नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर संचलनाद्वारे कृषी कायद्यांविरोधात शक्तीप्रदर्शनावर
नगदी पिके
आडसाली उसासाठी खतमात्रेचे नियोजन
उसाच्या योग्य वाढीसाठी माती परिक्षणाच्या शिफारशीनुसारच रासायनिक खतांची मात्रा द्यावी.को ८६०३२ ही जात रासायनिक खतांच्या जादा खत मात्रेस प्रतिसाद देत असल्यामुळे प्रती हेक्टरी नत्र, स्फुरद व पालाश या रासायनिक खतांची २५ टक्के जादा मात्रा द्यावी.
उसाच्या योग्य वाढीसाठी माती परिक्षणाच्या शिफारशीनुसारच रासायनिक खतांची मात्रा द्यावी.को ८६०३२ ही जात रासायनिक खतांच्या जादा खत मात्रेस प्रतिसाद देत असल्यामुळे प्रती हेक्टरी नत्र, स्फुरद व पालाश या रासायनिक खतांची २५ टक्के जादा मात्रा द्यावी.
आडसाली उसात भुईमूग, चवळी, सोयाबीन व भाजीपाला इत्यादी आंतरपिके घेता येतात. ताग, धैंचा यासारख्या हिरवळीच्या पिकांचा आंतरपीक म्हणून समावेश करता येतो. बाळबांधणीच्यावेळी हिरवळीची पिके सरीमध्ये गाडून बाळ बांधणी करता येते. यामुळे जमिनीची सुपीकता टिकविण्यास मदत होते.
पाणी व्यवस्थापन
- ठिबक सिंचन पद्धतीमुळे ५० टक्यांपर्यंत पाण्याची बचत, उत्पादनात २० टक्के वाढ, खतामध्ये २५ टक्के बचत होते.
- माती तपासणी करून ठिबक सिंचन प्रणालीचा वापर करावा. ठिबक सिंचनाचे पाणी सरीच्या दोन्ही बाजूस पोहोचत असल्याची तपासणी करावी.
विद्राव्य खतांचा वापर
- ठिबक सिंचनातून खते दिल्यास खतांची कार्यक्षमता ९० टक्यापर्यंत वाढते.
- लागवडीपासून मोठ्या बांधणीपर्यंत दर आठवड्याच्या अंतराने समान २० हप्त्यात किंवा दर पंधरा दिवसांच्या अंतराने समान १० हप्त्यांत नत्रखताची मात्रा विभागून दिल्यास उत्पादनात वाढ होते.
- नत्रासाठी युरिया, स्फुरदयुक्त खते देण्यासाठी फॉस्फरिक आम्ल किंवा १२:६१:०० या खतांचा वापर करावा. पालाश खतांच्या वापरासाठी पांढरे पोटॅशिअम क्लोराईड वापरावे.
- पाण्यात विरघळणाऱ्या मिश्र खतात १९:१९:१९,२०:२०:२०, २०:०९:२०, १५:०४:१५ आणि द्रवरूप खतात ४:२:८, ६:३:६, ६:४:१०, १२:२:६, ९:१:६ अशा विविध ग्रेडची खते उपलब्ध आहेत. ही खते शिफारशीप्रमाणे वापरावीत.
रोप लागवड
- ट्रेमध्ये कोकोपीट व बेणेमळयातील शुद्ध, निरोगी बेणे वापरून तयार केलेली ३० ते ४५ दिवसांची रोपे लागवडीसाठी वापरावीत. रोपे तयार करताना कांड्यांसाठी बुरशीनाशक, कीटकनाशक व जिवाणू संवर्धकाची बीज प्रक्रिया करावी.
- रोपे वापरून लागवड केल्यास, एकरी उसाची संख्या ४० ते ५० हजार मिळू शकते आणि उसाचे वजन २ ते ३ किलोपर्यंत मिळते. एकरी ९० टनांपेक्षा जास्त उत्पादन मिळविण्यासाठी रोप लागवड तंत्राचा वापर करावा.
- रोप लागवड पद्धतीत नेहमीच्या लागवडीस ३० ते ४५ दिवसांपर्यंत जोपासण्यासाठी लागणारे पाणी, तण नियंत्रण, खते, देखरेख यामध्ये बचत होते. पावसाने ओढ दिल्यामुळे वेळेवर लागवड करता येत नाही, अशा वेळी पाऊस एक ते दीड महिना लांबला तरी ऊस रोपांची लागवड करून हंगाम साधता येतो.
रासायनिक खतांचा वापर
हेक्टरी ४०० किलो नत्र, १७० किलो स्फुरद आणि १७० किलो पालाशची वापरण्याची शिफारस केली आहे. युरिया खत देताना निंबोळी पेंडीच्या भुकटी बरोबर ६ः१ या प्रमाणात मिसळून द्यावीत.
खत देण्याचे वेळापत्रक (किलो प्रति हेक्टर)
खतमात्रा देण्याची वेळ | हेक्टरी अन्नद्रव्य | हेक्टरी खत | ||||
नत्र | स्फुरद | पालाश | युरिया | सिं.सु.फॉ | म्यु.ऑ.पो | |
लागवडीच्या वेळी | ४० | ८५ | ८५ | ८७ | ५३१ | १४२ |
लागवडीनंतर ६ ते ८ आठवड्यांनी | १६० | -- | -- | ३४७ | -- | -- |
लागवडीनंतर १२ ते १६ आठवड्यांनी | ४० | -- | -- | ८७ | -- | -- |
मोठ्या बांधणीच्या वेळी | १६० | ८५ | ८५ | ३४७ | ५३१ | १४२ |
एकूण | ४०० | १७० | १७० | ८६८ | १०६२ | २८२ |
टीप
को ८६०३२ ही जात रासायनिक खतांच्या जादा खत मात्रेस प्रतिसाद देत असल्यामुळे प्रती हेक्टरी नत्र, स्फुरद व पालाश या रासायनिक खतांची २५ टक्के जादा मात्रा द्यावी.
लागवडीसाठी अंतर आणि एकरी लागणारी ऊस रोपे / टिपरी
दोन सरीतील अंतर | एकरी लागणारी रोपे | एकरी लागणारी टिपरी | ||
रोपांमध्ये दोन फूट अंतर | रोपांमध्ये १.५ फूट अंतर | एक फुटावर एक डोळा टिपरी | अर्धा फुटावर दोन डोळा टिपरी | |
१२० सेंमी. (४ फूट) | ५,५५५ | ७,४०७ | ११,१११ | ११,१११ |
१३५ सेंमी.(४.५ फूट) | ४,९३८ | ६,५८४ | ९,८७६ | ९,८७६ |
१५० सेंमी. (५ फूट) | ४,४४४ | ५,९२५ | ८,८८८ | ८,८८८ |
१८० सेंमी. (६ फूट) | ३,७०४ | ४,९३८ | ७,४०७ | ७,४०७ |
जोड ओळ २.५ फूट |
५,९२६ | ७,९०१ | ११,८५१ | ११,८५१ |
संपर्क- डॉ.भरत रासकर , ८७८८१०१३६७
(ऊस विशेषज्ञ, मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव, ता.फलटण, जि. सातारा)