साताऱ्यात रब्बी हंगामासाठी एक लाख टन खतांची मागणी

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

सातारा  ः जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी ३५ हजार ७२८ क्विंटल बियाण्यांची, तसेच एक लाख २२ हजार ५०० टन खतांची मागणी करण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषद कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली. 

जिल्ह्यात वादळी पाऊस सुरू असल्याने रब्बी हंगामातील कामांना प्रारंभ झालेला नाही. मात्र हंगामासाठी लागणारे बियाणे, खतांची कृषी विभागाकडून मागणी करण्यात आली आहे. रब्बीत दोन लाख ६२ हजार ४८५ हेक्‍टर क्षेत्रावर पेरणी होईल, असा कृषी विभागाचा अंदाज आहे. त्या दृष्टीने बियाणे व खतांचे नियोजन करण्यात आले आहे.

माण, खटाव, कोरेगाव, फलटण व खंडाळा या दुष्काळग्रस्त तालुक्‍यांचा रब्बी हा प्रमुख हंगाम असल्याने या तालुक्‍यांत सर्वाधिक पेरणी होणार आहे. पिकांमध्ये रब्बी ज्वारीची सर्वाधिक एक लाख ६७ हजार हेक्‍टर क्षेत्रावर पेरणी होण्याचा अंदाज असल्याने ४१७५ क्विंटल बियाण्यांची मागणी करण्यात आली होती. गहू पिकाची ४३ हजार ६०० हेक्टरवर पेरणी होण्याचा अंदाज असून त्यासाठी २१ हजार ८०० क्विंटल बियाण्यांची मागणी करण्यात आली आहे. हरभऱ्याची ३४ हजार ३०० हेक्टरवर पेरणी होण्याचा अंदाज असून ६४३१ क्विंटल बियाण्यांची मागणी करण्यात आली आहे. 

कृषी विभागाकडून रब्बी हंगामासाठी एक लाख २२ हजार ५०० टन रासायनिक खतांची मागणी करण्यात आली आहे. यामध्ये युरिया, डीएपी, एमओपी, एसएसपी यांचा समावेश आहे. अनेक ठिकाणी बियाणे उपलब्ध झाले आहे, मात्र पावसामुळे शेतकऱ्यांचा बियाणे, खते खरेदी करण्याकडे कल कमी दिसून येत आहे.

पावसावर हंगामाचे भविष्य जिल्ह्यात रब्बी हंगामातील पेरणी कालावधी सुरू आहे. मात्र वादळी पाऊस सुरू असल्यामुळे शेतातील बहुतांशी कामे ठप्प झाली आहेत. खरिपातील पिके अजूनही शेतात उभी असल्याने रब्बी हंगामातील पेरण्या पुढे जाणार आहेत. पावसाचा कालावधी लांबल्याने खरिपासह रब्बी हंगामास फटका बसला आहे. रब्बी ज्वारी पेरणीचा कालवधी पुढे जात असल्याने ज्वारीच्या क्षेत्रावर परिणाम होणार आहे. यामुळे अजून पाऊस किती काळ राहणार यावर हंगामाचे भविष्य अवलंबून आहे. 

प्रमुख खते व मागणी (टन) 
खते मागणी 
युरिया  ४५,०००
डीएपी  १२,७००
एमओपी ११,०००
एनपीके ४३,२००
एसएसपी १०,०००
इतर  ६०००

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com