कृषी खात्यातील २९ घोटाळेबाजांवर अखेर गुन्हे दाखल

मातीतली वाळवी
मातीतली वाळवी

पुणे : मृद्‌ व जलसंधारण कामात खिरापत लाटणाऱ्या कृषी खात्यातील २९ अधिकारी व कर्मचाऱ्यांवर अखेर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कृषी आयुक्तपदाची सूत्रे सुहास दिवसे यांनी हाती घेतल्यानंतरची ही पहिलीच मोठी कारवाई आहे. यामुळे मृद्‌संधारणातील अनुदानाची ‘गोड माती’ खाणाऱ्या ‘सोनेरी टोळी’त खळबळ माजली आहे.   मृद व जलसंधारण कामांसाठी राज्य व केंद्र शासनाकडून येणाऱ्या कोटयवधी रुपयांच्या अनुदानावर राज्याच्या विविध भागांमध्ये डल्ला मारण्यात आला आहे. बीड जिल्ह्यात जलयुक्त शिवार योजनेत ३५ कोटी रुपयांच्या कामांमध्ये अनियमतता बाहेर आल्यानंतर तत्कालीन आयुक्त सच्चिंद्र प्रताप सिंह यांनी १३५ ठेकेदारांवर गुन्हे दाखल केले होते. त्यानंतर बारामती भागात लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने गुन्हे दाखल केले.  राज्याच्या कृषी खात्यातील घोटाळ्यांची खाण असलेल्या मृदसंधारण विभागाचे माजी संचालक सुरेश अंबुलगेकर यांच्याकडे कोट्यवधीची बेहिशेबी मालमत्ता काही महिन्यांपूर्वी ‘एसीबी’ला सापडली होती. याच कालावधीत सोलापूर मृदसंधारण घोटाळ्याबाबत गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले गेले होते. मात्र, कृषी अधिकारी चालढकल करीत होते. “राज्य शासनाच्या आदेशाचे पालन करण्यास उशीर झाला आहे. मात्र, आता २९ जणांविरुद्ध आम्ही पुराव्यांसह फौजदारी गुन्हा दाखल केला आहे. पुढील कारवाई मात्र पोलिस खात्याकडून केली जाईल,” अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.  कृषिमंत्री चंद्रकांत पाटील तसेच कृषी सचिव एकनाथ डवले यांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश १५ ऑक्टोबर २०१८ रोजी दिले. मात्र, अधिकाऱ्यांनी आदेश दाबून ठेवले होते. ‘ॲग्रोवन’ने एका स्वतंत्र मालिकेद्वारे या घोटाळ्याचा पाठपुरावादेखील केला. कृषी आयुक्त सुहास दिवसे यांनी ठाम भूमिका घेत ‘शासनाच्या आदेशाचे पालन करा,’ अशी तंबी दिल्यामुळे गुन्हा दाखल करावा लागला.  निवृत्त कृषी उपसंचालक आबासाहेब साबळे यांनी पाठपुरावा केल्याने राज्याच्या लोकायुक्तांनी या प्रकरणाची स्वाधिकार चौकशी (स्यू-मोटो इनक्वायरी) सुरू केली होती. त्यामुळे दडपलेला घोटाळा बाहेर आला. “सोलापूर जिल्ह्यात संशयास्पदपणे कामे २५ कोटीच्या पुढे आहेत. साबळे समिती व देसाई समितीलादेखील या गैरव्यवहाराची उकल करता आलेली नाही. सध्या दाखल झालेले गुन्हे केवळ २०१० ते ११ या कालावधीतील आहेत. त्यातही गैरव्यवहाराची रक्कम अवघी २४ लाख रुपये इतकीच आहे. मात्र, पोलिस याबाबत कसा तपास करतात यावर घोटाळ्याची व्याप्ती निश्चित होईल,” अशी माहिती कृषी आयुक्तालयाच्या सूत्रांनी दिली.  गुन्हा दाखल झालेल्या २९ कर्मचाऱ्यांची नावे  पोलिसांनी भारतीय दंड विधानाच्या ४०३, ४०९ आणि ३४ कलमान्वये गुन्हे दाखल केलेल्या कृषी कर्मचाऱ्यांची नावे अशी ः राजाराम शिवाजी ढेपे, अशोक नामदेव कांबळे, दिलीप महादेव शेडगे, महादेव नामदेव फराटे, मधुकर रंगराव चव्हाण, बाबासाहेब केंचप्पा चौगुले, बाबासाहेब सोमान्ना पाटील, प्रसेनजित लिंबाजी जानराव, वालचंद हरिसिंग भोई, रवींद्र मनोहर सरसंबी, काशिनाथ यल्लप्पा भजानावळे, किरण गुलाब मांगडे, शिवाप्पा चंदाप्पा देगील, लक्ष्मण बसप्पा डुम, भीमू ज्ञानू माळी, रवींद्र दिगंबर आंधळकर, रामचंद्र बाबूराव एकतपुरे, प्रशांत पांडुरंग कोळी, राजाराम भगवान मदने, दत्तू रघुनाथ जाधव, अंकुश कोंडिबा वाघमारे, गौतम भगवान बनसोडे, दत्तात्रेय भीमराव जाधव, हिंदूराव तुकाराम पवार, तानाजी निवृत्ती लवटे, अभिजित चिंतामणी धेंडे, प्रमोद शंकरराव चव्हाण, गजानन निवृत्ती ताटे, सुरेश चंद्रकांत गरूड.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com