‘इफ्को’कडून खतांच्या किमतीत वाढ

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या मालाच्या किमती वाढल्यामुळे ‘इफ्को’ने खताच्या किमतीत मोठी वाढ केली आहे. डीएपीच्या किमतीत ५८ टक्क्यांनी वाढ करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
Fertilizer price hike from IFFCO
Fertilizer price hike from IFFCO

पुणे : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या मालाच्या किमती वाढल्यामुळे ‘इफ्को’ने खताच्या किमतीत मोठी वाढ केली आहे. डीएपीच्या किमतीत ५८ टक्क्यांनी वाढ करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

राज्यातील खतांच्या बाजारपेठांमध्ये गेल्या महिन्यापासून  दरवाढीची जोरदार चर्चा सुरू होती. ही चर्चा विचारात घेत ‘इफ्को’ने सर्व ग्रेडच्या किमती तूर्त स्थिर ठेवण्याचा निर्णय स्वतःहून जाहीर केला होता. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला होता. आता मात्र दरवाढ करण्यात ‘इफ्को’नेच आघाडी घेतल्याचे चित्र आहे.

डीएपीचा वापर राज्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी करतात. रब्बीमध्ये राज्यात अडीच लाख टन तर खरिपात सहा लाख टनापर्यंत डीएपी विकत घेतले जाते. कृषी विभागाच्या म्हणण्यानुसार, आतापर्यंत फक्त इफ्कोने दरवाढ केली असून, इतर कंपन्यांची माहिती पुढील काही दिवसांत हाती येण्याची शक्यता आहे.

इंडियन फार्मर्स फर्टिलायझर्स को-ऑपरेटिव्ह लिमिटेड अर्थात इफ्को ही शेतकरी संस्थांमार्फत चालवली जाणारी मोठी खत उत्पादक कंपनी आहे.  या कंपनीने डीएपीच्या ५० किलोच्या गोणीमागे तब्बल ७०० रुपयांची वाढ केली आहे. यामुळे आधी १२०० रुपयांना मिळणारी गोणी आता १९०० रुपयांना विकली जात आहे. परिणामी, आता इतर कंपन्या देखील किमतीत वाढ करतील, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

देशातील बहुतेक खत कंपन्यांकडून सध्या खतांचा उत्पादन खर्च आणि विक्री किमतीचा आढावा घेण्याचे काम सुरू आहे. उत्पादन खर्च जास्त असताना काही ग्रेडसाठी मिळणारे अनुदान अपुरे असल्याचे कंपन्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे तोट्यात खत विकण्याची वेळ येणार नाही यासाठी खताच्या कमाल किरकोळ किमतीत (एमआरपी) वाढविणे हाच पर्याय असल्याचा दावा खत उद्योगाकडून केला जात आहे.

इफ्कोचे विपणन संचालक योगेंद्र कुमार यांनी राज्यस्तरीय कार्यालयांना पाठविलेल्या पत्रात २०:२०:०:१३ या ग्रेडची किंमत आता १३५० रुपये (प्रति ५० किलो गोणी) तर १५:१५:१५ ग्रेडचा दर १५०० रुपये राहील, असे नमूद केले आहे. खतामध्ये विक्रेत्यांना वितरण सूट (डिस्ट्रिब्युशन मार्जिन) प्रतिटन ४८० रुपये राहील. ही दरवाढ एक एप्रिलपासून लागू राहील. मात्र आधीच्या साठ्यातील खते ही पूर्वीच्याच जुन्या दराने विकली जातील, असेही या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

कच्च्या मालाच्या दरवाढीचा परिणाम कच्च्या मालाच्या किमती वाढल्याने खत कंपन्यांनी दरवाढ करणे अपेक्षित होते. मात्र आंतरराष्ट्रीय बाजारात काही अनुकूल बदल झाल्यास या किमती पुन्हा कमी देखील होऊ शकतात. यापूर्वी अशा घटना झालेल्या आहेत, असेही कृषी विभागातील सूत्रांचे म्हणणे आहे.

अशी आहे खतांमधील दरवाढ
ग्रेड आधीची किंमत नवी किंमत 
डीएपी १२०० रुपये १९०० रुपये
१०:२६:२६ ११७५ रुपये १७७५ रुपये
१२:३२:१६ ११८५ रुपये १८०० रुपये

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com