दोंडाईचा मालधक्क्यावर अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत खत वितरण

युरिया वितरणातील घोळ, शेतकऱ्यांच्या तक्रारी व परराज्यातील तस्करी यासंबंधीच्या तक्रारी वाढल्यानंतर जिल्ह्यात रेल्वे मालधक्क्यावरून युरियाचे वितरण कृषी विभागातील अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत केले जात आहे.
संग्रहित आणि प्रतिकात्मक छायाचित्र
संग्रहित आणि प्रतिकात्मक छायाचित्र

धुळे ः युरिया वितरणातील घोळ, शेतकऱ्यांच्या तक्रारी व परराज्यातील तस्करी यासंबंधीच्या तक्रारी वाढल्यानंतर जिल्ह्यात रेल्वे मालधक्क्यावरून युरियाचे वितरण कृषी विभागातील अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत केले जात आहे.

दोंडाईचा (ता.शिंदखेडा) येथील रेल्वे मालधक्क्यावर युरिया घेऊन दाखल झालेल्या रेल्वे रेकमधील युरियाचे वितरण अधिकाऱ्यांच्या उपस्थित झाले. एका कंपनीकडून जिल्ह्यात एक हजार ६०० टन युरियाचा पुरवठा रेल्वे रेकद्वारे झाला. हा रेक दोंडाईचा येथील रेल्वे मालधक्क्यावर थांबला होता. तेथून युरियाचे वितरण वितरक, विक्रेत्यांपर्यंत करण्याचे नियोजन होते. परंतु या धक्क्यावरून युरियाची तस्करी मध्य प्रदेश व इतर भागात केली जाते. युरिया वाटपात घोळ असतो. खत पुरवठादार कंपन्या दाद देत नाहीत, अशा तक्रारी शेतकरी आणि काही विक्रेते करीत होते. याची दखल घेऊन रेक मालधक्क्यावर दाखल होताच कृषी विभागाचे अधिकारी या धक्क्यावर दाखल झाले. त्यांनी पाहणी केली व युरियाचे वितरण सुरू झाले.

मालधक्क्यावर युरिया वाहतुकीसाठी ट्रक आले होते. या वेळी अधिकाऱ्यांनी खत वितरकांशी चर्चा केली. काय अडचणी येतात, याची माहिती घेतली. युरियाची टंचाई हा पुरवठा झाल्याने बऱ्यापैकी दूर होणार आहे, असा दावा करण्यात आला.

या वेळी कृषी विकास अधिकारी पी. एम. सोनवणे, मोहीम अधिकारी अभय कुवर, शिंदखेडा तालुका कृषी अधिकारी विनय बोरसे आदी उपस्थित होते. या रेकमधून शिंदखेडा तालुक्यात ३८० टन, धुळ्यात ३९५, साक्रीत ४५० तर शिरपुरात ३७५ टन युरिया वितरकांना वितरण करण्यात आला. पुढील आठवड्यात युरियाची टंचाई बऱ्यापैकी दूर होणार असल्याचा दावाही करण्यात आला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com