फडणवीस सरकारच्या पन्नास कोटी वृक्षलागवडीची चौकशी होणार

Fifty crore tree logging inquiries will be conducted
Fifty crore tree logging inquiries will be conducted

मुंबई ः फडणवीस सरकारच्या काळातील ५० कोटी वृक्षलागवडीची चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ठाकरे सरकारमधील काही मंत्र्यांनी शंका उपस्थित केल्याने वनमंत्री संजय राठोड यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. अभिनेते आणि वृक्षप्रेमी सयाजी शिंदे यांनी वर्षभरापूर्वी वृक्षलागवडीच्या चौकशीची पहिल्यांदा मागणी केली होती, तेव्हापासूनच या अभियानावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 

फडणवीस सरकारने तीन वर्षांपूर्वी वनेतर क्षेत्रातही वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घेतला. फडणवीस सरकारच्या काळात ५० कोटी वृक्ष लावण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता. यासाठी सुरू केलेल्या अभियानावर दरवर्षी सुमारे एक हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले. परंतु या अभियानातून अपेक्षित काम झाले नसल्याची शंका ठाकरे सरकारमधील काही मंत्र्यांनी व्यक्त केली. तसेच, या संदर्भात त्यांनी वनमंत्र्यांना लेखी पत्रेही दिली आहेत. 

या संदर्भात वनमंत्री संजय राठोड म्हणाले, की मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांनी आपल्याला चौकशीची मागणी करणारी पत्रे दिली आहेत, त्यामुळे हा निर्णय घेतला आहे. प्रधान सचिवांना चौकशीचे आदेश दिले असून याच आठवड्यात प्रधान सचिव नागपूरला येऊन यासाठी बैठकही घेणार आहेत. कोणी किती वृक्ष लावले, त्यापैकी किती वृक्ष जगले, याची चौकशी होणे आवश्यक आहे. त्यासाठी सॅटेलाइट इमेजेसच्या माध्यमातून नेमक्या वृक्षारोपणाची माहिती काढावी लागणार आहे. या चौकशीचा एप्रिलपर्यंत अहवाल येईल.

महाआघाडीही करणार ५० कोटी वृक्षलागवड दरम्यान, महाआघाडी सरकारनेही राज्यात ५० कोटी वृक्षलागवड करण्याचा संकल्प केला असून त्याला माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे नाव दिले जाणार आहे. महाविकास आघाडी सरकार राज्यात ‘वसंतराव नाईक हरित महाराष्ट्र योजने’अंतर्गत ५० कोटी वृक्षारोपण करणार आहे. दरवर्षी १० कोटी वृक्षांचे रोपण केले जाईल. १ जुलै रोजी वसंतराव नाईक यांच्या जन्मदिनीच वृक्षारोपणाच्या अभियानाला सुरुवात होईल, असे वनमंत्री राठोड यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com