‘जलयुक्त’ गैरव्यवहाराची फाइल पुन्हा उघडणार

जलयुक्त
जलयुक्त

पुणे : जलयुक्त शिवार योजनेत बीड जिल्ह्यात कोट्यवधीचा निधी हडप करणाऱ्या टोळीचा तपास करण्यासाठी दडपडलेल्या फाइल पुन्हा उघडल्या जाणार आहेत. कृषी आयुक्त सच्चिंद्र प्रताप सिंह यांनी चौकशीला अनुकूलता दर्शविली आहे. कृषी खात्यातील सोनेरी टोळीने कंत्राटदारांच्या मदतीतून बीड जिल्ह्यात जलयुक्त शिवाराच्या नावाखाली ३५ कोटी रुपये खर्च झाल्याचे दाखविले. यातील किती पैसा हडप केला हे अद्यापही बाहेर आलेले नाही. कृषी आयुक्तालयाने या घोटाळ्यात एकूण २४ अधिकारी व कर्मचारी अडकल्याचे मान्य करून प्रशासकीय कारवाईदेखील केली आहे. दुसऱ्या बाजूला मोकाट राहिलेल्या १३८ ठेकेदारांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.  काँग्रेसचे नेते वसंत मुंडे यांनी या प्रकरणाचा पाठपुरावा केल्यामुळे कृषी खात्यातील भ्रष्ट टोळीची चांगलीच कोंडी झाली आहे. बीड जिल्ह्यातील सर्व कामे तपासण्यात आलेली नाहीत. त्यामुळे दडपून ठेवलेल्या फाइल्स पुन्हा काढाव्यात, असा आग्रह श्री. मुंडे यांनी धरला होता. त्यानुसार आता पुन्हा चौकशीला कृषी आयुक्तांनी अनुकूलता दाखविली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.  कृषी खात्यातील टोळीने प्रशासकीय मंजुरी न घेता तसेच अनुदान मंजूर नसतानाही पावणेसात कोटींची कामे केली आहेत. या कामांची १०० टक्के तपासणी झाल्याशिवाय पेमेंट करू नका, असे आदेश कृषी आयुक्तालयाने दिलेले होते. मात्र, आदेश डावलून बनावट व्हाउचर्सच्या साह्याने पेमेंट केले गेले आहे. कृषी संचालकांनी काढलेल्या एका पत्रानुसार (क्रमांक २०८७, मृसं २०१८) संशयास्पद बिले अदा न करण्याची सूचना केलेली असतानाही कोट्यवधी रुपये काढण्यात आलेले आहेत. या बिलांचीदेखील पडताळणी केली जाणार आहे.  जलयुक्त शिवारात पहिल्या टप्प्यात ८८३ कामे केल्याचे दाखविण्यात आलेले आहे. त्यातील ३०७ कामांची तपासणी झाली असता, चार कोटींचा घोटाळा बाहेर निघाला. मात्र, उर्वरित कामे न तपासल्यामुळे भ्रष्ट टोळीने सुटकेचा निःश्वास टाकला होता. आयुक्तांनी आता या टोळीला पुन्हा घाम फोडला आहे.  ‘‘जलयुक्त शिवार घोटाळ्यात राजकीय नेते, बडे कृषी अधिकारी व ठेकेदारांचा समावेश असल्यामुळे चौकशी संथ गतीने सुरू आहे. कृषी अधिकाऱ्यांनी पैसे लाटण्यासाठी २३३ कामे प्रशासकीय मान्यता न घेताच ६ कोटी ८५ लाखांची बिले मजूर केली आहेत,’’ असेही सूत्रांनी स्पष्ट केले. जलसंधारण व पाणलोटाच्या नावाखाली कृषी खात्यात सर्वात जास्त पैसा हडप केला जातो. बीड घोटाळ्यात माती नालाबांध कामांसाठी मूळ कामांचे तुकडे पाडून २-३ लाखांचे इस्टिमेट तयार करण्यात आले आहे, असे चौकशीत निष्पन्न झाले आहे. ‘पाणलोटाची कामे म्हणजे आमचे एटीएम’ "पाणलोट, जलसंधारण, मृदसंधारणाची कामे ही आमच्यासाठी एटीएमसारखी आहेत. आम्ही हवे तेव्हा कितीही पैसे या एटीएममधून काढू शकतो,’’ अशी चर्चा अधिकाऱ्यांमध्ये आहे. त्यासाठी मृदसंधारण, जलसंधारणाची कामे आपल्या अखत्यारित ठेवण्याचा कायम आटापिटा कृषी अधिकाऱ्यांचा चालतो. ‘‘जमिनीची धूप थांबवणे किंवा भूगर्भात पाणी नसल्याचे सांगत मोठ्या प्रमाणात निधी आणला जातो. काही मोजकी कामे चकाचक करून प्रत्यक्षात ६०-७० टक्के निधीत टक्केवारीने पैसे लाटण्याची पद्धत केल्या काही वर्षांपासून सुरू आहे. त्यासाठी गावापासून मंत्रालयापर्यंत मोठी साखळी आहे,’’ अशी धक्कादायक माहिती जलसंधारण विभागाच्या सूत्रांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com