होत्या. या पावसामुळे शेतातील भात, घेवडा, मूग, उडीद, भुईमूग ही पीकं वाहून गेली. पिकांसाठी सुमारे ४० ते ५० हजार रुपयांचा खर्च झाला होता. दोन ते तीन तास झालेल्या पावसाने सगळंच होत्याचं नव्हतं करून टाकलं. ओढ्याला पूर आल्यानं शेतातील ताली वाहून गेल्या. विहिरीपण बुजल्या. जवळपास ४ ते ५ लाखांचे नुकसान झाले.    

गुलाब रामचंद्र कदम म्हणाले, की एवढा पाऊस झाला की शेतातील तालीच वाहून गेली. यामुळे जवळपास एक एकरातील गाजराचे पीक नाहीसे झाले. सध्या गाजराला ४० रुपये दर होता. चांगले पैसे होतील अशी अपेक्षा होती. पण आता सगळंच गेल्यानं मोठं नुकसान झाले. खरिपात ३० ते ४० हजार रुपये खर्च झाला होता. आधीच कर्ज काढलं होतं, आता पुन्हा कर्ज काढून रब्बीच नियोजन करावे लागेल. सोपान मोकाशी म्हणाले, की अचानक ओढ्याला पूर आला. आम्हाला वाटलं हे कशाच पाणी हाय, पण नंतर कळालं की नारायणपूरच्या शिवारात मोठा पाऊस झाला. या पावसानं गावातील जवळपास चार गटांतील शेतं खरडून गेली. पीक तर नावाला पण राहिले नाही. ओढ्याचे पाणी घरात घुसल्यानं पाच ते सहा पोती धान्य भिजून गेलं. घरातील भांडी पण वाहून गेली. त्यामुळे संसाराच मोडून पडला आहे. आठ ते दहा लाखांचे नुकसान झाले. आधीच ९० हजारांचे कर्ज घेतले होते. आता कर्ज घेतलं तर फेडायचं कसं हा प्रश्न आहे. 

शेतात बुजलेल्या विहिरींचे किती नुकसान झाले, याची पाहणी विजय वेदपाठक करत होते. डोळ्याला पाणी आणत म्हणाले, की १९३५ मधील विहीर हाय ही. आमच्या आजोबा, पणजोबांनी घेतली होती ती. अजून पाणी होतं तिला. सर्व शेताला पाणी पुरवत होती. पण ढगफुटीनं ओढ्याला एवढं पाणी आलं की विहीरच बुजून गेली. शेतपण खरडून गेलं. त्यामुळे त्यात पीक येणार नाय. घेवडा पीक वाहून गेल्यानं लई नुकसान झालं. आता तर खर्च करायची पण ऐपत नाय, आधीच कर्ज घेतलं होतं, तेच कसं फेडायचं हाच प्रश्न हाय.  

ज्योती भीमथडे म्हणाल्या, की संध्याकाळी जेवण झालं अन् झोपायची तयारी सुरू झाली होती. अचानक ओढ्याला मोठा पूर आला. माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच मी असा पूर अनुभवला. त्यामुळे यंदा नवीनच घातलेली ताल वाहून गेली. सोबत भातपीकपण वाहून गेलं. अडीच ते तीन एकरांवरील पीकं वाहून गेल्याने तीन ते चार लाख रुपयांचे नुकसान झाले. त्यासाठी कर्ज काढले होते. शासनानं मदत दिली तर आम्ही पुन्हा जोमानं उभा राहू.

गणेश पोटे म्हणाले, की पावसाळ्यात एवढा पाऊस कधीच झाला नव्हता. या पावसानं गावातील सगळे रस्ते, शेतं पाण्यानं वाहून गेले. ओढ्याजवळची सगळी शेतं खरडून गेली. माझं भात चांगलं जोमात आलं होतं. किमान दहा ते वीस पोती भात होईल असं वाटतं होत. परंतु या पावसाचं पाणी सगळंच घेऊन गेलं. शेतात सगळे दगड आले. आता शेत तयार करायचं म्हणजे मोठा खर्च करावा लागणार आहे.  सासवडमधील संतोष चौखंडे यांची या पावसामुळे मोठी हानी झाली. अवघी पाऊण एकर शेती असल्याने सहा व्यक्तींचे कुटुंब कसे चालवायचे, हा प्रश्न त्यांच्यासमोर होता. मात्र त्यातूनही मार्ग काढत त्यांनी शेळीपालन व्यवसाय उभा केला होता.

पावसामुळे कऱ्हा नदीला एवढा पूर आला की शेळीपालनाचे सगळे शेडच वाहून गेलं. सोबत पंधरा शेळ्याही वाहून गेल्या. एक विहीर, शेततळेही बुजले, तीन मोटरी, कुट्टीमशिन आणि जवळपास ६५० फुटाची पाइपलाइन वाहून गेली. नारळ, लिंबाची झाडे मुळासकट वाहून गेली. मजुरांसाठी बांधलेल्या सहा खोल्याही पडल्या. सुमारे १० ते १५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले. 

शेतकरी प्रतिक्रिया

पावसामुळं गावातील विहरी बुजल्या. विजेचे खांब मोडले. घरे पण पडली. गावातील सुमारे शंभर ते दीडशे एकरांवरील शेतं खरडून गेल्यानं शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.  

- रामभाऊ  बोरकर, माजी सरपंच, नारायणपूर, ता. पुरंदर.

गेल्या एक ते दोन पिढ्यांत एवढा पाऊस झाला नव्हता, तेवढा पाऊस एका दिवसात झाला. या पावसामुळे अनेकांच्या घरांमध्ये पाणी घुसल्याने नुकसान झाले. शेती तर नावालापण राहिली नाही. विहीरी गायब झाल्या असून दोन ते तीन व्यक्तींचा मृत्यूदेखील झाला.

- अक्षय चौखंडे, पोलिस पाटील, भिवडी, ता. पुरंदर.

मी तर २०१० पासून सासवडमध्ये काम करतो. या पावसामुळे माझी मोटारसायकल, संसारउपयोगी वस्तू, महत्वाची कागदपत्रे सगळीच वाहून गेली. आता तर राहायची पण सोय नाही. दोन दिवसांपासून गावातील मंदिरात कुटुंबासह रात्र काढत आहे. शासनाचा एकही अधिकारी इकडे फिरकला नाही की विचारपूस केली नाही. - विनोद पाटील, मजूर, सासवड.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com