खानदेशातील ऊस गाळप अंतिम टप्प्यात

खानदेशातील ऊस गाळप अंतिम टप्प्यात
खानदेशातील ऊस गाळप अंतिम टप्प्यात

जळगाव : खानदेशातील ऊस गाळप हंगाम अंतिम टप्प्यात आहे. गाळपात नंदुरबार जिल्ह्यातील साखर कारखाने आघाडीवर आहेत. जळगाव जिल्ह्यातील कारखान्यांनी देखील गाळपाबाबत समाधानकारक कामगिरी केली असल्याची माहिती मिळाली.  

नंदुरबार जिल्ह्यातील समशेरपूर (ता. नंदुरबार) येथील आयान ॲग्रोने खानदेशात सर्वाधिक चार लाख ६३ हजार ३८० मेट्रीक टन उसाचे गाळप केले. पुरुषोत्तमनगर (ता. शहादा) येथील सातपुडा सहकारी साखर कारखान्याने तीन लाख ८१ हजार ४५० मेट्रीक टन, तर डोकारे (ता. नवापूर) येथील आदिवासी सहकारी साखर कारखान्याने सुमारे एक लाख ६१ हजार ५३३ मेट्रीक टन उसाचे गाळप केले. 

धुळे जिल्ह्यात एकही साखर कारखाना सुरू नाही. जळगाव जिल्ह्यात दोनपैकी एकच म्हणजेच न्हावी (ता. यावल) येथील मधुकर सहकारी साखर कारखाना सुरू आहे. त्याने सुमारे एक लाख ४३ हजार मेट्रीक टनांपेक्षा अधिक ऊस गाळप केला. मुक्ताईनगर येथील मुक्ताई कारखान्यासह भोरस (ता. चाळीसगाव) येथील अंबाजी शुगरने देखील ऊस गाळपाबाबत समाधानकारक कामगिरी केली. 

चहार्डी (ता. चोपडा) येथील चोपडा सहकारी साखर कारखाना सुरूच झाला नाही. यामुळे चोपडा, जळगाव तालुक्‍यांतील उसाची खरेदी कन्नड (जि. औरंगाबाद) येथील बारामती ॲग्रो व रावळगाव (ता. मालेगाव, जि. नाशिक) येथील खासगी साखर कारखान्याकडून बऱ्यापैकी झाली. चोपडा व जळगावात ऊस तोडणी जवळपास संपली आहे. खासगी कारखान्यांना उसाचा काहीसा तुटवडा जाणवला. परंतु कुठल्याही कारखान्याने आपल्या कार्यक्षेत्रातील उस तोडणी रखडू दिली नाही. शक्‍य तेवढे ऊस गाळप करण्यावर कारखान्यांनी भर दिला. सातपुडा कारखान्याचे गाळप चार लाख मेट्रीक टनांपेक्षा अधिक होईल, असा अंदाज आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com