राज्यात मेथी २५० ते ३००० रुपये शेकडा

सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात मेथीची आवक अगदीच कमी झाली. पण मागणी असल्याने दर टिकून राहिले.
Fenugreek in the state is 250 to 3000 rupees per hundred
Fenugreek in the state is 250 to 3000 rupees per hundred

सोलापुरात प्रतिशेकडा ३०० ते ७०० रुपये

सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात मेथीची आवक अगदीच कमी झाली.  पण मागणी असल्याने दर टिकून राहिले. मेथीला शंभर पेंढ्यांना किमान ३०० रुपये, सर्वसाधारण ५०० रुपये आणि सर्वाधिक ७०० रुपये दर मिळाला, असे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले. 

बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात मेथीची रोज २ हजार ते ४ हजार पेंढ्यांपर्यंत जेमतेमच आवक राहिली. स्थानिक भागातूनच सर्वाधिक आवक राहिली. मेथीला शंभर पेंढ्यांसाठी या आधीच्या सप्ताहातही भाज्यांची आवक साधारण प्रतिदिन चार ते पाच हजार पेंढ्यांपर्यंत राहिली. तर दर प्रति शंभर पेंढ्यांना किमान २५० रुपये, सर्वसाधारण ४५० रुपये आणि सर्वाधिक ६०० रुपये मिळाला. 

जानेवारी महिन्यातील पहिल्या सप्ताहातही आवकेचे प्रमाण असेच प्रतिदिन ५-६ हजार पेंढ्यापर्यंत राहिले. तर, मेथीचा दर शंभर पेंढ्यांना किमान ३०० रुपये, सर्वसाधारण ५५० रुपये आणि सर्वाधिक ७०० रुपये असा मिळाला.  

परभणीत क्विंटलला २५० ते ५०० रुपये

परभणी ः येथील पाथरी रस्त्यावरील फळे, भाजीपाला मार्केटमध्ये गुरुवारी (ता.२१) मेथीच्या १५ हजार जुड्यांची आवक होती. मेथीला प्रतिशेकडा कमाल २५० ते किमान ५०० रुपये, तर सर्वसाधारण ३७५ रुपये दर मिळाले, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली.

सध्या येथील मार्केटमध्ये स्थानिक परिसरातील लोहगाव, सिंगणापूर, इटलापूर, उजळंबा, बोरवंड आदी गावातून मेथीची आवक होत आहे. गेल्या महिनाभरातील प्रत्येक गुरुवारी मेथीच्या १५ ते ३० हजार जुड्यांची आवक होऊन प्रतिशेकडा सर्वसाधारण ३०० ते ३७५ रुपये दर मिळाले.

गुरुवारी (ता.२१) मेथीच्या १५ हजार जुड्यांची आवक होती. त्यावेळी घाऊक विक्रीचे दर प्रतिशेकडा २५० ते ५०० रुपये होते. तर, किरकोळ विक्री प्रतिजुडी ५ ते १० रुपये दराने सुरु होती, असे व्यापारी प्रकाश बोराडे यांनी सांगितले.

अकोल्यात क्विंटलला ६०० ते १५०० रुपये

अकोला ः थंडीच्या मोसमात उपलब्ध होणाऱ्या मेथीचा हंगाम येथील बाजारात सध्या अंतिम टप्‍यात आला आहे. गुरुवारी (ता. २१) मेथीला किमान ६०० ते कमाल १५०० रुपयांचा दर मिळाला. मेथीची ८० क्विंटलपेक्षा अधिक आवक झाली होती, अशी माहिती सूत्रांनी दिली.

दिवाळीपासून बाजारात दाखल होणाऱ्या मेथीचा हंगाम सध्या शेवटच्या टप्प्यात सुरु आहे. अकोल्यात पश्‍चिम विदर्भातील जिल्ह्यातून दररोज मेथीची मोठी होत असते. सध्या दर कमी झाले आहेत. साधारण दर्जाची मेथी ६०० ते ९०० दरम्यान विक्री होत आहे. तर, चांगल्या दर्जाच्या मेथीला १००० ते १५०० पर्यंत दर मिळत आहे. 

गुरुवारी ६०० ते १५०० दरम्यान मेथी विक्री झाली. सध्या आवक मोठी असून तुलनेने दर्जा तितका चांगला नाही.  शिवाय मागणीही पुरेशी नाही. यामुळे दर जेमतेम  मिळत आहेत, असेही सूत्रांनी सांगितले.

नाशिकमध्ये प्रतिशेकडा १००० ते ३००० रुपये

नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (ता.२०) मेथीची आवक ५५०० जुड्या झाली. प्रति १०० जुड्यांना १००० ते ३०००, तर सर्वसाधारण दर २००० रुपये होते. आवक सर्वसाधारण असून गेल्या तीन दिवसांत दर स्थिर झाले आहेत, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

मेथीची आवक घटली आहे. उठाव वाढल्याने दरात सुधारणा होत आहे. मंगळवारी (ता. १९) मेथीची आवक ६५०० जुड्या झाली. त्यास ५५० ते ३०००, तर सर्वसाधारण दर २००० रुपये राहिला. सोमवारी (ता. १८) मेथीची आवक ४२०० जुड्या झाली. त्यास ९०० ते ३०२० असा दर मिळाला. सर्वसाधारण दर २२०० रुपये राहिला. रविवारी (ता.१७) मेथीची आवक ३३२० जुड्या झाली. त्यास १००० ते २००० असा दर मिळाला. सर्वसाधारण दर १५०० होता.

शनिवारी (ता.१६) मेथीची आवक ३८६० जुड्या झाली. त्यास ५०० ते १४०० रुपये दर मिळाला. सर्वसाधारण दर १००० राहिला. शुक्रवारी (ता.१५) मेथीची आवक ३४४० जुड्या झाली. त्यास ६०० ते २१०० असा दर मिळाला. सर्वसाधारण दर १३०० रुपये राहिला. गुरुवारी (ता.१४) आवक ३१५० झाली. त्यास ५०० ते २००० असा दर मिळाला. सर्वसाधारण दर १२०० रुपये राहिला.

गत महिन्याच्या तुलनेत आवक घटली आहे. मागणी असून उठाव वाढल्याने दरात सुधारणा होत आहे. मात्र गेल्या दोन दिवसांत ही आवक कमी झाली.

नांदेडमध्ये प्रतिशेकडा ३५० ते ४०० रुपये नांदेड : नांदेड बाजारात सध्या मेथीची आवक वाढल्यामुळे दरात स्थिरता आली आहे. इतवारा तसेच तरोडा भागात सध्या रोज २५ हजार ते ३० हजार जुड्या आवक होत आहे. यास प्रतिशेकडा ३५० ते ४०० रुपये शेकडा दर मिळत असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

नांदेडमध्ये सध्या बाजारात मेथीची आवक वाढली आहे. नांदेड शहरातील इतवारा तसेच तरोडा नाका भागात भरणाऱ्या ठोक बाजारात सध्या स्थानिक शेतकऱ्यांसह सोलापूर व कोल्हापूर जिल्ह्यातून आवक होत आहे, असे महंमद जावेद म्हणाले.

जळगावात क्विंटलला १०००  ते १२०० रुपये 

जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी (ता. २१)  मेथीची ११ क्विंटल आवक झाली. दर प्रतिक्विंटल १००० ते १२०० व सर्वसाधारण १००० असे होते. आवक जळगाव जिल्ह्यातील जामनेर, जळगाव, धरणगाव आदी भागातून होत आहे. दर स्थिर आहेत.

पुण्यात प्रतिशेकडा ४०० ते ८०० रुपये

पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता.२१) मेथीच्या सुमारे ८० हजार जुड्या आवक झाली होती. यावेळी शेकड्याला ४०० ते ८०० रुपये दर होता. सध्या पुणे बाजार समितीमधील आवक ही पुण्यासह विभागातील विविध जिल्ह्यांमधून होत आहे.

दरम्यान, पुण्यानंतर भाजीपाल्यासाठी प्रसिद्ध असलेल्या जुन्नर बाजार समितीच्या नारायणगाव उपबाजारात बुधवारी (ता.२०) मेथीच्या सुमारे ७५ हजार जुड्यांची आवक झाली होती. यावेळी शेकड्याला ७०१ ते १ हजार ८०० रुपये दर होता.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com