केंद्रीय पथकाकडून कोल्हापूरात धावती पाहणी

केंद्रीय पथक पाहणी
केंद्रीय पथक पाहणी

शिरोळ, जि. कोल्हापूर : आप हर साल गन्ना लगाते हो क्या? आपका कितना नुकसान हुआ है? कितना पानी आया था? अब आप क्या करोगे? असे विचारत केंद्रीय पथकाने शुक्रवारी (ता. ३०) कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी केली.  शेतीच्या झालेल्या नुकसानासह घरांचे व शाळांचे झालेले नुकसान याची त्यांनी माहिती घेतली. तीस ते चाळीस शासकीय वाहनांच्या ताफ्यातून जात पथकाने माहिती घेतली. डॉ. व्ही. थिरुपगाज, आर. पी. सिंग, संजय जैस्वाल, व्ही. पी. राजेवाडी या केंद्राच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. अनेक ठिकाणी जुजबी माहिती इतकेच स्वरूप राहिले.पाच ते दहा मिनिटे प्रत्येक ठिकाणी थांबून माहिती घेत द्रुतगतीने दिवसभर ही पाहणी झाली. सकाळी साडेअकरा वाजता अर्जुनवाड येथे पथक दाखल झाले. केंद्रीय पथकाने दिलेल्या भेटीचा पहा video... या पथकाने अर्जुनवाड पुलावरील पाण्याची पातळी, शेजारी झालेले पिकांचे नुकसान आदींबरोबरच अर्जुनवाड येथे पडलेल्या घरांची पाहणी केली. आरोग्य उपकेंद्र, पडलेले वीज खांब याची पाहणी करत नुकसानीची व्याप्ती जाणून घेतली.दुपारी एक वाजता कुरुंदवाड येथे पथक पोचताच फिजले करीम बागवान या शेतकऱ्याने पथकासामोर आपले गाऱ्हाणे मांडले. उसात जवळ जवळ दहा फुटांपर्यंत पाणी होते. यामुळे सगळा ऊस खराब झाल्याचे सांगितले. या वेळी पथकाने स्थानिक कृषी विभागाच्या अधिकाऱ्याकडून उसाचे क्षेत्र, उसाची रिकव्हरी, उसाची जात, ऊस कोठे जातो याची माहिती रस्त्यावर उभा राहूनच घेतली. ऊस कसा कुजत चाललेला आहे, याबाबत कृषी विभागाच्या व कृषी विद्यापीठाच्या तज्ज्ञांनी माहिती दिली. जिल्ह्यात सोयाबीनसह अनेक खरीप पिकांचेही नुकसान झाले. त्याचा आढावा पथकाने घेतला. पाहणी केलेल्या भागाची पंचनाम्याची प्रत ही मागून घेतली. सायंकाळच्या सत्रात इचलकरंजी, कोल्हापूर, आंबेवाडी, चिखली या भागांचा दौरा पथकाने केला. पथकासमवेत जिल्हाधिकारी दौलत देसाई, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे, कृषी महाविद्यालयाचे विस्तार विभागप्रमुख डॉ. अशोक पिसाळ आदींसह महसूल, बांधकाम, आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते. जलद दौरा पथकाने नुकसान पाहणी दौरा करताना ग्रामस्थांनी जास्त बोलणे  गरजेचे होते, पण पथकाला माहिती देताना शासकीय अधिकारीच  जास्त करून माहिती देताना दिसले. काही ठिकाणी केवळ हजेरी लावत, तर काही ठिकाणी पाच ते दहा मिनिटांचा कालावधी घेत गतीने दौरा झाला. सविस्तर संवाद साधणे गरजेची असल्याची प्रतिक्रिया या वेळी ग्रामस्थांतून उमटत होती. काही शेतकऱ्यांनी ‘बहुत नुकसान हुआ है। जादा रकम दिजिये।’ अशी मागणी करण्याचा प्रयत्न केला; पण पथकाने या मागणीकडे फारसे लक्ष दिले नाही.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com