कांदा उत्पादक पट्ट्यात संताप

शेतकऱ्यांना चार पैसे मिळायला लागल्यावर त्यांना कांदा कमी दराने विका, असं सांगणारे हे कोण? यांना कुणी अधिकार दिला? जेव्हा कांदा ५० पैसे किलोने विकला जात होता तेव्हा ही समिती येवून व्यापाऱ्यांना १० रुपयाच्या खाली कांदा खरेदी करु नका, असे का नाही सांगत. सरकारचे हे वागणे चुकीचे असून शेतकरी संघटना याविरोधात आवाज उठवेल. - राजू शेट्टी, नेते, स्वाभिमानी शेतकरी संघटना
कांदा
कांदा

नाशिक : राज्यातील शेतकऱ्यांकडे केवळ २० ते ४० टक्के कांदा शिल्लक असून, बाजारात आवक मंदावल्याने गेल्या पंधरा दिवसांपासून कांद्याच्या दरात सुधारणा झाल्याने शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला होता. मात्र द नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारने हस्तक्षेप सुरू केला आहे. त्यामुळे नाशिक, पुणे, नगर, सोलापूर, खानदेश आणि मराठवाड्यातील कांदा उत्पादक पट्ट्यात अस्वस्थाता असून शेतकरी संतप्त झाले आहेत. ‘‘गेल्या वर्षी आम्हाला कांदा ५० पैसे किलोने विकावा लागला, तेव्हा हे सरकार कुठं होतं,’’ असा प्रश्‍न कांदा उत्पादक विचारत आहेत.  

चालू महिन्यात कांद्याचे दर सुधारल्याने केंद्राच्या पातळीवर हालचाली गतिमान झाल्या. त्यानुसार कांद्याची दरवाढ, आवक व बाजारातील स्थिती जाणून घेण्यासाठी केंद्रीय शिष्टमंडळाने नाशिक जिल्ह्यात चालू महिन्यात दोनदा भेटी घेऊन दर नियंत्रित करण्याबाबत पाऊले उचलली. त्यामुळे सरकारच्या निर्णयावर शेतकरी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. 

शुक्रवारी (ता.२७) लासलगाव बाजार समितीत पुन्हा येऊन येथील प्रमुख व्यापारी व काही प्रातिनिधिक शेतकऱ्यांशी चर्चा केली. व्यापाऱ्यांनी माल लवकर बाजारात पाठवावा, तो साठून ठेवू नये तसेच शेतकऱ्यांनी उपलब्ध कांदा लवकर विकून टाकावा, अशी भूमिका ग्राहक सेवा मंत्रालयाच्या शिष्टमंडळाची होती. यावेळी लासलगाव बाजार समितीच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत कांद्याचे बाजारभाव कमी करण्याबाबत आलेले शिष्टमंडळ आग्रही असल्याचे दिसून आले. मात्र या भेटीनंतर शेतकरी संतप्त झाले. अत्यल्प प्रमाणावर कांदा चाळीमध्ये शिल्लक असताना सरकारचा दर पडण्याचा डाव असल्याचा आरोप कांदा उत्पादकांनी केला.  

प्रतिक्रिया शेतकऱ्यांना बोलावून त्यांना कांदा विक्रीसाठी केली जाणारी सक्ती आणि व्यापाऱ्यांवर दराबाबत वापरले जाणारे दबावतंत्र म्हणजे, हे सरकार मोगलाईपेक्षाही वाईट सरकार आहे. जेव्हा कांदा फेकून द्यायची वेळ येते, तेव्हा सरकारच्या समित्या कुठे असतात? का नाही खरेदी केंद्रे सुरू करत? नरेंद्र मोदी सरकार शेतकरी विरोधी असल्याचे यामधून स्पष्ट होत आहे. सरकारचा धिक्‍कार करण्यासाठी एकाही शेतकऱ्याने येणाऱ्या विधानसभा निवणडणुकीत भाजप आणि शिवसेनेच्या उमेदवाराला मतदान करू नये. असे आवाहन मी शेतकऱ्यांना करत आहे. - रघुनाथदादा पाटील, नेते, शेतकरी संघटना सरकारने कांदा दर कमी करण्याचा हट्ट चालवला आहे. एकहाती सत्तेमुळे सरकार अती करण्याचा प्रयत्न करत आहे. कांदा बाजारभाव पाडण्याचा हस्तक्षेप सरकारने वेळीच थांबवावा. सध्या शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे. जर हा निर्णय मागे घेतला नाही, तर आम्ही प्रत्येक तालुक्याच्या तहसील कार्यालयावर कांदा उत्पादकांना घेऊन निवेदने देणार आहोत. नाहीतर कांदा उत्पादकांसाठी संघटना आंदोलन करण्याच्या तयारीत आहे.  - भारत दिघोळे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना

कांद्याचे वाढणाऱ्या दरवाढीसाठी व्यापारी जबाबदार नाहीत. सध्या शेतकऱ्यांकडे उन्हाळ कांदा थोड्या प्रमाणावर शिल्लक आहे. तर दुसरीकडे दक्षिण भारतातून होणारी नवीन कांद्याची अवाक मोठ्या प्रमाणावर मंदावली आहे. त्यामुळे या प्रकरणात मागणीप्रमाणे कांदा पुरवठा सुरू आहे. व्यापारी कुठलीही साठेबाजी करत नाही.  - सोहनलाल भंडारी, अध्यक्ष, नाशिक जिल्हा कांदा व्यापारी संघटना शेतकऱ्यांनी लवकर माल विकावा, हे शेतकऱ्यांना सांगणारे शिष्टमंडळ कोण? माल विकायचा की नाही, हे आम्ही ठरवू. आम्ही अडचणीत असताना सरकार कुठे जाते? कधीतरी कांदा उत्पादकाला दोन पैसे मिळत असताना सरकारच्या पोटात दुखत आहे. केंद्र सरकारने हे दलाल पाठवले होते. त्यामुळे हे सर्व निर्णय कांदा उत्पादकांना संपविणारे आहेत.  - गोविंद पगार, जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना कांद्याला गेल्या ३ वर्षांपासून मातीमोल भाव होता. ५० पैसे किलो दर असताना कुणी आले नाही. अनेक कांदा उत्पादकांनी चाळीत आत्महत्या केल्या. कांद्याचे भाव पडल्याचे या चिठ्ठीत लिहिले असताना कुणीही सरकारी प्रतिनिधी त्यांचे अश्रू पुसायला आले नाहीत. मात्र दोन पैसे मिळत असताना केंद्राने पथक पाठवून भाव पाडण्याचा कार्यक्रम सुरू केला आहे. त्यामुळे सरकार व केंद्राच्या पथकाचा धिक्कार करतो. सरकारने हे थांबवले नाही तर पूर्वसूचना न देता आंदोलन छेडण्यात येईल. - हंसराज वडघुले, प्रदेशाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना युवक आघाडी  मिळणारा दर जरी जास्त असला, तरी एकरी मिळणाऱ्या उत्पादनाच्या तुलनेत तो सध्या कमीच मिळत आहे. कांदा मोठ्या प्रमाणावर खराब झाल्यामुळे परतावा चांगला भेटत नाही. त्यामुळे भाववाढीचा विषय फुगवून सांगण्यात येत आहे. त्यामुळे सरकारने भाव पाडण्याचा प्रयत्न करू नये. - बाबासाहेब पवार, कांदा उत्पादक, कोळगाव, ता. येवला ----------------------- केवळ २० टक्के माल शिल्लक असताना सरकार शहरातील लोकांचा वापर करत आहे. आमच्या कष्टाला कोणीही न्याय देत नाही. त्यामुळे हे भाव आमच्यावर उपकार नसून आम्हाला दोन पैसे मिळू द्यावेत.  - दादासाहेब पाटील, कांदा उत्पादक, पाळे, ता. कळवण

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com