कणेरी मठावर देशातील पहिले डिव्हाइन गार्डन

डिवाइन गार्डन
डिवाइन गार्डन

कोल्हापूर : हजारो फुलझाडांसह विविध प्रकारची संस्कृती दर्शविणारे देशातील पहिले डिव्हाइन गार्डन कणेरी (ता. करवीर) येथे सिध्दगिरी मठाच्या वतीने साकारत आहे. तब्बल अकरा कोटी रुपये खर्चाचे हे गार्डन सहा एकरांत पसरले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गार्डनचे उद्‌घाटन करण्याचे नियोजन आहे. फेब्रुवारीच्या अखेरच्या सप्ताहात हा कार्यक्रम होण्याची शक्‍यता आहे. विविध वनस्पतीबरोबर कोल्हापूरची वैशिष्ट्ये दाखवणाऱ्या छटा या गार्डनची वैशिष्ट्ये आहेत. विशेष म्हणजे मठाला भेट देणाऱ्या भाविकांच्या श्रमदानातून हे गार्डन साकारले आहे. याशिवाय देशभरातील कलाकारांनी कलेच्या माध्यमातून गार्डनमधील शिल्पांना आकर्षक बनविण्याचे काम केले आहे. दोन लाख कुंड्यांचा वापर या ठिकाणी करण्यात आला आहे. विविध फुलझाडांच्या राशी  गार्डनमध्ये अधिकाधिकपणे फुलझाडांचा वापर केला आहे. यात बारा वेगवेगळे व्हर्टिकल प्रकार आहेत. कॅकटसचे एक हजार, गुलाबाचे दोन हजार, जास्वंदाच्या एकशे चाळीस प्रकारांसह इतर फुलांचे शेकडो प्रकार या ठिकाणी पाहावयास मिळणार आहेत. हजारो प्रकारची विविध रंगी फुले असणारी ही वेगवेगळी बाग असल्याचा दावा मठाने केला आहे. विविध प्राण्यांच्या प्रतिकृती देशी गायीची महाकाय पन्नास फूट उंचीची मूर्ती, बदक, मोर, अष्टविनायक गणपती, विठ्ठल रखुमाई आदींच्या मूर्ती आकर्षकपणा वाढविणाऱ्या ठरणार आहेत. विविध प्रकारचे माठ बनवून त्याला सजवून त्याला स्वर्गीय वातावरणाचे रूप देण्याचा प्रयत्न केला आहे. देशातील प्रत्येक राज्यातील संस्कृतीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मूर्तीही बागेत आहेत. अत्याधुनिक ‘ठिबक’चा वापर बागेतील वनस्पतींना पाण्याचे नियोजन करण्यासाठी ठिबकचा वापर करण्यात आला आहे. दररोज पावणेदोन लाख लिटर पाणी लागणार आहे. याशिवाय महिन्याला २५ लाख रुपयांची झाडे बदलावी लागणार आहेत. जसे सुचेल, जागा मिळेल तशी कल्पकता बाग तयार करताना वापरली आहे. कोल्हापुरातील भवन मंडप, पायताणाच्या प्रतिकृतीसाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. विविध भागांतील भाविकांनी श्रमदान करून गार्डनच्या उभारणीला मदत केली. दुबईतून सुचली कल्पना मठाधिपती काडसिद्धेश्‍वर महाराज दुबईला गेल्यानंतर तिथे गेल्या वर्षी ही कल्पना सुचली. अशा पद्धतीच्या बागा दुबई, सिंगापूरमध्ये पाहावयास मिळतात. आपणाकडे नैसर्गिक विविधता असल्याने आपण अशी बाग तयार करू शकतो. हे लक्षात आल्यानंतर तज्ज्ञांशी चर्चा केली. यानंतर गेल्या फेब्रुवारीत या बागेच्या कामाला सुरवात केली. आता कामे अंतिम टप्प्यात आहेत. ही बाग पाहाण्यासाठी देशभरांतून भाविक यावेत, हा मठाचा प्रयत्न असल्याने श्री काडसिद्धेश्‍वर यांनी सांगितले. अनोखा आनंद देणारी जंगल सफारी गुहेमध्ये कृत्रिम जंगल तयार करण्यात आले असून, यातून जंगल सफारी नावाची ट्रेन धावणार आहेत. या ट्रेनच्या दोन्ही बाजूला जंगल वसविण्यात आले आहे. यामध्ये गावातील संस्कृती, लोकांची दिनचर्या, कारागीर, विविध ठिकाणी काम करणारे लोक, प्राणी आदींच्या हुबेहूब प्रतिकृती तयार केल्या आहेत. ट्रेनसाठी पूलही तयार करण्यात आली आहे. शिवाय झुलत्या पुलाचा आनंदही घेता येणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com