Agriculture news in marathi Feed the goats with food mixture | Agrowon

शेळ्यांच्या आहारात द्या खाद्य मिश्रण

डॉ. प्रफुल्लकुमार पाटील, डॉ. मत्स्यगंधा पाटील
गुरुवार, 11 जून 2020

शेळ्यांच्या गरजेनुसार पशुखाद्याचा वापर केल्यामुळे करडे सशक्त जन्मतात. शेळ्यांच्या कासेत मुबलक दूध तयार होते. रोगप्रतिकारशक्ती चांगली राहाते. पाटी लवकर वयात येऊन गाभण राहू शकतात.
 

शेळ्यांच्या गरजेनुसार पशुखाद्याचा वापर केल्यामुळे करडे सशक्त जन्मतात. शेळ्यांच्या कासेत मुबलक दूध तयार होते. रोगप्रतिकारशक्ती चांगली राहाते. पाटी लवकर वयात येऊन गाभण राहू शकतात.

बहुतांशी शेतकऱ्यांकडे २ ते १० या संख्येने शेळ्या असतात. त्यांचे संगोपन पारंपरिक पद्धतीनेच केले जाते. मुख्यतः या शेळ्यांना दिवसभर चरायला सोडून रात्रभर शेडमध्ये किंवा घरासमोर अंगणात बांधून ठेवले जाते. काही शेतकरी संध्याकाळी शेळ्या घरी आणल्यानंतर ज्वारी, गहू थोड्याफार प्रमाणात शेळ्यांना देतात. परंतु याचे प्रमाण अत्यल्प आहे. पावसाळ्यामध्ये हिरवा झाडपाला शेळ्यांना खायला मिळतो. यातून काही प्रमाणात प्रथिने, कर्बोदके, जीवनसत्त्व व क्षार शेळ्यांना मिळतात. परंतु सर्व पोषणतत्त्व शेळ्यांच्या शरीराच्या गरजेनुसार मिळत नाहीत. त्यामुळे शेळ्या अशक्‍य होऊन दूध उत्पादन, शारीरिक वाढ, शेळ्यांतील माज, गर्भधारणा किंवा गर्भाशयातील पिलांची वाढ, गाभण शेळ्यांच्या आरोग्यावर अनिष्ट परिणाम होतो. यामुळे शेळीपालनामध्ये नफ्याचे प्रमाण कमी होते. म्हणून उपलब्ध चाऱ्याची प्रत व प्रमाणानुसार आहारात योग्य बदल करावा. पशुखाद्याचा गरजेनुसार वापर करावा.

पशुखाद्याच्या वापराचे प्रमाण 

 • झाडपाला, द्विदल चारापिके हा शेळ्यांच्या आहारातील मुख्य भाग आहे. परंतु बऱ्याच वेळा झाडपाला, द्विदल चारापिके पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नाहीत. अशावेळी केवळ वाळलेले गवत, शेतातील दुय्यम पदार्थांचा शेळ्यांच्या आहारात वापर केला जातो. अशा वेळी पोषणतत्त्वांची गरज अशा चाऱ्यामधून पूर्ण होऊ शकत नाही, ती गरज पशुखाद्याद्वारे पूर्ण गरजेचे आहे.
 • गाभण काळातील शेवटच्या दीड महिने (४५ दिवस) या कालावधीत गर्भाशयातल्या पिलांची वाढ झपाट्याने होत असते आणि या वाढीसाठी उत्तम प्रकारचा संतुलित आहार गरजेचा असतो. या काळात चांगल्या चाऱ्याबरोबरच पशुखाद्य १०० ते १५० ग्रॅम द्यावे.
 • ज्यांना चांगल्या प्रतीचा चारा मिळत नाही अशा शेळ्यांना ३०० ते ३५० ग्रॅम पशुखाद्य प्रतिदिन द्यावे. याच काळात कासेतील काही जुन्या पेशी नष्ट होऊन नवीन पेशी तयार होत असतात. त्याकरिता प्रथिनांची गरज असते.
 • गाभण काळात झालेल्या पोषणमूल्यांच्या साठ्याचा वापर दुग्धोत्पादन काळात शेळ्यांचे वजन टिकवण्यासाठी होतो. म्हणून गाभण काळात पशुखाद्याचा वापर निश्‍चित फायदेशीर ठरतो.
 • ज्या शेळ्यांना जुळी-तिळे किंवा जास्त पिले असतील त्या शेळ्यांना पोषणतत्त्वांची जास्त गरज असते, म्हणून त्यांच्या आहारात पशुखाद्याचा योग्य प्रमाणात वापर करावा.
 • उन्हाळ्यामध्ये शेळ्यांच्या शरीरावर एक प्रकारचा ताण असतो, त्यामुळे चाऱ्याच्या पचनक्रियेवर अनिष्ट परिणाम होतो. म्हणून या काळात थोड्या तरी प्रमाणात पशुखाद्य तसेच ऊर्जा पुरवणाऱ्या घटकांचा वापर करावा.
 • शेळी व्याल्यानंतर पहिले काही दिवस चारा खाण्याची इच्छा कमी असते. त्यामुळे पशुखाद्याचा वापर करून शेळ्यांच्या शरीराची पोषणतत्त्वांची गरज पूर्ण करावी.
 • विल्यानंतर ज्या वेळी शेळ्या गाभण जाण्याचा काळ असतो, त्या वेळी जर योग्य प्रमाणात पशुखाद्याचा वापर केल्यास शेळ्यांतील गर्भधारणा होण्याचे आणि जुळे-तिळे करडे होण्याचे प्रमाण वाढू शकते.
 • ज्या वेळी करडांना योग्य प्रमाणात दूध मिळत नाही, त्याची वाढ खुंटते, अशावेळी पशुखाद्याचा वापर निश्‍चित फायदेशीर ठरतो.
 • शारीरिक वाढीच्या काळात पशुखाद्याचा वापर करडांसाठी जलद वाढ होण्यास फायदेशीर ठरतो.

पशुखाद्याचे नियोजन

 • सर्वसाधारणपणे वाढणाऱ्या करडांच्या पशुखाद्यात सोयाबीन पेंड किंवा शेंगदाणा पेंडेचा ३० ते ३५ टक्के वापर करावा. इतर घटकांमध्ये ज्वारी, बाजरी किंवा मका यांचा सर्वसाधारणपणे ४० ते ४५ टक्के इतका वापर करावा. भरडलेला गहू १० टक्के, हरभरा चुणी १८.५ टक्के, क्षार मिश्रण १.५ टक्के आणि मीठ १ टक्के असे प्रमाण असावे.
 • मोठ्या शेळ्यांच्या पशुखाद्यात सरकी पेंडेचा वापर करावा. ऊर्जा पुरवठा करणाऱ्या घटकांमध्ये ज्वारी, बाजरी, मका,गहू यांचा वापर करावा.
 • दुधाळ शेळ्यांसाठीच्या पशुखाद्यात सर्वसाधारणपणे २७ टक्के सरकी पेंड, ४० टक्के मका, भरडलेला गहू १३ टक्के, हरभरा चुणी १७.५ टक्के , क्षार मिश्रण १.५ टक्के व मीठ १ टक्का असे पशुखाद्य घटकांचे प्रमाण असावे.
 • दुधाळ शेळ्यांसाठीच्या आहारात शक्‍यतो भरडलेला मका वापरावा. कारण यातून गरजेनुसार दूध उत्पादनासाठी कर्बोदके, ऊर्जेचा वापर होतो. सदर पशुखाद्य जाड भरडून पीठ न करता किंवा गोळी पेंडेच्या स्वरूपात द्यावे.

गरजेनुसार पशुखाद्याचा वापर केल्यामुळे होणारे फायदे 

 • करडे सशक्त जन्मतात. शेळ्यांच्या कासेत मुबलक दूध तयार झाल्यामुळे करडांची वाढ चांगली होऊन मरतुकीचे प्रमाण कमी होते. रोगप्रतिकारशक्ती उत्तम राहिल्यामुळे करडे आजारांना बळी पडत नाहीत. जलद वाढीमुळे करडांची कमी वयात विक्री करता येते.
 • पाटी लवकर वयात येऊन गाभण राहू शकतात. अशा पाटीपासून उत्पादन काळ जास्त मिळतो. शेळ्या अशक्त होत नाहीत, त्यामुळे माजावर वेळेवर येतात. गर्भधारणाही वेळेवर होते. जुळे/तिळे करडांचे प्रमाण वाढते.
 • कष्टप्रसूती, मायांग बाहेर येणे, झार अडकणे अशा समस्या टाळता येतात. औषधोपचारावरील खर्च कमी होतो.
 • संतुलित पशुखाद्य देण्यामुळे लसीकरण केलेल्या शेळ्यांच्या शरीरामध्ये चांगली रोगप्रतिकारशक्ती निर्माण होते. दोन वेतातील अंतर कमी होऊन एका शेळीपासून जास्तीत जास्त करडे मिळतात. शेळीपालनातील अर्थकारणात सुधारणा होते.
 • पोषणतत्त्वांच्या कमतरतेमुळे निर्माण होणारे आजार टाळले जातात.

संपर्क - डॉ. प्रफुल्लकुमार पाटील, ८३२९७३५३१४
(पशुवैद्यकीय महाविद्यालय, उदगीर, जि. लातूर )


इतर कृषिपूरक
दुग्ध व्यवसाय ठरतोय शेतीला आधारपनवेल येथील बांधकाम व्यावसायिक अनिल लक्ष्मण...
जनावरांच्या आहारात असावीत खनिज मिश्रणेखनिज कमतरतेचा परिणाम जनावरांची वाढ तसेच प्रजनन...
सामूहिक प्रयत्नातूनच प्राणिजन्य आजारावर...जगातील सुमारे ७० टक्के आजार हे प्राणिजन्य आहेत,...
जनावरांमध्ये दिसतोय स्नोअरिंग आजारमराठवाड्यातील काही भागांमध्ये (विशेषतः औंढा...
कोंबड्यांतील रोगप्रसार टाळाआजारी कोंबड्यांच्या व्यवस्थापनासाठी लागणारी भांडी...
विक्रमी दुग्धोत्पादन देणारी ‘जोगन'गायहरियानातील गालीब खेरी (कर्नाल) येथील पशूपालक...
जनावरांच्या आरोग्याकडे नको दुर्लक्षपावसाळ्यात हिरव्या चाऱ्याची उपलब्धता अधिक...
शाश्‍वत दूध उत्पादनासाठी ‘टीएमआर'गायीला शरीर वजन तसेच दूध उत्पादनासाठी आवश्यक...
जातिवंत वंशवृद्धीसाठी भ्रूण प्रत्यारोपण...साधारणपणे जातिवंत दुधाळू गाय एका वर्षात एकाच...
जनावरांच्या आहारात असावीत खनिज मिश्रणेखनिज मिश्रणाच्या अभावामुळे होणारे...
स्वच्छ दूध उत्पादनाची तत्त्वेदूध उत्पादनामध्ये भारताने आघाडी घेतली असली तरी...
संकरित गाईंची दूध उत्पादन वाढीची सूत्रेसद्यःस्थितीतील संकरित गाईंची दुसऱ्या-तिसऱ्या...
रेशीम कीटकांवर होणारा हवामानाचा परिणामरेशीम उत्पादनासाठी आवश्यक खर्चाचे प्रमाण अत्यल्प...
रानभाज्यांचे आहारातील महत्त्वशेती न करता नैसर्गिक स्थितीमध्ये उगवलेल्या...
दुधाळ जनावरांसाठी सॉर्डेड सीमेन...अलीकडच्या काळात पशुपालनामध्ये सेक्‍स ...
जनावरे, गोठ्याची ठेवा स्वच्छतापावसाळ्यात जनावरांच्या आरोग्याला असलेला धोका...
रेबीज’ची लक्षणे तपासा, उपाययोजना करामनुष्यामध्ये रेबीज विषाणू मध्यवर्ती मज्जासंस्थेला...
जनावरांमध्ये होणारा शिंगाचा कर्करोगशिंगाचा कर्करोग साधारणपणे ५ ते १० वर्षे वयोगटातील...
गवळाऊ संगोपनाचे पाऊल पडते पुढेविदर्भामध्ये गवळाऊ दुधाळ गाय आणि शेतीकामासाठी...
जनावरांच्या आहारात मूरघासाचा वापरमूरघासामुळे वर्षभर हिरव्या चाऱ्याचा पुरवठा करता...