यवतमाळ जिल्ह्यात खत, बियाण्यांचा साठा दाखल

 यवतमाळ जिल्ह्यात खत, बियाण्यांचा साठा दाखल
यवतमाळ जिल्ह्यात खत, बियाण्यांचा साठा दाखल

यवतमाळ : जिल्ह्यात खरिपाची लगबग सुरू झालेली आहे. कृषी विभागाने निविष्ठा जमा करण्यास सुरवात केली असून, जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आतापर्यंत तब्बल एक लाख ३२ हजार २४७ मेट्रिक टन खतांची आवक झालेली आहे. मुबलक बियाण्यांचे नियोजन कृषी विभागाने केले आहे.  दुष्काळी परिस्थितीनंतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नजरा आता आभाळाकडे लागलेल्या आहेत. शेतकऱ्यांनी पेरणीची जवळपास सर्वच तयारी करून ठेवली असून, पावसाचे आगमन होताच पेरणीला गती मिळणार आहे. कृषी विभागानेही शेतकऱ्यांची अडवणूक होऊ नये, म्हणून तयारी पूर्ण केली आहे. जिल्ह्यात यंदा नऊ लाख दहा हजार हेक्‍टरवर पेरणी होणार आहे. त्यात सर्वाधिक चार लाख ५८ हजार हेक्‍टरवर कापसाची लागवड केली जाणार आहे. दोन लाख ७७ हजार हेक्‍टरवर सोयाबीन, तर एक लाख ५० हजार हेक्‍टरवर तुरीची लागवड होण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे. पेरणीसाठी शेतकऱ्यांना आवश्‍यक असलेले बी-बियाणे, खतांचा साठा करणे कृषी विभागाने सुरू केलेले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख ३२ हजार २४७ मेट्रिक टन रासायनिक खत पोचलेले आहे. कृषी सेवा केंद्रांपर्यंत खतांचा साठा पोचला आहे. बियाण्यांची तशीच परिस्थिती आहे. शेतकऱ्यांना आवश्‍यक असलेले बियाणे कृषी सेवा केंद्रापर्यंत पोचले आहे. आतापर्यंत कापसाचे १८ लाख पाकिटे कृषी केंद्र व गोडाऊनपर्यंत पोचली आहेत. एकूण ९० हजार क्विंटल सोयाबीन कृषी सेवा केंद्रापर्यंत पोचले आहे. तूरही आवश्‍यक त्या तुलनेत उपलब्ध आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना बी-बियाणे व खतांसाठी भटकंती करावी लागणार नाही, असा अंदाज कृषी विभागाचा आहे. उद्दिष्टांपैकी उर्वरित खते व बियाणे लवकरच जिल्ह्यात दाखल होणार असून, यंदा बियाणे व खतांची अडचण जाणार नसल्याने कृषी विभागाचे म्हणणे आहे.

मशागती अंतिम टप्प्यात मौसमी पाऊस कधी येणार, याकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत. त्यापूर्वी शेतकऱ्यांनी शेतीची मशागती करून ठेवल्या आहेत. काही शेतकऱ्यांनी पेरणीची तयारी पूर्ण झाली असून, काहींची अंतिम टप्प्यात आहे. एक-दोन चांगला पाऊस झाल्यानंतर पेरणीला वेग येण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे.

१८ लाख पाकिटे बाजारात कापूस जिल्ह्यातील प्रमुख पीक आहे. यासाठी कृषी विभागाने कापूस पिकाची बुकिंग केलेली होती. त्यामधील १८ लाख पाकिटे जिल्ह्यात दाखल झालेली असून, कृषी सेवा केंद्रांपर्यंतदेखील ती पोचलेली आहेत. उर्वरित बियाणे लवकरच पोचणार आहेत, अशी माहिती कृषी विभागाने दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com