कोल्हापूरला सिंधुदुर्ग जिल्ह्यातून ओला चारा

पुरामुळे कोल्हापूर जिल्ह्यात वैरणाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे, त्यामुळे साठ ते सत्तर किलोमीटर अतंरावरून येथे वैरण नेण्यासाठी येतो. साधारणपणे चार दिवसांनंतर गवत नेण्यासाठी आम्हाला यावे लागते. - रामकृष्ण पडवळ, शेतकरी, खोपडेवाडी मांडकुली
कोल्हापूर जिल्ह्यात चाऱ्याचा दुष्काळ
कोल्हापूर जिल्ह्यात चाऱ्याचा दुष्काळ

सिंधुदुर्ग : महापुराने कोल्हापूर जिल्ह्यातील ओला चारा नष्ट झाला आहे. जनावरांना वैरणीसाठी वापरण्यात येणारी उसाची पातही दुर्मीळ झाली आहे. त्यामुळे गगनबावडा तालुक्यातील बहुतांशी शेतकरी जनावरांना जगविण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून ओला चारा घेऊन जात आहेत. भुईबावडा, करूळ घाट परिसरात घाटमाथ्यावरील शेतकरी ओल्या चाऱ्याची कापणी करीत असल्याचे चित्र आहे. रस्त्याच्या कडेला चारा नेण्यासाठी आलेल्या वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्याचे दिसून येत आहे.

कोल्हापुरात महापुराने थैमान घातले, त्यात कोट्यवधी रुपयांची हानी झाली. शेकडो जनावरे पुरात वाहून गेली. हजारो हेक्टर ऊसशेती पाण्याखाली राहिल्यामुळे कुजून गेली; परंतु आता पूर ओसरून कित्येक दिवस झाले आहेत. मात्र आता तेथील शेतकऱ्यांना वेगवेगळ्या संकटांचा सामना करावा लागत आहे. सध्या तेथील शेतकऱ्यांना जनावरांसाठी ओला चारा मिळणे मुश्कील झाले आहे.

पुराच्या पाण्यामुळे हजारो एकरवरील चारा कुजला आहे. उसाची पातसुद्धा मिळत नाही, त्यामुळे जनावरांसाठी वैरण मिळविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे.

गगनबावडा तालुक्यातील गगनबावडा, सांगशी, सैतवडे, साळवण, कळे, असळज, तिसंगी, निवडे, असडोली, शिंदेवाडी, मणदूर, कोदेखुर्द, मांडकुली, वेतवडे, शेणवडे, खोकुर्ली, पळसंबे, खेरीवडे बांटगी यासह विविध गावांतील शेतकऱ्यांसमोर वैरणीचा मोठा प्रश्‍न आहे.

सध्या येथील शेतकऱ्यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैरणीचा मोठा आधार मिळाला आहे. येथील शेकडो शेतकरी वैभववाडी ओल्या चाऱ्याची कापणी करीत आहेत. दुचाकी, कार किंवा ट्रकमधून हे शेतकरी तीन- चार दिवस पुरेल इतका चारा येथून घेऊन जातात. भुईबावडा, करूळ घाट परिसर, तिरवडेतर्फे खारेपाटण, करूळ, उंबर्डे, मांगवली परिसरातील माळरानावर मोठ्या प्रमाणात ओला चारा आहे. येथे सध्या शेकडो शेतकऱ्यांची रीघ लागली आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com