दुग्धव्यवसायातून शेतीला दिला सक्षम आर्थिक आधार

आत्महत्याग्रस्त अशी ओळख असलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील सोईट (म.) येथील शेख रफीक शेख हनीफ (बाबूशेठ ) यांनी शेतीत अनेक बदल केले. ॲग्रोवनच्या वाचनातून प्रेरणा घेतली. सध्या हंगामी पिके, फळबागा व दहा संकरित गायींचा दुग्धव्यवसाय अशी एकात्मिक शेतीची रचना अंगीकारून त्यांनी किफायतशीर शेती केली आहे. त्यांच्या भागात सर्वात जास्त म्हणजे प्रति दिन ८० ते १०० लीटर दूधसंकलन करणारे शेतकरी म्हणून त्यांनी ओळख मिळवली आहे.
Free herd system for cows
Free herd system for cows

आत्महत्याग्रस्त अशी ओळख असलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील सोईट (म.) येथील शेख रफीक शेख हनीफ (बाबूशेठ ) यांनी शेतीत अनेक बदल केले. ॲग्रोवनच्या वाचनातून प्रेरणा घेतली. सध्या हंगामी पिके, फळबागा व दहा संकरित गायींचा दुग्धव्यवसाय अशी एकात्मिक शेतीची रचना अंगीकारून त्यांनी किफायतशीर शेती केली आहे. त्यांच्या भागात सर्वात जास्त म्हणजे प्रति दिन ८० ते १०० लीटर दूधसंकलन करणारे शेतकरी म्हणून त्यांनी ओळख मिळवली आहे. यवतमाळ जिल्ह्याची ओळख पूर्वी आत्महत्याग्रस्त अशी होती. कालांतराने येथील शेतकऱ्यांनी शेतीत विविध प्रयोग करण्यास सुरुवात केली. अनेक शेतकऱ्यांनी त्या माध्यमातून आपले अर्थकारण उंचावण्यास सुरुवात केली आहे. जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील बाबूशेठ ऊर्फ शेख रफीक शेख हनीफ हे त्यापैकीच एक शेतकरी म्हणावे लागतील.

बाबूशेठ यांची शेती बाबूशेठ यांची वडिलोपार्जित ५० एकर शेती आहे. त्यात हरभरा, सोयाबीन, हळद, ऊस यासारखी पिके ते घेतात. या भागात कापूस व सोयाबीन ही मुख्य पिके आहेत. बाबूशेठ यांचेही सोयाबीनचे क्षेत्र अधिक आहे. सुमारे सहा एकर हळद तर पाच एकरांवर त्यांचा ऊस आहे. सोयाबीन, हरभऱ्याचे प्रत्येकी एकरी आठ ते १० क्‍विंटलपर्यंत उत्पादन मिळते. हळदीचे एकरी २० क्‍विंटलपर्यंत (सुकवलेल्या) उत्पादन ते घेतात. हिंगोली, वसमत या त्यांच्यासाठी बाजारपेठा आहेत. शेणखत आणि गोमूत्राचा वापर हळद शेती व्यवस्थापनात केला जातो. 6700 रुपये क्‍विंटल दराने हळदीची विक्री यावर्षी करण्यात आली.

दुग्धव्यवसाय

  • बाबूशेठ यांनी हंगामी शेती, फळबाग शेती जोपासताना दुग्धव्यवसाय वाढवला आहे. त्यांच्याकडे सध्या १० होस्ल्टिन फ्रिजीयन (एचएफ) गायी आहेत. प्रति दिन ८० ते १०० लीटर पर्यंत दुधाचे संकलन आहे. वर्षभरात त्यात चढउतार होत राहतो. मात्र त्यांच्या भागात सर्वाधिक दूध संकलक म्हणून त्यांची ओळख आहे. ते ब्राम्हणगावात राहतात. तेथे गुजरातमधील कंपनीचे दूध संकलन केंद्र आहे.
  • दुधाला फॅटनुसार लीटरला २६ ते २९ रुपये दर मिळतो. दोन देशी गायी आहेत. त्यांचे थोडेच दूध उपलब्ध होते. त्याचा वापर घरी केला जातो. दुग्धव्यवसायातून महिन्याला सुमारे २५ हजार रुपयांचे उत्पन्न हाती येते. हा व्यवसाय ‘एटीएम’ सारखा म्हणजे दररोज पैसा मिळवून देणारा ठरल्याचे बाबूशेठ सांगतात.
  • चारा व खाद्याचे नियोजन गायींसाठी सुमारे तीन एकर क्षेत्र राखीव ठेवले आहे. त्यात गजराज, कडवळ आदी पिके घेण्यात येतात. पशुखाद्य व ढेप मिळून दररोज पाच किलो आहार प्रति जनावर देण्यात येतो. त्यासाठी रोजचा खर्च सुमारे १२० रुपये आहे. दुधाची गुणवत्ता वाढावी यासाठी हिरवा व सुका चारा यांचे संतुलन ठेवण्यात येते. मिनरल मिक्चर, कॅल्शिअम यांचाही वापर होतो.

    मुक्‍तगोठा पध्दत पशुवैद्यकाचा सल्ला घेऊन सांगोला (जि. सोलापूर) भागातून गायी खरेदी केल्याचे बाबूशेठ सांगतात. सुमारे पाच गुंठे त्याचे क्षेत्रफळ आहे. लोखंडी जाळीचे कुंपण उभारले आहे. याशिवाय सुमारे दोन गुंठ्यात गोठ्याची उभारणी केली आहे. गोठा उभारणीवर पाच लाख रुपयांचा खर्च आला आहे.

    शेणखताचा वापर दरवर्षी सुमारे ५० ट्रॉली शेणखत मिळते. त्याचा व गोमूत्राचा वापर घरच्या शेतीसाठीच होतो. त्यामाध्यमातून जमिनीची सुपीकता वाढीस लागल्याचा त्यांचा अनुभव आहे. गांडूळखताचे तीन बेडस आहेत. दरवर्षी सुमारे पाच टन खताची निर्मिती त्याद्वारे होते. शेतात सुमारे ५० देशी कोंबड्यांचा सांभाळ केला आहे. याच कडकनाथचा समावेश आहे. त्यांच्यापासून मिळणाऱ्या अंड्यांचा वापर घरीच केला जातो. कोंबड्या मुक्त गोठा वातावरणात सोडण्यात येतात. त्या शेणातील किडे खातात. त्यामुळे चांगले खत शेतीसाठी मिळते.

    शेतीतील उत्पन्नाची जोड

  • लिंबू हे आपले उत्पन्नाचे महत्त्वाचे पीक असल्याचे बाबूशेठ सांगतात. सध्या तीन एकरांत त्याची नव्याने लागवड करण्यात आली आहे. तर दहा गुंठ्याहून अधिक क्षेत्रात जुनी बाग आहे.
  • लिंबाला वर्षभर मागणी असते. किलोला ४० रुपये ते त्याहून अधिक दर मिळतात. वर्षाला ७० ते ८० हजार रुपयांचे उत्पन्न त्यातून मिळते. एक एकरात संत्रा लागवड आहे. एकरी दहा ते बारा टन उत्पादन दरवर्षी मिळते. यंदा उत्पादनासह दराचाही फटका संत्र्याला बसला. जुन्या मोसंबीच्या बागेतून अपेक्षित उत्पादन मिळत नसल्याने व पोपटांचा त्रास वाढीस लागला असल्याने मोसंबी न घेण्याचे ठरविले आहे.
  • दुग्धव्यवसायासाठी एकच गडी आहे. तर तीन सालगड्यांच्या माध्यमातून शेतीचे व्यवस्थापन होते. त्यांच्यासाठी शेतात राहण्याची सुविधा तयार करण्यात आली आहे. पाच विहिरी आहेत. त्या माध्यमातून पाण्याची व्यवस्था केली जाते. याव्दारे जनावरांचाही पाणीप्रश्‍न सुटला आहे. एकात्मिक शेतीत दुग्धव्यवसायातून अधिक उत्पन्न मिळत असल्याने उत्पन्नाचा तो मुख्य आधार ठरल्याचे बाबूशेठ सांगतात.
  • ॲग्रोवनमुळे आम्ही प्रगती करू शकलो पूर्वी आमच्या भागातील शेतकरी पारंपरिक शेती करायचो. मात्र या भागातील कापूस किंवा अन्य पिकांत येथील शेतकऱ्यांनी प्रगती केली आहे. त्यामागे ॲग्रोवनचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरल्याचे बाबूशेठ सांगतात. माझ्याही शेतीत बदल करण्यासाठी ॲग्रोवनची प्रेरणा महत्त्वाची ठरल्याचे त्यांनी सांगितले.

    संपर्क- शेख रफीक शेख हनीफ- ९६०४६८६०६०

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com