निर्भयपणे मतदानाचा हक्क बजावा : सोरमारे

निर्भयपणे मतदानाचा हक्क बजावा : सोरमारे
निर्भयपणे मतदानाचा हक्क बजावा : सोरमारे

नगर  : ‘‘शिर्डी मतदारसंघासाठी सोमवारी (ता. २९) मतदान होणार आहे. जास्तीत जास्त मतदारांनी निर्भयपणे मतदानाचा हक्क बजावावा. मतदान केंद्राच्या शंभर मीटर परिसरात मोबाईलबंदी राहणारच आहे. मतदान केंद्रांवर आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल,’’ अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी पिराजी सोरमारे यांनी शुक्रवारी (ता. २६) दिली.

उद्या होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने पत्रकार परिषद घेतली. निवडणूक निरीक्षक वीरेंद्रसिंह बंकावत, उपजिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र पाटील, तहसीलदार हेमा बडे, नायब तहसीलदार प्रशांत गोसावी आदी उपस्थित होते.

सोरमारे म्हणाले, ‘‘मतदानप्रक्रियेसाठी प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे. शिर्डी मतदारसंघातील एक हजार ७१० मतदान केंद्रांवर मतदान होईल. सोमवारी सकाळी सात ते सायंकाळी सहा दरम्यान मतदानप्रक्रिया सुरू राहील. त्यासाठी नियुक्त केलेले ११ हजार २८६ अधिकारी- कर्मचारी मतदानाचे साहित्य घेऊन रविवारी (ता. २८) मतदान केंद्रांवर रवाना होतील. यात दोन बॅलेट युनिट, एक कंट्रोल युनिट, एक व्हीव्हीपॅट असणार आहे.’’

मतदानयंत्रे नेणाऱ्या वाहनांना जीपीएस प्रणाली राहणार आहे. मतदारांच्या मदतीसाठी ‘१९५०’ हा हेल्पलाइन क्रमांक उपलब्ध राहणार आहे. ज्याच्याकडे मतदार ओळखपत्र नसेल, त्याचे पासपोर्ट, वाहनचालक परवाना, बॅंकेचे पासबुक, आरोग्य विमा स्मार्ट कार्ड आदी अकरापैकी कोणताही एक पुरावा ग्राह्य धरण्यात येईल. शिर्डी मतदारसंघात आचारसंहिता भंगाच्या चार तक्रारी झाल्या आहेत. २२ लाख ८९ हजार ५६५ रुपयांची रोकड आतापर्यंत पकडण्यात आली आहे. १६ हजार १७४ लिटर अवैध दारूसह एकूण ३३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला, असेही सोरमारे यांनी सांगितले.

मतदान यंत्रांसाठी कूलरची व्यवस्था

मतदानयंत्रे बंद पडू नयेत म्हणून विशेष खबरदारी घेतली आहे. प्रत्येक केंद्रावर कूलरची व्यवस्था करण्यात येणार आहे. तरीही मतदान यंत्र काही तांत्रिक कारणास्तव बंद पडले, तरी अर्ध्या तासात ते पूर्ववत करण्यात येईल. कोणताही मतदार मतदानापासून वंचित राहू नये, यासाठी सर्व उपाययोजना राबविल्या जात आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com