जळगावात लॉकडाउनमुळे खते गेली परत

जळगाव ः लॉकडाउनमुळे जळगाव येथील रेल्वे मालधक्क्यापर्यंत आलेला रासायनिक खतांचा रेक परत पाठविण्याचा प्रकार जिल्ह्यात घडला आहे. हा रेक जळगावएेवजी मलकापूर येथे पाठविण्यात आला असल्याची माहिती आहे.
Fertilizer goes back to Jalgaon due to lockdown
Fertilizer goes back to Jalgaon due to lockdown

जळगाव ः जिल्ह्यात खतांची टंचाई आहे. यातच जळगाव, भुसावळ व अमळनेरात सात दिवस लॉकडाउन जाहीर झाले आहे. लॉकडाउनमुळे जळगाव येथील रेल्वे मालधक्क्यापर्यंत आलेला रासायनिक खतांचा रेक परत पाठविण्याचा प्रकार जिल्ह्यात घडला आहे. हा रेक जळगावएेवजी मलकापूर येथे पाठविण्यात आला असल्याची माहिती आहे.

हा रेक सुमारे २४०० टनांचा होता. त्यात १०.२६.२६ हे खत दाखल झाले होते. परंतु जळगाव शहरात मंगळवारी (ता. ७) लॉकडाउन सुरू झाले. लॉकडाउनमध्ये खतांचा रेक रिकामा करता येणार नाही. रेक रिकामा करण्यासाठी हमाल, कामगारांची गर्दी रेल्वे मालधक्क्यावर होईल. सुरक्षित अंतराचा फज्जा उडेल. कामगारांना बोलावले तर लॉकडाउन यशस्वी होणार नाही. वाहनांची गर्दी होईल, अशी कारणे सांगून हा रेक मालधक्क्यावर रिकामा करण्यास मंजुरी देण्यात आली नाही.

रेल्वे प्रशासनाने याबाबत खत कंपनी, कृषी विभाग व जिल्हा प्रशासनाला सूचना दिली. परंतु जिल्हा प्रशासनाने नकार दिल्याने हा रेक पुढे मलकापूर (जि. बुलडाणा) येथे पाठविण्यात आला, अशी माहिती सूत्रांनी दिली.

जिल्ह्यात मागील १० ते १५ दिवसांपासून १०.२६.२६ खताचा मोठा तुटवडा आहे. त्याचा पुरवठा विस्कळीत झाला आहे. एका कंपनीने खते पाठविली, परंतु ती लॉकडाउनमुळे जिल्ह्यास मिळू शकली नाहीत. जळगावात लॉकडाउन होते तर हा रेक पाचोरा किंवा चाळीसगाव येथे रेल्वे मालधक्क्यावर रिकामा करता आला असता. अन्यथा धुळ्यातील दोंडाईचा येथील रेल्वे मालधक्क्यावर रेक रिकामा करून खते जळगाव जिल्ह्यात पोचविता आली असती. खते परत गेल्याने जिल्ह्यात १०.२६.२६ ची टंचाई कायम राहणार आहे, अशी नाराजी खत विक्रेते, वितरक व्यक्त करीत आहेत.

पुढील सात दिवस रेक येणार नाहीत जळगावात लॉकडाउन आहे. यातच जिल्ह्यात आता पुढील सात दिवस कुठल्या कंपनीकडून खतांचा पुरवठा होणार नाही, अशीही माहिती सूत्रांनी दिली आहे. यामुळे जिल्ह्यातील खतटंचाई किमान दहा दिवस दूर होणार नाही, अशी अडचण निर्माण झाली आहे. खतांचा पुरवठा वेळेत करून घेण्यासाठी कृषी विभाग अपुरा पडत आहे. अशातच प्रशासकीय घोळ वाढत आहे. कारण कृषी क्षेत्राला लॉकडाउमधून सूट देणे गरजेचे आहे. तसे दिसतही आहे. परंतु जिल्ह्यात लॉकडाउन कारणाने खतांचा रेक रिकामा न झाल्याने कृषी क्षेत्राचे नुकसान करण्याचा प्रकार झाल्याचा मुद्दाही वितरक उपस्थित करीत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com