हापूस आंब्याची पहिली पेटी कोल्हापूरला रवाना

हापूस आंब्याची पहिली पेटी कोल्हापूरला रवाना
हापूस आंब्याची पहिली पेटी कोल्हापूरला रवाना

सिंधुदुर्ग ः जिल्ह्यातील कुंभारमाठ (ता. मालवण) येथील आंबा बागायतदार सूर्यकांत ऊर्फ आबा फोंडेकर यांच्या बागेतून हापूस आंब्याची पहिली पेटी कोल्हापूरला रवाना झाली आहे. चार डझन आंब्याच्या या पेटीला साधारणपणे ९ हजार रुपये दर मिळणार आहे. श्री. फोंडेकर यांच्या आंबा बागेला सप्टेंबरअखेरपासून मोहोर येण्यास प्रारंभ झाला होता. गेल्या वर्षीदेखील जिल्ह्यातून आंब्याची पहिली पेटी पाठविण्याचा मान त्यांनीच मिळविला होता.

लांबलेला पाऊस, क्यार वादळाचे दुष्परिणाम आणि नोव्हेंबर उजाडेपर्यंत थंडीचा नसलेला पत्ता यामुळे या वर्षीचा आंबा हंगाम लांबणीवर पडणार हे निश्‍चित मानले गेले होते. मात्र, मालवण तालुक्यातील कुंभारमाठ येथे सूर्यकांत ऊर्फ आबा फोंडेकर यांच्या आंबा बागेतून चार डझनची पहिली पेटी कोल्हापूर बाजारपेठेत रवाना झाली. चार डझनच्या पेटीला ९ हजार रुपयांचा दर मिळणार आहे.

श्री. फोंडेकर यांच्या तीन आंबा बागा असून एका बागेत १२५, दुसऱ्या बागेत ३२ तर तिसऱ्या बागेत २२५ झाडे आहेत. यातील पहिल्या आणि दुसऱ्या बागेतील १५७ झाडांपैकी चार पाच झाडांचा अपवाद वगळता इतर झाडांना २५ सप्टेंबरपासून टप्प्याटप्प्याने मोहोर येऊ लागला. ऑक्टोबरमध्ये अनेक झाडे मोहोरली. परंतु दिवाळीत सलग चार ते पाच दिवस सलग पाऊस झाला. या पावसात मोहोरलेल्या बागांचे मोठे नुकसान झाले. त्यानंतर त्यांनी बागांची विशेष काळाजी घेत विविध कीटकनाशकांच्या फवारण्या केल्या.

गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये आमच्या बागेतून पहिली पेटी मार्केटमध्ये पोचली होती. या वर्षी पहिली पेटी २१ जानेवारीला रवाना झाली आहे. बहुतांशी आंबा कलमे मोहोरलेली असताना सलग चार ते पाच दिवस पाऊस झाला. त्याचा मोठा दुष्परिणाम फळांच्या आकारावर झाला आहे. चार ते पाच प्रकारात आंब्याची फळे येताना दिसत आहेत. आंब्याची मोजकी झाडे असल्यास पावसाची शक्यता असल्यास झाडे झाकून ठेवता येतात. परंतु झाडांचे प्रमाण अधिक असल्यास हा पर्याय शक्य होत नाही. पहिली पेटी चार डझनची असून त्याला साधारणपणे नऊ हजार रुपये दर मिळेल. दुसरी तोडणी वीस दिवसांनी केली जाणार आहे. - सूर्यकांत फोंडेकर, आंबा बागायतदार, कुंभारमाठ, ता, मालवण

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com