अखेर माघार!

आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर केंद्राने शेतकरी संघटनांच्या आंदोलनापुढे नमते घेत वादग्रस्त तीन कृषी कायदे शुक्रवारी (ता.१९) अखेर रद्द केले.
Finally back off!
Finally back off!

नवी दिल्ली : आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर केंद्राने शेतकरी संघटनांच्या आंदोलनापुढे नमते घेत वादग्रस्त तीन कृषी कायदे शुक्रवारी (ता.१९) अखेर रद्द केले. देवदिवाळी, गुरू नानक जयंतीच्या पर्वाचे निमित्त साधून पंतप्रधान मोदींनी कृषी कायदे रद्द करत असल्याची घोषणा केली. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात कायदे औपचारिकरीत्या मागे घेतले जाणार असल्याचे सांगताना मोदींनी शेतकरी संघटनांना आंदोलन मागे घेण्याचेही आवाहन केले आहे.

कोणत्याही परिस्थितीत कृषी कायदे मागे घेतले जाणार नसल्याचे केंद्र सरकारतर्फे सातत्याने सांगितले जात होते. मात्र सरकारला ही माघार घ्यावी लागली आहे. पंतप्रधान मोदी यांनी शुक्रवारी सकाळी नऊ वाजता देशाला उद्देशून भाषण करताना वादग्रस्त कृषी कायदे रद्द करण्याची घोषणा करताना शेतकऱ्यांमध्ये असलेल्या नाराजीमुळे हा निर्णय घ्यावा लागत असल्याची कबुली दिली. मात्र शेतकऱ्यांना समजावण्यात आपली तपश्‍चर्या कमी पडल्याचीही पुष्टीही मोदींनी जोडली. 

आमच्या तपश्‍चर्येतमध्ये त्रुटी  ‘‘आज देशातल्या जनतेची क्षमा मागताना मनापासून आणि पवित्र अंतःकरणाने सांगू इच्छितो, की कदाचित आमच्या तपश्‍चर्येतमध्ये काही तरी त्रुटी राहिली असावी, ज्यामुळे दिव्याच्या प्रकाशासारखे सत्य शेतकरी बांधवांना आम्ही समजावू शकलो नाही. आज गुरू नानक देवजी यांचे पवित्र प्रकाश पर्व आहे. ही वेळ कोणाला दोष देण्याची नाही. आज संपूर्ण देशाला हे सांगण्यासाठी आलो आहे, की आम्ही तिन्ही कृषी कायदे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या महिनाअखेरीस सुरू होणाऱ्या संसद अधिवेशनात हे तिन्ही कृषी कायदे रद्द करण्याची घटनात्मक प्रक्रिया पूर्ण केली जाईल,’’ अशी घोषणा पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात केली.  या वेळी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना गुरुपर्वाच्या निमित्ताने आंदोलन संपविण्याची आणि आपापल्या घरी परत जाण्याची, तसेच नवी सुरुवात करण्याची भावनिक सादही पंतप्रधानांनी घातली. तत्पूर्वी, शेतकरी संघटनांच्या आंदोलनाचा उल्लेख करताना मोदी म्हणाले, ‘‘शेतकऱ्यांचा एक समूह विरोध करत होता, तरीही आमच्यासाठी ते महत्त्वाचे होते. कृषितज्ज्ञांनी, शास्त्रज्ञांनी, प्रगतिशील शेतकऱ्यांनी त्यांना कृषी कायद्यांचे महत्त्व समाजवण्याचे प्रयत्न केले. आम्ही नम्रतेने आणि खुलेपणाने त्यांना समाजावत राहिलो. अनेक माध्यमांद्वारे व्यक्तिगत तसेच सामूहिक बातचित झाली. शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेण्यात कोणतीही कमतरता ठेवली नाही. कायद्यांतील ज्या तरतुदींवर आक्षेप होता, सरकार ते बदलण्यासही तयार झाले. दोन वर्षांपर्यंत कायदे स्थगित करण्याचा प्रस्ताव झाला हा विषय सर्वोच्च न्यायालयापुढेही गेला. या सर्व गोष्टी देशासमोर असल्याचे मोदींनी सांगितले.  या सोबतच, आपल्या पाच दशकांच्या राजकीय कारकिर्दीत शेतकऱ्यांच्या अडचणी अनुभवल्याचे सांगताना पंतप्रधान मोदींनी देशात ८० टक्के शेतकरी अल्पभूधारक असून, त्यांची आर्थिक तसेच सामाजिक स्थिती सुधारण्याच्या महाअभियानामध्ये तीन कृषी कायदे आणल्याची सारवासारवही केली.  पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘‘लहान शेतकऱ्यांना उत्पादनाची योग्य किंमत आणि मालविक्रीसाठी अधिक पर्याय मिळावेत, हा त्या मागचा उद्देश होता. हीच मागणी अनेक वर्षांपासून शेतकरी, कृषितज्ज्ञ, अर्थतज्ज्ञ आणि शेतकरी संघटना करत होती. यावर संसदेत चर्चा होऊन कायदे आणले. देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांनी, शेतकरी संघटनांनी याचे स्वागत केले.’’ 

पंतप्रधान मोदी म्हणाले... शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेण्यात कोणतीही कमतरता ठेवली नाही. शेतकऱ्यांमध्ये असलेल्या नाराजीमुळे हा निर्णय घ्यावा लागत आहे. शेतकऱ्यांना समजावण्यात आपली तपश्‍चर्या कमी पडली. कृषितज्ज्ञांनी, शास्त्रज्ञांनी, प्रगतिशील शेतकऱ्यांनी महत्त्व समाजवण्याचे प्रयत्न केले. शेतकऱ्यांचा एक समूह विरोध करत होता, तरीही आमच्यासाठी ते महत्त्वाचे होते

समिती स्थापन करणार नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन, पीक पद्धतीत बदल, शेतीमालाचे किमान आधारभूत मूल्य (एमएसपी) निश्‍चितीची प्रक्रिया पारदर्शक बनविणे या सारख्या मुद्द्यांवर केंद्र, राज्य सरकारच्या प्रतिनिधींचा तसेच शेतकरी, कृषी शास्त्रज्ञ, अर्थतज्ज्ञांचा समावेश असलेली समिती नेमली जाईल, असे पंतप्रधान मोदी यांनी या वेळी जाहीर केले. 

प्रतिक्रिया कृषी हितासाठी, गरिबांच्या हितासाठी आणि शेतकऱ्यांप्रती समर्पण भावनेतून चांगल्या मनाने हे कायदे आणले होते. परंतु शेतकऱ्यांच्या हिताची ही गोष्ट प्रयत्न करूनही काही शेतकऱ्यांना समजावून सांगू शकलो नाही. - नरेंद्र मोदी, पंतप्रधान

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com