खरिपासाठीचे पीककर्ज वितरण उद्दिष्ट जूनअखेर पूर्ण करा

खरिपासाठीचे पीककर्ज वितरण उद्दिष्ट जूनअखेर पूर्ण करा
खरिपासाठीचे पीककर्ज वितरण उद्दिष्ट जूनअखेर पूर्ण करा

कोल्हापूर : यंदाच्या वर्षासाठी (२०१९-२०) पीककर्ज वितरण उद्दिष्ट २४३० कोटींचे असून यामधील १२१५ कोटी रुपयांचे पीककर्ज वितरण उद्दिष्ट खरीप हंगामासाठी आहे. पेरणी हंगामासाठी शेतकऱ्याला पैशाची गरज असते. बॅंकांनी खरिपासाठी असणारे पीककर्ज उद्दिष्ट जूनअखेरपर्यंत पूर्ण करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिले.

बॅंकिंग प्रवाहामध्ये अधिकाधिक शेतकऱ्यांचा सहभाग वाढावा, यासाठी ग्रामीण भागात कार्यरत असणाऱ्या प्रत्येक बॅंक शाखेने प्रत्येक महिन्याला नवीन पाच शेतकऱ्यांना पीककर्ज स्वरूपात कर्ज उपलब्ध करून देण्याबाबत सूचना त्यांनी दिल्या. 

जिल्हास्तरीय बॅंकर्सची बैठक बुुधवारी (ता. २९) जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. त्या वेळी ते बोलत होते. कोल्हापूर जिल्ह्यासाठी सन २०१९-२० साठी असणाऱ्या १२ हजार ८६९ पतपुरवठा आराखड्याचे प्रकाशन या वेळी करण्यात आले. बॅंक ऑफ महाराष्ट्राचे झोनल मॅनेजर बी. किशोरकुमार, बॅंक ऑफ इंडियाचे डेप्युटी झोनल मॅनेजर मिथिलेश सिंग, युनियन बॅंकेच्या रिजनल मॅनेजर सुचित्रा नारकर, आयडीबीआय बॅंकेचे रिजनल मॅनेजर अमित वालिया, फेडरल बॅंकेचे रिजनल मॅनेजर अजित देशपांडे, नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक नंदू नाईक, केडीसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक माने, डीआरडीएचे प्रकल्प संचालक अजयकुमार माने, सीडबीचे सहायक महाप्रबंधक व्ही. व्ही. आरप्रसाद, जिल्हा उद्योग केंद्राचे महाप्रबंधक सतीश शेळके, जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे, अग्रणी बॅंकेचे व्यवस्थापक राहुल माने उपस्थित होते. 

या वर्षासाठी नवीन वर्षाचा एकूण १२ हजार ८६९ कोटी रुपयांचा वार्षिक पतपुरवठा आराखडा बनविण्यात आला आहे. त्यापैकी प्राथमिक क्षेत्रासाठी ८ हजार ४३६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. गेल्या वर्षापेक्षा एकूण १४ टक्क्यांनी या पतपुरवठा आराखड्यामध्ये वाढ करण्यात आली आहे.

जिल्ह्याच्या पतपुरवठा आराखड्यामध्ये प्रत्येक वर्षी वाढ करण्यात येते. या वर्षीसुद्धा कृषी व बचत गटांची उत्पादन क्षमता वाढावी यासाठी नाबार्डने दिलेल्या सूचनेनुसार आराखड्यामध्ये १४ टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे.

कृषी उत्पादनाला मिळणारे चांगले दर तसेच १०० टक्के शेतकरी बॅंकिंग व्यवस्थेखाली आणणे व त्याला लागणाऱ्या संलग्न सेवासाठी २०१९-२० या वर्षासाठी ४ हजार ११५ कोटी रुपये तरतूद केली आहे. याच कारणासाठी गेल्या वर्षी २०१८-१९ मध्ये ३ हजार ९३२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. कृषी क्षेत्रासाठी ठेवण्यात आलेल्या उद्दिष्टामध्ये रुपये २ हजार ४३० कोटी इतकी तरतूद पीक कर्जासाठी करण्यात आली आहे. 

यामध्ये खरीप हंगामासाठी रुपये १ हजार २१५ कोटी तर रब्बी हंगामासाठी रुपये १ हजार २१५ कोटी इतकी विभागणी करण्यात आली आहे. वार्षिक पतपुरवठा आराखड्यात तरतूद करण्यात आल्याप्रामाणे इतर सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योगांसाठी रुपये २ हजार ९४५ कोटी तरतूद करण्यात आली आहे. इतर प्राथमिक क्षेत्रासाठी वाढ करून तब्बल १ हजार ३७५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com