पुणे जिल्ह्यात मशागतीची कामे अंतिम टप्प्यात 

पुणे जिल्ह्यात मशागतीची कामे अंतिम टप्प्यात 
पुणे जिल्ह्यात मशागतीची कामे अंतिम टप्प्यात 

पुणे ः जिल्ह्यातील अनेक भागांत पूर्वमोसमीच्या सरी पडत आहे. शेतकऱ्यांनी खरिपाची तयारी सुरू केली आहे. सध्या पुणे जिल्ह्यात मशागतीची कामे अंतिम टप्प्यात आली असून, पश्चिम पट्ट्यातील तालुक्यात भात रोपवाटिकेची कामे सुरू झाली आहेत. येत्या काळात चांगला पाऊस झाल्यास वेळेवर पेरण्या होण्याची शक्यता आहे.

पुणे जिल्ह्यात खरिपाची दोन लाख ३० हजार हेक्टरवर पेरणी होण्याचा अंदाज आहे. पश्चिमेकडील भोर, वेल्हा, मावळ, मुळशी उत्तरेकडील खेड, जुन्नर, आंबेगाव या तालुक्यांत प्रामुख्याने भात पिकांची लागवड केली जाते. पूर्वेकडील शिरूर, दौंड, पुरंदर, बारामती, इंदापूर तालुक्यांत सोयाबीन, तूर, मूग, उडीद अशी पिके शेतकरी घेतात. यंदा चांगल्या पावसाची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी सुरवातीपासून खरिपाचे नियोजन करण्यास सुरवात केली आहे. त्यासाठी लागणाऱ्या निविष्ठाचा पुरवठा कृषी विभागामार्फत कृषी सेवा केंद्राना सुरू झाला आहे. शेतकऱ्यांनी जवळच्या केंद्रातून निविष्ठा नाममात्र दरात उपलब्ध होणार आहे. 

पश्चिम पट्ट्यात भात लागवडीसाठी मजुरांची टंचाई भासत असल्याने यांत्रिकीकरणाचा अवलंब करण्यावर शेतकऱ्यांचा सर्वाधिक भर राहणार आहे. त्यासाठी आत्मा व कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना यांत्रिकीकरणाद्वारे भात लागवड व त्यासाठी लागणारी रोपवाटिका यांचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. या प्रशिक्षणाचा लाभ शेतकरी घेत असून, रोपवाटिकेची कामे सुरू केली आहे. काही ठिकाणी रोपवाटिकेत भात बियाणे टाकण्याचे कामे सुरू झाली आहेत. पूर्वेकडील भागातही मशागतीची कामे सुरू आहेत. पाणी उपलब्ध असलेल्या काही ठिकाणी ऊस लागवडीची पूर्वतयारी शेतकरी करत आहेत. 

या विषयी मावळ तालुक्यातील चांदखेड येथील नितीन गायकवाड म्हणाले, की माझी एकूण साडेआठ एकर शेती आहे. सध्या एक एकर फळबाग आहे. खरिपात भाताची साडेचार एकरांवर लागवड करणार आहे. मशागतीची कामे पूर्ण झाली आहे. अजून पाऊस झालेला नाही. सध्या पावसाची वाट पाहत आहे. भाताच्या लागवडीसाठी शेत तयार आहे. त्यासाठी दहा गुंठे क्षेत्रावर रोपवाटिका तयार करण्याचे नियोजन असून, बेड तयार केले आहे. पाऊस झाल्यास बेडवर बियाणे टाकून रोपवाटिका तयार करणार आहे.

माझी एकूण साडेचार एकर शेती आहे. मशागतीची कामे पूर्ण झाली आहेत. खरिपात साडेतीन एकरांवर भात लागवडीचे नियोजन आहे. त्यासाठी रोपवाटिकेची तयारीही पूर्ण झाली आहे. पाऊस झाल्यास रोपवाटिकेत बियाणे टाकून रोपे तयार करणार आहे.   - लक्ष्मण खेडेकर, शेतकरी, वाजेघर, ता. वेल्हा

सध्या पाण्याची अडचण आहे. पाऊस वेळेवर आल्यास नियोजन करता येईल. सध्या मशागतीची कामे पूर्ण झाली आहेत. खरबुजाची चार एकरांवर लागवड करणार आहे. तर झेंडूची दोन एकरांवर लागवड करण्याचे नियोजित आहे.  - केशव होले, शेतकरी, पाटस, ता. दौड  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com