अनुकूल हवामानात होते पिकांची चांगली वाढ

मागील भागात आपण गहू, हरभरा, रब्बी ज्वारी, कापूस, सोयाबीन आणि भात या पिकासाठी अनुकूल हवामानाची माहिती घेतली. यावेळी उडीद, मूग, तूर, मका आणि भुईमूग ह्या पिकांसाठी आवश्यक अनुकूल हवामानाची माहिती घेऊयात.
pod filling satge of black gram and green gram
pod filling satge of black gram and green gram

मागील भागात आपण गहू, हरभरा, रब्बी ज्वारी, कापूस, सोयाबीन आणि भात या पिकासाठी अनुकूल हवामानाची माहिती घेतली. यावेळी उडीद, मूग, तूर, मका आणि भुईमूग ह्या पिकांसाठी आवश्यक अनुकूल हवामानाची माहिती घेऊयात. उडीद

  • हे एक मुख्य कडधान्य वर्गीय पीक असून मुख्यत्वे खरीप हंगामात घेतले जाते. काही प्रमाणात उन्हाळ्यात सुद्धा घेतले जाते. उष्ण व दमट हवामान असलेल्या भागात मुख्य पीक किंवा आंतरपीक म्हणून घेतले जाते.
  • २५ ते ३५ अंश सेल्सिअस तापमानात चांगले येते.
  • पेरणीच्या वेळी तापमान २५ ते ३० अंश सेल्सिअस, तर काढणीच्या वेळी ३० ते ३५ अंश सेल्सिअस असल्यास उत्पादन चांगले मिळते.
  • उडीद हे पीक ६०० ते ७५० मि.मी. पाऊस पडणाऱ्या भागातसुद्धा घेतले जाऊ शकते. मात्र, पीक फुलोऱ्यात असताना जास्त पाऊस झाल्यास नुकसान होते.
  • फुले लागणे ते शेंगा भरणे हा कालावधी महत्त्वाचा असून या कालावधीत पावसाने खंड दिल्यास पिकाच्या उत्पादनात घट होते. या कालावधीमध्ये जमिनीत ओलावा असल्यास चांगले उत्पादन मिळते. त्यासाठी पाणी उपलब्ध असल्यास पाण्याचे योग्य नियोजन करावे.
  • मूग

  • खरीप हंगामात कडधान्यवर्गीय पीक असून, काही भागात उन्हाळ्यातसुद्धा घेतले जाते.
  • कमी कालावधीचे पीक असून, मुख्य पीक किंवा आंतरपीक म्हणूनही लागवड केली जाते.
  • २८ ते ३४ अंश सेल्सिअस तापमानात चांगले येते.
  • पेरणीच्या वेळी तापमान २५ ते ३२ अंश सेल्सिअस, तर काढणीच्या वेळी ३० ते ३५ अंश सेल्सिअस असल्यास उत्पादन चांगले मिळते.
  • पीक फुलोऱ्यात असताना जास्त पाऊस झाल्यास खूप नुकसान होते.
  • फुले लागणे ते शेंगा भरणे हा कालावधी महत्त्वाचा असून या कालावधीत पावसाने खंड दिल्यास उत्पादनात घट होते. या कालावधीत जमिनीत ओलावा असल्यास चांगले उत्पादन मिळते. त्यासाठी पाणी उपलब्ध असल्यास सिंचनाचे योग्य व्यवस्थापन करावे.
  • तूर

  • खरिपातील मुख्य कडधान्यवर्गीय पीक. लागवड मुख्य पीक किंवा आंतरपीक म्हणूनसुद्धा केली जाते.
  • उष्णदेशीय भागातील पीक आहे. प्रामुख्याने भारताच्या अर्धशुष्क प्रदेशात घेतले जाते.
  • ओलसर व उबदार हवामान अनुकूल असते.
  • उगवणीच्या कालावधीत ३० ते ३५ अंश सेल्सिअस तापमान आवश्यक असते. पुढे सक्रिय वाढीच्या कालावधीत थोडे कमी तापमान २० ते २५ अंश सेल्सिअस परंतु फुलोरा ते शेंगा धरणे या कालावधीत १५ ते १८ अंश सेल्सिअस तापमान तर काढणीच्या वेळी ३५ ते ४० अंश सेल्सिअस यादरम्यान तापमान असल्यास चांगले उत्पादन मिळू शकते.
  • फुलोरा ते शेंगा भरणे हा मुख्य कालावधी आहे. या कालावधीत पावसाने उघडीप दिल्यास उत्पादनात घट होते. त्यासाठी शक्य असल्यास या कालावधीत पाणी व्यवस्थापन करावे.
  • शेंगा भरण्याच्या कालावधीत कमी सूर्यप्रकाशासाठी खूप संवेदनशील पीक आहे. या काळात पावसाळी किंवा ढगाळ वातावरणामुळे कमी शेंगा लागू शकतात.
  • पीक सामान्यतः पावसाच्या पाण्यावर घेतले जाते. मात्र, फुलोरा ते शेंगा भरणे या कालावधीत एक हलके संरक्षित पाणी दिल्यास उत्पादनात वाढ होते.
  • काढणीच्या वेळी गारपीट व जोराचा पाऊस झाल्यास नुकसान होते.
  • शेतात पाणी साचणे, मुसळधार पाऊस व दव अत्यंत नुकसानकारक ठरते.
  • मका

  • लागवड राज्यांच्या बहुतांशी भागात केली जाते.
  • चांगल्या उत्पादनासाठी आवश्यक तापमान ः २५ अंश सेल्सिअस ते ३५ अंश सेल्सिअस तापमान अनुकूल आहे. पेरणी ते उगवणी या कालावधीत तापमान २५ ते ३५ अंश सेल्सिअस, तर परिपक्व ते काढणी कालावधीत ३० ते ३५ अंश सेल्सिअस असल्यास चांगले उत्पादन मिळते.
  • हे पीक ५०० ते १००० मिमी पर्जन्यमानाच्या प्रदेशात सुद्धा येऊ शकते.
  • फुलोरा ते दाणे भरणे हा कालावधी महत्त्वाचा आहे. या कालावधीत जमिनीतील योग्य ओलावा नसल्यास उत्पादनात घट येते. या कालावधीत पाणी व्यवस्थापन केल्यास उत्पादनात वाढ होते.
  • भुईमूग

  • मुख्य तेलवर्गीय पीक असून याची महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात लागवड असते.
  • लागवड प्रामुख्याने पावसाळा व उन्हाळी हंगामात केली जाते.
  • चांगल्या उत्पादनासाठी आवश्यक तापमान ः उगवणीच्या कालावधीमध्ये कमाल तापमान ३० ते ३२ अंश सेल्सिअस, किमान तापमान २३ ते २४ अंश सेल्सिअस, फुले लागणे ते शेंगा धरणे या कालावधीमध्ये कमाल तापमान ३२ ते ३५ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २२ ते २४ अंश सेल्सिअस, तर शेंगा भरणे ते परिपक्वता या कालावधीत तापमान ३२ ते ३० अंश सेल्सिअस तर किमान तापमान २३ ते २४ अंश असल्यास चांगले उत्पादन मिळते.
  • फुलोरा, शेंगा धरणे ते शेंगा भरणे हा कालावधी महत्त्वाचा आहे. या कालावधीत जमिनीत चांगला ओलावा असल्यास चांगले उत्पादन मिळते.
  • व्यवस्थापनाची सूत्रे

  • हंगाम आणि विभागानुसार शिफारसीत जातींची निवड करावी.
  • हवामान बदलानुसार पीक पद्धतीचा वापर करावा.
  • पीक फुलोऱ्यावर असताना व शेंगांची वाढ होत असताना नियमित पाणी पुरवठा आवश्यक असतो. या काळात पाण्याचा ताण पडल्यास फुलगळ, फळधारणा न होणे अशा प्रकारच्या समस्या निर्माण होऊ शकतात.
  • जमिनीतील उपलब्ध ओलावा, पिकांची अवस्था व तेथील हवामान या मुद्द्याचा सखोल विचार करून शक्य असल्यास सूक्ष्म सिंचन पद्धतीचा वापर करून पाणी व्यवस्थापन करावे.
  • मुख्य वाढीच्या अवस्थेमध्ये पावसाने दीर्घकाळ उघडीप दिल्यास किंवा तापमानात वाढ झाल्यास बाष्पीभवनाचा दर वाढल्याने तो कमी करण्यासाठी ओलावा टिकवण्यासाठी आच्छादनाचा वापर करावा. आवश्यक तेव्हा सल्ल्याप्रमाणे बाष्परोधकाची फवारणी करून बाष्पोत्सर्जन कमी करता येते.
  • संपर्कः डॉ. कैलास डाखोरे, ९४०९५४८२०२

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com