नीरा, देवघरच्या पाण्यासाठी माळशिरसमध्ये मोर्चा

नीरा, देवघरच्या पाण्यासाठी माळशिरसमध्ये मोर्चा
नीरा, देवघरच्या पाण्यासाठी माळशिरसमध्ये मोर्चा

सोलापूर : नीरा देवघरच्या प्रकल्पातून वगळलेल्या वंचित गावांना पाणी मिळावे, या प्रमुख मागणीसाठी गुरुवारी (ता. ११) विविध पक्ष, शेतकऱ्यांच्या वतीने माळशिरस तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात भारतीय जनता पक्ष, शिवसेना, एमआयएम, स्वाभिमानी शेतकरी संघटना, बहुजन वंचित आघाडी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.

मोर्चाची सुरवात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून झाली. शिवराज पुकळे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाचे नियोजन केले होते. पांडुरंग वाघमोडे, बाळासाहेब सरगर, पंचायत समिती सदस्य अजय सकट, गणेश इंगळे, अजित बोरकर, सुरेश टेळे, अप्पा कर्चे, रमेश पाटील, किरण साठे, वाघमोडे यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते. तहसीलदार अभिजित सावर्डे यांना मोर्चाचे निवेदन देण्यात आले.

नीरा देवघर धरणाचे पाणी पाइपलाइनद्वारे कॅनॉल निर्माण करून शेतीला पुरवण्यासाठी गिरवी, पिंपरी, कचरेवस्ती, लोणंद, कण्हेर, इस्लामपूर, रेडे, मांडकी, गोरडवाडी (भांबुर्डी), धर्मपुरी, कारूंडे, मोरोची, नातेपुते, मांडवे, माळशिरस, मोटेवाडी (मा.) दहिगाव या गावांचा समावेश केला आहे. परंतु या गावांजवळील कायम दुष्काळी असलेली गावे या प्रकल्पातून वगळलेली आहेत. त्यांना पाण्याची गरज आहे. बचेरी, शिंगोर्णी, काळमवाडी, पिलीव, पठाणवस्ती, सुळेवाडी, गारवाड, मगरवाडी, भांब, फडतरी, लोंढे-मोहितेवाडी, जळभावी, कोथळे, तरंगफळ या गावांचा त्यात समावेश आहे. त्यांना या प्रकल्पातून राजकीय द्वेषापोटी वगळले आहे, असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.  वगळलेल्या गावांचा या प्रकल्पात समावेश करावा आणि योग्य तो न्याय द्यावा, असेही या मोर्चावेळी सहभागी नेत्यांनी अधिकाऱ्यांकडे विनंती केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com