संकटातही शोधावी संधी !

सध्या सर्व जग हे कोरोना या जागतिक महामारीच्या संकटाला तोंड देत आहे. सर्व शेतकरी बांधवदेखील या महामारीच्या संकटाला तोंड देत आहेत.
lockdown_corona_navi mumbai_Apmc_1.jpg
lockdown_corona_navi mumbai_Apmc_1.jpg

सप्रेम नमस्कार, सध्या सर्व जग हे कोरोना या जागतिक महामारीच्या संकटाला तोंड देत आहे. सर्व शेतकरी बांधवदेखील या महामारीच्या संकटाला तोंड देत आहेत. काही शेतकरी तर यामध्ये अगदी होरपळून निघाले आहेत, जसे की, द्राक्ष आणि इतर फळपिके, भाजीपाला, फुलशेती करणारे. शेतकऱ्यांना तर हातातोंडाशी आलेला घास हिसकावून घेतला गेला आहे. आणि ही सर्व भांडवली पिके असल्याकारणाने अगोदर होणारा उत्पादन खर्चदेखील त्यांनी केलेला आहे. म्हणून त्यांना सर्वात जास्त फटका बसला आहे. असे असतानाही काही शेतकरी बांधव यातून मार्ग काढून आपले पीक नवनवीन मार्गाने विकण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना कृषी विभाग आणि के. व्ही. के. यांसारख्या व इतर शेतीशी निगडित संस्थांचे अतिशय चांगले मार्गदर्शन देखील मिळत आहे. जसे शेतकरी ते ग्राहक थेट भाजीपाला व फळपिकांची विक्री काही ठिकाणी होताना दिसत आहे. काही ठिकाणी खूप भयावह परिस्थिती आहे. शेतकऱ्यांना बाजारात माल नेता येत नसल्यामुळे तो बऱ्याच अंशी फेकून द्यावा लागत आहे किंवा त्याची विल्हेवाट लावावी लागत आहे. जसे फुलशेती करणारे शेतकरी..त्यांना कुठेच मागणी नसल्यामुळे काहीच करता येत नाहीये. संकटाबरोबरच पुढील येणाऱ्या संधीचे स्वागत देखील करणे गरजेचे आहे. महामारीमुळे निर्माण होणाऱ्या संभाव्य संधी शोधून त्यानुसार येणाऱ्या हंगामाचे, पिकांचे नियोजन करणे गरजेचे आहे. येणारा काळ हा कठीण तर नक्कीच असणार आहे. कारण सारे जग आर्थिक मंदीच्या खाईत जाण्याची शक्यता आहे व त्यामुळे रोजगार संधी कमी होऊन शेतीक्षेत्रात रोजगाराचा बोजा वाढू शकतो. तसेच जीवनावश्यक गोष्टींचे फक्त भाव वाढून इतर चैनीच्या गोष्टींची मागणी कमी होऊ शकते. नवनवीन डिजिटल संधींचे प्लॅटफॉर्म उपलब्ध होऊ शकतात, जसे ई-मार्केटिंग, शेतकरी ते ग्राहक थेट बाजार सुविधा, कॅशलेस व्यवहाराची जास्त मागणी होऊ शकते. त्यामुळे बँकिंग व्यवस्थेमध्ये देखील खूप मोठे बदल होऊ शकतात. हे सर्व होत असताना मी अगोदर जसे म्हणालो, की शेती क्षेत्रावरील रोजगाराचा बोजा वाढू शकतो. त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेवर ताण येऊ शकतो. कारण ज्या ग्रामीण भागातील लोकांनी मागील काही वर्षात कामाच्या शोधात शहरे जवळ केली होती व स्थलांतर केलेले होते ते आज गावी परतलेले आहेत. ते कदाचित पुढील काही काळ तरी स्थलांतर करण्याच्या मानसिकतेत नसतील. त्यांच्या रोजगाराचा ताण हा ग्रामीण अर्थव्यवस्थेवर येऊ शकतो.   त्याचप्रमाणे जीवनावश्यक वस्तू सोडता इतर वस्तू जे उद्योग बनवतात तेथे कार्यरत असलेले ग्रामीण लोक यांचादेखील रोजगार काही प्रमाणात जाण्याची शक्यता आहे. त्यांचा देखील भार हा शेती क्षेत्रावर येऊ शकतो. त्याचप्रमाणे शेतीसाठी लागणारे सर्व प्रकारच्या निविष्ठा जसे बियाणे, खते, अवजारे ई. गोष्टींचा तुटवडा देखील निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या सर्वांच्या किमती देखील वाढू शकतात. म्हणूनच त्या अनुषंगाने सर्वांनी स्वतः च्या शेतीत लागणाऱ्या खर्चाचे नियोजन देखील करणे गरजेचे आहे. शासन स्तरावरदेखील या परिस्थितीनुसार अनेक आमूलाग्र बदल होण्याची शक्यता आहे. शासन स्तरावर अनेक प्रकारे आर्थिक तूट निर्माण होण्याची शक्यता आहे. शासनाला वित्तीय तूट, जागतिक मंदी, रोजगाराचा प्रश्न या सर्वावर मार्ग काढताना दमछाक होऊ शकते. तसेच आरोग्य सुविधा, स्थलांतरित मजुरांचे प्रश्न ई. मुळे सरकारी यंत्रणेवर ताण येऊ शकतो. ग्रामीण अर्थव्यवस्था व शहरी अर्थव्यवस्था यांचे नवनवीन व वेगवेगळे प्रश्न शासनाच्या पुढ्यात उभे ठाकणार आहेत. अशा अनेक प्रकारे शेतीक्षेत्रासोबतच इतर सर्वच क्षेत्रात आमूलाग्र बदल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शेतकरी म्हणून आपणा सर्वांना या बदलास सामोरे जाण्यासाठी कंबर कसावी लागणार आहे. महात्मा गांधी यांनी सांगितल्याप्रमाणे "खेड्याकडे चला" या उक्तीप्रमाणे ग्रामीण भागावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. भविष्यात खेड्यातील अर्थ व्यवस्था स्वयंपूर्ण कशी होऊ शकेल यासाठी शासनस्तरावर प्रयत्न होणे गरजेचे आहे. तसेच ग्रामीण भागात सध्या असलेली परिस्थिती, जसे तुटपुंज्या आरोग्य सुविधा, खराब रस्ते, पुरेशी नसलेली वीज, शेतीसाठी अपुरे पाणी, अस्मानी संकटापासून वाचण्यासाठी असलेली कमी आर्थिक तरतूद आदी बाबतीत शासन स्तरावर ठोस आणि खंबीर पावले उचलून नजीकच्या भविष्य काळात ग्रामीण अर्थव्यवस्था कशी मजबूत व स्वयंपूर्ण करता येईल ह्याचा विचार होणे गरजेचे आहे.    संपर्क : ९४२३७३०६५७

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com